मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय सहावा

आदिपर्व - अध्याय सहावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


सचिवमुखें जनमेजय परिसे साद्यंत तातघातकथा.
कोपें म्हणे, ‘ न शापीं, पापीं भुजगींच, तातघातकता. ॥१॥
हा ! तात ! मला झाली अत्यंत असह्य, तापदा, वार्ता.
हा ! साहवेल कवणा ? क्षणतरि सोसेल ताप दावार्ता ? ’ ॥२॥
भूप अमात्यांसि म्हणे, ‘ झालें वनवृत्त तें कसें श्रवण ? ’
काश्यपतक्षक - भाषण ऐकोनि तुम्हांसि भेटला कवण ? ’ ॥३॥
म्हणति प्रधान, ‘ होता काष्ठार्थी पुरुष वटनगारूढ;
होऊनि भस्म, झाला जीवंत वटासवेंचि, तो गूढ. ॥४॥
तेणें कथिलें देवा ! जरि मध्यें प्राप्त जाहलें मरण,
काश्यपमुनिच्या विद्यासामर्थ्यें त्यासि राहिलें स्मरण. ’ ॥५॥
सचिवांसि म्हणे राजा, ‘ जेणें बाधों दिली न हानि वडा;
वांचविता ताताला तो मुनि, चित्तांत भाव हा निवडा. ॥६॥
मार्गांतूनि फिरविला काह्स्यप, देवूनि धन, असा मोटा
आग्रह घातीं ज्याचा, तो तक्षक अहि कसा नव्हे खोटा ? ॥७॥
तोचि भुजग कृपपातक, घातक; तात कपटें खळें वधिला.
श्रृंगिक्षोभ बरा; परि न बरा त्या कुमतिच्या मनामधिला. ॥८॥
प्रिय आपुलें कराया, उत्तंकाचेंहि, मीं तया अरिला
भस्म करीन कुळासह; संकल्प असा स्वमानसीं धरिला. ’ ॥९॥
ऋत्विक्पुरोहितांतें भूप म्हणे, ‘ तक्षकें जसा तत
केला भस्म, तसा मीं त्या दुष्टांचाहि इच्छितों घात. ॥१०॥
होतील भस्म दहनीं पन्नग जेणें, जरि प्रयोग असा
अवगत असेल सांगा; हो पतिरिपुकुळविनाशहृष्ट रसा. ’ ॥११॥
ते म्हणति, ‘ नृपा ! आहे वेदपुराणोक्त सर्पसत्र, पहा
कौतुक; म्हणोत होउनि अहि पश्चात्तप्त, सभय, सत्रप, ‘ हा ! ’ ॥१२॥
‘ पारीक्षित जनमेजय नरनाथ करील सर्पसत्रास; ’
बुध वदति; तूंचि तो हो दीक्षित; होवूत सर्प सत्रास. ’ ॥१३॥
साहित्य नृपति करवी; यज्ञायतनार्थ मोजितां भूतें,
‘ विप्रनिमित्तें यज्ञासिद्धि ’ अएं भावि वर्णिलें सूतें. ॥१४॥
तें परिसोनि नृप म्हणे द्वास्था ‘ या यज्ञमंदिरामाजी
मज न कळतां, न कोणी यावा; आज्ञा मनीं धरीं माजी. ’ ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP