श्रीमद्ययातिनंदनपूरुकुळीं भूप जन्मले शतशा;
श्रवणें तत्कीर्ति हरिति ताप, सुधांच्या नद्या न लेश तशा. ॥१॥
त्या पौरवांत झाला राजा दुष्यंत धर्मपर, महित.
स्वगुणें करि प्रजांचें अनुदिन तो मूर्तधर्म परम हित. ॥२॥
तो एकदा वनाला जाय, कराया यथेष्ट मृगयेतें;
बलकोलाहल परिसुनि, ‘ कुळनाशव्यसन ’ म्हणति मृग ‘ येतें. ’ ॥३॥
वधिले व्याघ्र, वृक, खळश्वापद; धरिले प्रमत्त गज रानीं;
चिरले किरि लेशहि धृति मृगयूथीं नुरविलीच गजरानीं. ॥४॥
एका हरिणामागें एकाकी भूप धांवला, श्रमला;
जातां दूर श्रीमत्कण्वाश्रम रम्य पाहतां रमला. ॥५॥
तें सत्यलोकतुल्यचि आश्रमपद, ज्यांत अण्वघ न साच.
तेथील तापस शिखीचातकसे, त्यांत कण्व घनसाच. ॥६॥
श्रीमालिनीतटीं तो त्या शुद्धाश्रमपदांत शिरला, हो !
चित्तांत म्हणे, ‘ काश्यपपदपद्मरजःप्रसाद शिर लाहो. ’ ॥७॥
मुनि आश्रमांत नव्हता, त्याची कन्या शकुंटळा होती.
पूजी नरदेवातें, करि तेव्हां स्ववपु दीपकज्योती. ॥८॥
अवलोकितांचि, आधीं भुलला लावण्यकल्पलतिकेला.
त्यांत तिणें उचितादर सस्मितमधुरोदितेंहि अति केला. ॥९॥
चित्तीं म्हणे नृपति, ‘ हे जातीची सस्मिता सुकळिका; मीं
होईन काय चुंबुनि ईतें सफलेच्छ, तृप्त, अळि कामीं ? ’ ॥१०॥
मग तीस पुसे, ‘ सुंदरि ! चतुरे ! तूं कोण ? सत्य सांग मला.
तुज या वयांत हित हा उग्र तपोनियमतप कां गमला ? ॥११॥
‘ कण्वसुता मीं ’ म्हणसी, परि न गमे सत्य, सत्य वद नातें;
दे मत्कर्णतृषाहरवृत्तसुधाचषकता स्ववदनातें. ॥१२॥
त्वत्तात ऊर्ध्वरेता कण्व कसा ? तूं सुता कसी ? बोल.
मीं पौरव दुष्यंत त्वद्वत्ताकर्णनीं असे लोल. ’ ॥१३॥
ती त्यासि म्हणे, ‘ पूर्वीं एकें मुनिनें विचारिलें होतें;
जें त्यातें मत्तातें कथिलें मज्जन्म, सांगत्यें हो ! तें. ॥१४॥
“ विश्वामित्र तप करी, केलें कोण्हींहि तेंवि तप नाहीं.
तापे मुनितेजें जग, जैसें कल्पांतकाळतपनाहीं. ॥१५॥
उग्रतपःसामर्थ्यें विश्वामित्र प्रभु स्वपद हरितो,
ऐसें शंकोनि म्हणे, धरुनि करें मेनकाकरा, हरि तो. ॥१६॥
‘ स्वश्रीभोग बहुत जरि केला, परि तो गमे न केला हो;
म्हणुनि इचा हा, कौशिकमुनिहि तुझा भोग मेनके ! लाहो. ॥१७॥
स्वपदहर गमे सकळां, मजलाचि प्रियतमे ! न केवळ तो;
न वळेल उपाशयतें, तुजचि मुनी नियत मेनके ! वळतो. ॥१८॥
तूं पात्र, गाधिजाला सदुपायन करुनि देह, नुतितें हो; ’
हरि वारंवार असें, स्वकरेंचि धरुनि वदे, हनु, तितें हो ! ॥१९॥
‘ भ्रूधनु ओढुनि, कज्जलविषदिग्ध कटाक्षशर वरारोहे !
सोडुनि, लुटीं तपोधन; सौभाग्यश्री तुझी भरारो हे. ’ ॥२०॥
ती अप्सरा म्हणे, ‘ तो भस्म करिल मज महातपा शापें;
जाइल कवण यमाच्या जोडूनि बळेंच हात, पाशापें ? ॥२१॥
मीं अबळा भीरु कसी साहों त्या गाधितनयतेज्यातें ?
भ्यालासि असा, दुःसह मानुनियां तूंहि सुरपते ! ज्यातें. ॥२२॥
गाताति कीर्ति ज्याची मुनिसुतहननत्रिशंकुरक्षणजा.
ब्रह्मसखित्वचि दे नवसृष्टीचा दिव्य अंकुर क्षण ज्या. ॥२३॥
जें दुष्कर पुरुषवरा तुजहि, कसें करिल काज रामा तें ?
सदमृततरु तो मुनि, परि कपटें होईल काजरा मातें. ॥२४॥
करिल कसें मांजर, जें दुष्कर हरिहननकाज वाघांस ?
न शकति अग्नि विधु; कसा दिनमणिचा करिल काजवा घांस ? ॥२५॥
त्या मुनितें मोहाया हा जन काय प्रभु ? प्रभो ! परि तें
तेज पहाया जात्यें; परिजनगत - नाथतेज जय करितें. ॥२६॥
जात्यें; तव आज्ञेचा कोण सुधी जन करील अवमान ?
परि मन्निकट असावे मज साह्य वसंतकामपवमान. ’ ॥२७॥
शक्र म्हणे, ‘ सर्वहि सुर आहों तुजला सहाय; कार्य करीं. ’
आज्ञा दे; मग गेली आणाया तूर्ण तोहि आर्य करीं. ॥२८॥
जेथें करीत होता दारुण तप तो तपोनदीन मुनी,
तेथें जाउनि, खेळे तन्निकट, प्रथम तत्पदीं नमुनीं. ॥२९॥
होती करीत कंदुकलेलि, मधुर गान, मोहिनी, तीतें
स्पर्शे प्रथम वसनहरपवन, मग त्यजुनि तोहि नीतीतें. ॥३०॥
सुरतरसांत बुडाला, जाणों स्त्रीरत्न शीतनवसर, तो
तप्त मतंगज रतला; शक्र म्हणे, बहु करूनि नवस, ‘ रतो. ’ ॥३१॥
झाली गाधिजसंगें हे कन्या; मालिनीतटीं ठेवी;
स्वर्गासि जाय तेथुनि, बहु निष्ठुर चित्त करुनि, ती देवी. ॥३२॥
संरक्षिली वनीं, मधु पाजुनि मातेविना, शकुंतानीं.
असतां विधिकवच, नव्हे काळाच्याही विनाश कुंटानीं. ॥३३॥
स्नानार्थ मालिनीतें गेलों, तों कळविलें इच्या रुदितें;
आणुनि उटजीं केलें म्यां पालनलालन, स्वयें मुदितें. ॥३४॥
झाले शकुंत पाळक, म्हणवुनि ‘ शकुंतळा ’ असें नाम
ठेउनि वागविलें हें रत्न गळां जेंवि मालतीदाम. ’ ॥३५॥
ऐसी तातमुखश्रुत निजजन्मकथा शकुंतळा कळवी;
पळ विस्मित करुनि, नृपतिमनिची स्वालभ्यताव्यथा पळवी. ॥३६॥
नृपति म्हणे, ‘ तरि सुंदरि ! सुदति ! मुदतिशय तुला, मलाहि घडो.
सत्कृतिसीं रसिकाची; माझी तुजसीं तसीच गांठि पडो. ॥३७॥
कुळशीळगुणांहीं तूं योग्या, नृपकन्यका, महोदारा;
घे राज्य सर्व, नाहीं त्वदधिक मज अन्य काम, हो दारा. ’ ॥३८॥
हांसोनि ती म्हणे, ‘ हो ! प्रार्थावें प्रणत - पारिजातातें;
देवा स्वयें वहावें या निजकारुण्यवारिजा तातें. ॥३९॥
मजकरवीं न तुम्हीं बुध गुरुमर्यादातिपात करवा हो !
सत्पात्रीं स्वधनातें चिंतामणि - कण्वतातकर वाहो. ’ ॥४०॥
भूप म्हणे, ‘ गांधवें तुजसीं होईन शीघ्र अन्वित मीं;
नाहीं तरि अदयस्मरशरहत झालों, बुडेन तन्वि ! तमीं. ॥४१॥
अन्या, धन्या, कन्या, अन्यायन्याय जाणत्या, मागें
गांधर्वेंचि वरांतें भजल्या; तद्गुरुहि न भरले रागें. ॥४२॥
गुरुदेवताप्रसादा हो भाजन; आपुल्याचि देहातें,
सत्कीर्ति जगीं व्हाया, सत्पात्रीं आपुल्याचि दे हातें. ॥४३॥
‘ सुत युवराज असो, ’ हा वरुनि वर निका, शकुंतळा आली
झाली. करा तयाच्या मधुपवरनिकाशकुंतळा आली. ॥४४॥
तेव्हां तद्दैव म्हणे, ‘ योग्य तुला न नर अन्य केलीला;
श्री विष्णुसीं तसी तूं यासीं करिं कण्वकन्यके ! लीला. ’ ॥४५॥
लब्धमनोरथ, राजा दुष्यंत म्हणे ‘ प्रियंवदे ! विरहा
मींही भ्याडचि, सेना पाठवितों तों असीच देवि ! रहा. ॥४६॥
दे मज निरोप, हंसें, वद, विस्मरिजेल काय देवि ! सर ?
भिन्न दिसो, एकचि वपु; हें कोण्हासहि न काय दे विसर. ’ ॥४७॥
गेला निरोप घेउनि; परि बहु कण्वासि भूप तो भ्याला.
चित्तीं म्हणे, ‘ अहा ! मुनि शापिल मज परमविषयलोभ्याला. ’ ॥४८॥
आला कण्व मुहूर्ते; फळपुष्पसमित्कुशांसि आणूनीं,
झाला प्रसन्न भगवान्, दिव्यज्ञानेंकरूनि जाणूनी. ॥४९॥
कण्व म्हणे, ‘ वत्से ! त्वां केला निश्चिंत आजि तातकर;
न धरीं संकोच; नव्हे गांधर्वविधि स्वधर्मघातकर. ॥५०॥
तुज सुत होईल भला, निववील यशोमृतें कुलीनमनें;
त्यासि मदाशीर्वादें करितील समस्त नृप मुली ! नमनें. ’ ॥५१॥
तातातें नमुनि म्हणे, ‘ म्यां दुष्यंतासि वाहिलें काय.
भवदाश्रमीं अतिथिचें नव्हतां प्रिय उचित राहिलें काय ? ॥५२॥
त्यावरि कृपा करावी, द्या हा वर; योग्य होय कन्या या.
कण्व म्हणे, ‘ हेंहि दिल्हें; कां भीसी न करुनींहि अन्याया ? ’ ॥५३॥
झाला शकुंतळेला सुत; सुतपा कण्व त्यासि परिपाळी;
गृहधर्माची कुतुकें दे तो भगवान् विरक्त परि पाळी. ॥५४॥
भरवी मृगार्भका, मग तो भरवी कां न नातवा घांस ?
झाला असा, शिशुपणीं बद्ध करी काननांत वाघांस. ॥५५॥
तो आश्रमवृक्षांसीं शार्दूळवराहहस्तिहरिसेना
बांधी सा वर्षांचा शिशु; कण्वोक्तांत तेंचि ’ परिसेना. ॥५६॥
‘ सर्वदमन ’ त्यासि म्हणति, करिति सदा सुवरवृष्टि जलदमुनी;
‘ निरुपम स्ख प्रजांला हा शिशु देईल, सर्व खळ दमुनी. ’ ॥५७॥
कण्व म्हणे, ‘ मुलि ! झाला राज्योचित सुत, मलाहि लाभ वनीं;
जा पतिगृहासि; शोभे स्त्रीजन पतिच्याचि राहिला भवनीं. ॥५८॥
राज्यसुख पहा; पतिची सेवा करिं; मज उदास मुलि ! न मनीं;
पतिसह वृद्धपणीं ये, जरि हें वन, सिंधुतीरपुलिन मनीं. ’ ॥५९॥
आज्ञापिले स्वशिष्य, स्वसुता नेत्रें पुसोनि पाठविली;
साश्रुमुनिजनीं, कण्वें शतवार तदीयभक्ति आठविली. ॥६०॥
दुष्यंतसद्मपद्मीं, ती स्त्रीश्री कण्व - भानुशिष्यकरीं
नेली पुत्रसुगंधासह, धर्मनयांबुपूर्णनगरसरीं. ॥६१॥
पतिला म्हणे मुनिसुता, ‘ द्यावें पुत्रासि यौवराज्य नृपा !
स्मृति आहे कीं ? पूर्वीं केली जी काश्यपाश्रमांत कृपा. ’ ॥६२॥
राजा म्हणे, ‘ कवण तूं ? कोणाचा पुत्र ? काय गे ! वदसी ?
का च स्मृतिरयि, तापसि ! मैवं प्रलपात्र भूभुजःसदसि. ’ ॥६३॥
साध्वी म्हणे, ‘ अहो ! नयधर्मज्ञ तुम्हीं नरेंद्र पौरव कीं ?
वदतां असें कसें ? हो ! करितां विश्वासघात रौरव कीं. ॥६४॥
मृगयेचिया प्रसंगें, हरिणामागें वनांत लागोनीं
आलासि मालिनीच्या तीरीं कण्वाश्रमासि भागोनि. ॥६५॥
सिद्धाश्रमांत नव्हता तात; तुला म्यांचि पूजिलें वन्यें;
जागें काय करावेम निपट कपटनिद्रिता जना अन्यें ? ॥६६॥
मज्जन्मवृत्त पुसिलें त्वां; मग म्यां मेनकाप्सरा माय,
कौशिक बाप, असें तुज कथिलें; तें विसरलासि तूं काय ? ॥६७॥
सुतयौवराज्यवर मज देउनि, गांधर्वविधि करूनि मला
वरुनि, ‘ न जाणें ’ म्हणसी; पूरुकुळीं तूंचि सुज्ञ साधु भला. ॥६८॥
स्त्रीस म्हणति ‘ जाया ’; सुतरूपें पति तदुदरांत जन्मति; तें
श्रुतिवचन तुज असावें ठावें, परि मान्य होय सन्मतितें. ॥६९॥
मीं जाया सत्कार्या; आत्माचि तुझा कुमार हा राया !
झाला प्राप्त, परि गळां न धरिसि अद्यापि रत्नहारा या. ’ ॥७०॥
भूप म्हणे, ‘ भग्नव्रत तात तुझा; मायही तुझी असती;
नसतील तत्सुता तूं, लज्जा कांहीं तरी तुला असती. ॥७१॥
सा वर्षांचा म्हणसी; इतुक्यांतचि एव्हडा कसा गे ! हा ?
स्वीकारुनि तुज, लावूं डाग कसा मूढलोकसा गेहा ? ’ ॥७२॥
साध्वी म्हणे ‘ मिळविलें ज्ञानतपःकीर्तिभाग्य मत्तातें,
कैम्चें तुझ्या कपाळीं नीचा ! अतितुच्छभाग्यमत्ता ! तें ? ॥७३॥
ती ब्रहम्योनि देवी मन्माता मेनका, सुरांस मता;
नीचा तुझीच माता; करिल सुधेची कसी सुरा समता ? ॥७४॥
जर्हि मुख्यसत्यधर्मच्युत आपण, विश्वनिंद्य जन; नीचा !
निंदिसि कसें पदातें मत्ताताच्या मदीय जननीच्या ? ॥७५॥
पौरव रौरवगौरवकर्ता, भर्ता भला मला गमसी;
समशीलवुत्धि होउनि, नीतीनें आजि बोलुं लाग मसी. ॥७६॥
बहुधा तुझें कपाळ न साहे सुतरत्नसन्निधानातें;
हतभाग्य न घे, देतां दाटुनि आणूनि, सन्निधानातें. ॥७७॥
क्षितिपति मत्सुतचि असो, तेजांचा मूर्तिमंत हा निकर;
हा निकर मांडला तूं; देसील कर स्वकीर्तिहानिकर. ’ ॥७८॥
ऐसें वदोनि, जाया उठली तों जाहली नभोवाणी,
‘ दुष्यंता ! काय करिसि ? समजावीं आपुली सती राणी. ॥७९॥
त्यां हे विधिनें वरिली; या साध्वीचें विशुद्ध जनु; रागें
पुर, राष्ट्र भस्म न करो; समजावीं सुतवतीस अनुरगें. ॥८०॥
पुत्राचें भरण करीं; भाग्यें तुज लाधला, भर तयातें;
म्हणतील आजिपासुनि भुवनीं जन सर्वही ‘ भरत ’ यातें. ’ ॥८१॥
स्वकुळपुरोहित, ऋत्विक्, मंत्री, आचार्य, साधु जे होते,
राजा म्हणे, ‘ परिशिलें ? ’ म्हणती सारेहि एकदा ‘ हो ’ ते. ॥८२॥
‘ मत्सुत, मद्दयिता हें मीं जाणें; परि जनासि कळवाया
ऐसें निष्ठुर वदलों, तुमची शंका अशेष पळवाया. ’ ॥८३॥
कळवुनि असें समस्तां, हृदयीं सप्रेम बाष्पभर तातें
आलिंगिलें, गुरुसुहृत्सचिवानुमतेंकरूनि, भरतातें. ॥८४॥
कण्वसुतेसि म्हणे नृप, ‘ दयिते ! साध्वि ! क्षमा करीं; भीरु !
त्वत्क्षोभा भ्याला सति ! हा जन, बहु पावका जसा भी रू. ॥८५॥
असकृत् विरहद, तापद, परि मित्रीं काय सुमुखि ! भीरु ! सति !
दयिते ! नलिनी न धरुनि चित्तीं स्वप्रेमभंगभी, रुसती. ॥८६॥
माझी कीर्ति, श्री तूं; बोलाया वचन कोरडें ज्या ये;
तत्कंठ काय दाटे ? येऊं देऊं नको रडें ज्याये ! ॥८७॥
वदलों शुत्ध्यर्थ असें; भीतों बहु मानसांत डागातें;
निंदिल हंस कसा मधुरस सेवुनि, मानसा तडागातें ? ’ ॥८८॥
स्त्री सुखउनि, दुष्यंतें गुरुसेवापुण्यकीर्तिलाभरत
युवराज पुत्र केला; कविनीं तो सुबहु कीर्तिला भरत. ॥८९॥
दुष्यंत जधीं राजा, झाले रिपुनृ तधींच नक्षत्रें;
भरत तरि रवीच, परीं तें यश केलें कधींच न क्षत्रें. ॥९०॥
कण्वें भरताकरवीं बहुदक्षिणयज्ञ करविले शतशा;
याचा प्रताप मिरवि छवि पाताळींहि, न रवि लेश तशा. ॥९१॥
गोविततवाजिमेधीं ब्राह्मणपूजाद्यनंतलाभरतें
दिधल्या सहस्रपद्में कण्वाला धेनु दक्षिणा भरतें. ॥९२॥
केली कीर्ति शशिकुळीं भरतें, नाशूनि भूमिभार तता;
म्हणवूनि पौरवांचा ठायीं नांदे प्रसिद्ध भारतता. ॥९३॥
भरतसुत भुमन्यु नृपति, तत्पुत्र सुहोत्र तत्तनय हस्ती,
तत्तनुज तो विकुंठन, म्हणति सदा साधु, ‘ अस्तु ते स्वस्ति. ’ ॥९४॥
नंदन विकुंठनाचा अजमीढ, जगत्पवित्र यत्स्मरण,
पुत्र चतुर्विंशतिशत त्याचे, कुळकर तयांत संवरण. ॥९५॥
संवरणाचा सुत कुरु, त्याचा नंदन विदूर मतिशाली,
त्याचा तनुज अनश्वा, स्त्री अमृता मागधी तया झाली. ॥९६॥
तत्पुत्र परीक्षिन्नृप, तन्नंदन भीमसेन भूमिपती,
त्यचा प्रतिश्रवा सुत, त्याचा तनुज प्रतीप शुद्धमती. ॥९७॥
अमृत - प्रतीपचरित प्राशावें श्रवण भरुनि आर्यानीं.
गायील रामकरुणाघनभक्तमयूर तेंचि आर्यानीं. ॥९८॥