जनमेजयनृपति पुसे, वैशंपायन कथी सविस्तर; तें
बहु; मीं लेशचि गातों; जग लेशेंही महद्यशें तरतें. ॥१॥
श्रीकांतनाभिपद्मीं प्रकटे विधि, विप्रसर्जनीं दक्ष;
तद्दक्षांगुष्ठोद्भव विख्यातयशा प्रजापती दक्ष. ॥२॥
त्याची कन्या अदिती; कश्यपभार्या, महासती, ज्येष्ठा.
तीचा पुत्र विवस्वान्; वैवस्वत म्हणति तत्सुता श्रेष्ठा. ॥३॥
त्या वैवस्वतमनुची, सोमात्मजबुधवधू, इळा तनुजा;
तीचा पुरूरवा सुत, पुर प्रतिष्ठान दे स्वयें मनु ज्या. ॥४॥
तत्सुत आयु, तयाचा नहुष, तदात्मज ययाति जो अरिला
यमसम समरीं झाला, शुक्रसुतेनें स्वयेंचि जो वरिला. ॥५॥
झाला ययाति कविचा जामाता; तीच सत्कथा परिसा.
या चरितामृतपानें या लोकीं सर्व रसिक हो ! हरिसा. ॥६॥
देवाचार्य बृहस्पति, कवि असुराचार्य, हे जगन्महित;
शिष्याभिमान धरुनि, स्पर्धा करिती सदा जसे अहित. ॥७॥
सुरशस्त्रांहीं जे जे भट होती संगरांत असु - रहित
संजीविनीबळें त्यां उठवी, करि काव्य नित्य असुर - हित. ॥८॥
ती विद्या सुरगुर्ला अवगत नव्हती, म्हणोनि समरांत
बहु मरती; तें पाहुनि न टिके उत्साह - धैर्य अमरांत. ॥९॥
ती विद्या साधाया देवानीं सद्विचार आठविला;
शुक्राकडे स्वगुरुसुत कच विनउनि, युक्ति कथुनि, पाठविला. ॥१०॥
शिष्यत्वें जाउनि, कच सांगे गुरुदास्यकाम, पद नमुनीं;
प्रणतीं शत्रुसुतींही द्रवला तो सुप्रसन्नवदन मुनी. ॥११॥
आराधिला कचें गुरु, गुरुची कन्याहि देवयानी; ती
झाली प्रसन्न सत्वर; सिकविति तैसीच देव या नीती. ॥१२॥
असुर म्हणति, ‘ विद्येनें प्रबळ करायासि देव, या नीचें
मन मोहिलें गुरूचें, गुरुचित्ताहूनि देवयानीचें. ’ ॥१३॥
गुरुगोरक्षण करितां, देवद्वेषें हरूनि असु रानीं.
कचमांस वृकांसि दिलें वांटुनि भक्षावयासि असुरानीं. ॥१४॥
गायी गृहासि आल्या, मावळला रविहि, कच न आढळला;
तेव्हा सोडुनि धृतिनग शुक्रसुताबुद्धिभूमिला ढळला. ॥१५॥
शुक्रसुता गहिवरली; न्हाणी तदुरस्थळासि अश्रु तिचें.
कवणाला न प्रिय तें गुणमणिमय केलिमंदिर श्रुतिचें ? ॥१६॥
तातासि म्हणे, ‘ आला नाहीं अद्यापि कच; नसे अवधी;
लव धीर बुद्धि न धरी माझी; ताता ! सुनिष्ठुरा तव धी. ॥१७॥
येता मघांचि, असता जरि कुशळी, करिति खळ अघा; बरवी
गति न दिसेचि कचाची; कुशळिजनविरह असें न घाबरवी. ॥१८॥
कच आजि न येतां, मीं प्राण त्यागीन न भरतां घटिका;
आण तुझी; जाण खरें; केला निश्चय नव्हेचि हा लटिका. ’ ॥१९॥
काव्य म्हणे, ‘ धैर्य धरीं; आहे संजीविनी सुधाधारा.
उठवूनि आणितों कच, चिंतुनि विश्वंभरा बुधाधारा. ’ ॥२०॥
मंत्रजप करुनि तो कवि, ‘ ये रे ! वत्सा ! कचा ! ’ असें बाहे;
भेदुनि वृकोदरें, पळ सर्व निघे, त्यांत लेशहि न राहे. ॥२१॥
होता तसाचि झाला; उठला; आचार्य देव तारी; ती
शक्ति तसीच निरुपमा; भिन्ना गुर्वन्यदेवतारीती. ॥२२॥
कच येतां बहु हर्षे; ‘ धन्य ’ म्हणे ‘ मींच कन्यका; मातें
वांचविलें, त्वांचि दिला; या देइल कोण अन्य कामातें ? ’ ॥२३॥
पुसतां वधवृत्त, कच स्वगुरुसुतेला समस्त आयकवी.
प्रार्थुनि म्हणे, ‘ उगी; हा स्वस्ति असो सर्वविप्रराय कवी. ’ ॥२४॥
त्यावरि, गुरुकन्योक्तें पुष्पें आणावयासि जाय वना;
सांपडला त्या असुरां कच, जैसा वत्स एकला यवना. ॥२५॥
पुनरपि त्या पापानीं सद्विप्रकुमार चरचरां चिरिला;
भय न धरिलें तिळहि, त्या पापांच्या जोडितां महागिरिला. ॥२६॥
खंड तिळप्राय करुनि, नेउनि, केले निमग्न जळधींत.
नाहींच धर्म, करुणा, पापभय, विचारलेश खळधींत. ॥२७॥
जो मुनि तयासि कन्याप्रियकाम, दयाळु काव्य तो तारी.
रज गोळा करुनि, घडी शिष्याची मूर्ति, जेंवि ओतारी. ॥२८॥
पुनरपि तो कच वधिला; केला तद्देह दग्ध रुष्टानीं;
शुक्रासि पाजिलें हो ! दद्भस्म सुरारसांत दुष्टानीं. ॥२९॥
कच न दिसतां रडे सुरयानी; तीतें पिता म्हणे, ‘ कां गे !
वत्से ! रडसी ? ’ ऐसें पुसतां, तैसेंचि ती पुन्हां सांगे. ॥३०॥
शुक्र म्हणे; ‘ वत्से ! मीं वांचवितों, परि पुनःपुन्हां मरतो;
आग्रह करूनि म्हणसि, ‘ प्रेतगतिंगतहि कच पुन्हां परतो. ’ ॥३१॥
त्यज शोक; मत्प्रसादें तुज कय उणें असे ? नकोचि रडों.
दाटुनि माथां वाहुनि दुर्वह दुःखाद्रिला, नको चिरडों. ॥३२॥
ती तातासि म्हणे, ‘ कच गुरुभक्त, कुलीन, साधुकार्यकर;
जरि त्यासि सोडिलें जळ, तरि जळ सोडू मलाहि आर्यकर. ॥३३॥
ब्रह्मघ्नां शिष्यांची भीड धरुनि, साधु शिष्य मोकलिला,
म्हणतिल; न ऐकवे तें; न स्वहित कवी असें गमो कलिला. ’ ॥३४॥
स्वमनिं म्हणे कविसत्तम, “ मळवावें पंडितें न यश; हाणी
प्राणांचीहि बरी; परि न यशाची; ’ सांगती नय शहाणी. ॥३५॥
मग मेळवी महात्मा एकत्र समस्त असुर कोपानें;
खवळे प्रियशिष्यभसितमिश्रितमधुच्याहि तज्ज्ञ तो पानें. ॥३६॥
असुरांसि म्हणे, ‘ कां रे ! नेणा अद्यापि मत्तपा ? मरतो
कीं वांचतो ? पतंग, न भी जो ज्वलनासि मत्त, पामर, तो. ॥३७॥
‘ विप्र अवध्य ’ म्हणे श्रुति; हाणोनि तिच्याहि लात हाकेला,
कचहननें सुरगुरुचा न, तुम्हीं माझाचि घात हा केला. ॥३८॥
ब्राह्मण कणसे खुपती तुमच्या नेत्रीं; नसो सवे, काढा.
युक्तचि मरणाराला हितपरिणामहि न सोसवे; काढा, ’ ॥३९॥
धिक्कारुनि असुरांतें, धर्मचि तो अमृतमयवचा सिकवी;
बाहे विद्याकरुणादिव्यपतस्या बळें कचासि कवी. ॥४०॥
जों गुरु ‘ वत्स ! कच ! ’ म्हणुनि ‘ एहि ’ असें तो म्हणावया योजी,
तों विद्यासामर्थ्यें उपजोनि गुरूदरीं, म्हणे ‘ ओ जी ! ’ ॥४१॥
उदरप्रवेश पुसता झाला तो पुण्यराशि शुक्रमुनी;
सांगुनि खळकपट, म्हणे, ‘ येथ वसो काळ हा शिशु क्रमुनीं. ॥४२॥
निर्भय वसेन, काळ क्रमुनि पवित्रोदरीं, असाचि सुखें.
न हित गुरूदरदारण; निघतां मज निंदितील साधुमुखें. ’ ॥४३॥
शुक्र म्हणे, ‘ वत्से ! कच कुक्षि विदारुनि निघेल बाहेर.
हा तरलाचि; परि तुझें या कुव्यसनीं बुडेल माहेर. ’ ॥४४॥
सुरयानी त्यासि म्हणे, ‘ वदतां हें अशुभ काय ? हो तात !
व्हावे दोघेहि मला; चिंतामणि हेचि पाय होतात. ॥४५॥
तारुनि शिष्यासि, तरो गुरुल म्हणत्यें, पात्र काय कन्या या
नोहे वरासि ? वरदा ! जाणसि तूं सुज्ञनायक न्याया. ’ ॥४६॥
भीड सुतेची भारी; विद्या संजीविनी कचा सिकवी;
गुरुलाहि वांचवाया योग्य करी, सज्जना कचासि, कवी. ॥४७॥
गुरुकुक्षि विदारुनि कच बाहेर निघे; परंतु बहु तो भी;
उठउनि गुरु, संकोचे नमुनि. रडे कुलज, कीर्तिचा लोभी. ॥४८॥
गुरुदक्षिणाविधीतें कच गुरुचा आप्त, विद्यमानधनें
देहें साधी; धन्यचि केला तो आप्तविद्य मानधनें. ॥४९॥
कचघातकासुरांतें सुरयानीचा स्वयें जनक दापी
कीं, ‘ जो ब्रह्मद्वेष्टा कुशळ न पावेल तो जन कदापी. ॥५०॥
समजा बरें, जसा मीं विप्र, गुरु, तसाचि हा कच; पळाला
ब्रह्मांडांतुनि जरि रिपु, वधिन, न देतांहि हाक, चपळाला. ’ ॥५१॥
असुरांसि करुनि शिक्षा, बाहु उभारुनि, म्हणे ‘ अहो ! कानीं
घ्यावें माझें हितकर मर्यादावचन साधुलोकानीं. ॥५२॥
जो विप्र आजिपासुनि मद्यप्राशन करील, तो पापी
ब्रह्मघ्नासम निश्चित. ’ असि मर्यादा स्वयें कवि स्थापी. ॥५३॥
होता सहस्र वर्षें कच गुरुसेवेंत; मग तया प्राज्ञा
शुक्रें बहुसंतोषें दिधली जाया पित्याकडे आज्ञा. ॥५४॥