गुरुनें एका समयीं रंगीं भीष्मादि सर्व मेळविले;
शिष्यांकरवीं तेथें शिक्षित शस्त्रास्त्रखेळ खेळविले. ॥१॥
रचिते झाले रंगीं शिल्पिवर विचित्र मंच रायाचे.
गमति विमान उतरले क्षितिवरि गगनांत संचरायाचे. ॥२॥
स्त्रीपुरुषरत्नशोभित बहु मोटा रंग काय वर्णवतो ?
भासे व्यक्त खवळला यादोमणिकोटिकोष अर्णव तो. ॥३॥
द्रोणेंदुशिष्यरश्मि स्वगुणसुधा प्रकट करुनि दाखविती;
प्रेक्षकलोकचकोरप्राताकरवीं यथेष्ट चाखविती. ॥४॥
झाले कुतुकफळांचे श्रीधर्मादिक सुयोधनग दाते;
आले घेउनि बळजळराशि वृकोदर - सुयोधन गदा ते. ॥५॥
सव्यापसव्यमंडलगति दोघे भ्रमति हे, मन गदानीं
हर्षविति देखत्यांचें, अधनांचें जेंवि हेमनगदानीं. ॥६॥
जन म्हणति, ‘ होय जैसा परिवेष भ्रमवितां अलातातें,
भीमगदेचाहि तसा; केला अभ्यास बहु भला तातें. ’ ॥७॥
दुर्योधना हि भवता होय गदेचा तसाचि परिवेष.
‘ रविमंडलमध्यगहरिसम ’ म्हणतों ‘ यांसि, भिन्न परि वेष. ’ ॥८॥
गांधारीला सांगे पुत्रविचेष्टित पृथा; नृपा क्षता.
भीमोत्कर्षोक्ति तयां लागे दोघांसही जसी लत्ता. ॥९॥
म्हणती ‘ साधु ! वृकोदर ! साधु ! सुयोधन ! ’ असें तयीं कोणी.
रंगस्थितिच न केवळ, गडबडली तद्विचेष्टितें क्षोणी. ॥१०॥
गुरुवचनें गुरुसुत त्या दोघांच्या क्षिप्र राहवी खेळा.
ते पूर्वपश्चिमाब्धी, जाणों, द्रोणात्मजोक्ति ती वेळा. ॥११॥
मग राहवूनि वाद्यें, द्रोण म्हणे, ‘ सूनुहूनि जो मजला
प्रियतर चकोर होउनि, गुरुशस्त्रास्त्रामृतांशुला भजला, ॥१२॥
तो जिष्णु विष्णुसा या रंगीं यावा, तयासि बोलावा;
भीष्मादि गुणज्ञजन प्रेक्षुनि तद्भुजविलास डोलावा. ’ ॥१३॥
गुरुचित्तज्ञ धनंजय ये तनुधर चापवेदसा, रंगीं
नुरवी भान स्वगुणें, गीतें गीतज्ञ जेंवि सारंगीं. ॥१४॥
भेदी सूक्ष्म कठिन चल लक्ष्यें, पळतां बसोनि तो यानीं,
निववि जनांसि गुणानीं, मेघ जसा चातकांसि तोयानीं. ॥१५॥
अग्न्यस्त्रप्रमुखास्त्रें प्रकट करुनि, वारुणादिकें शमवी,
अर्जुन गुरुप्रसादें प्रेक्षकजनचित्तवृत्तिला रमवी. ॥१६॥
होय अदृश्य प्रकट क्षणभरि अणु धरि शरीर पर्वतसें.
जनदृष्टिला मिळालें नाहींच कधींहि हर्षपर्व तसें. ॥१७॥
तों त्या रंगद्वारीं तलताडितबाहुशब्द दुःसहसा
झाला, जसा अशनिचा होतो, पडतां शिळातळीं सहसा. ॥१८॥
ते अल्प मयूराचे शब्द, करिति चकित विमद भुजगा जे.
दचके मनांत रंगीं जन, जेव्हां तो प्रचंडभुज गाजे. ॥१९॥
द्वाराकडेचि सारे पाहति तों मूर्त राशि तेज्याचा,
कर्ण शिरे रंगीं, भुजरव पविरव म्हणति लोक ते ज्याचा. ॥२०॥
शत्रुमदाचा कर्णापासुनि व्हायासि अंत रंगांत,
अवकाश दे सुयोधन सानुज तोषोनि अंतरंगांत. ॥२१॥
वाटे रंगीब्जवनीं आला प्रेमासि अर्क राखाया.
जनदृष्टि उड्या घालिति, बहु मास्या जेंवि शर्करा खाया. ॥२२॥
भानु नसे तों, तेजें स्वस्तोत्र हिमांशु कीं दिवा करवी,
भीमार्जुन तेजस्वी, वृष नसतां, कीं तया दिवाकर वी. ॥२३॥
कर्ण द्रोणासि नमुनि, बंधुत्व न जाणतां, निजा अनुजा
जिष्णुसि म्हणे, ‘ चमत्कृति दाखविल्या त्वां धरूनियां धनु ज्या, ॥२४॥
त्या दावितों, चमत्कृतितटिनीशततातमेरुपर्वत मीं;
भ्रमसी वृथा पृथाप्रियपुत्रा ! कां तूं शिरोनि गर्वतमीं ? ’ ॥२५॥
द्रोण म्हणे, ‘ दावावे त्वांहि चमत्कार, बोल राहों दे;
तव शस्त्रास्त्रचमत्कृतिरसपूरीं सर्व रंग वाहों दे. ’ ॥२६॥
कर्णें तसेंचि केलें कर्म; सुविद्या नता न कां पावे ?
सुर - शेषडोलिले, मग नरमस्तक कां तदा न कांपावे ? ॥२७॥
द्रवलें दुर्योधनमन पाहुनि शस्त्रात्रयानपटुतेला.
अंतर्मलिन द्रवतें चक्षु जसें पाहतांचि कटुतेला. ॥२८॥
भेटुनि म्हणे सुयोधन, ‘ बहु यश वाढोनि तें तगो कर्णा !
बापा ! भला भला गा ! कार्मुकवेदत्रिनेत्रगोकर्णा. ॥२९॥
हें राज्य तुझें, भोगीं, भोग जसा चंदनद्रु भुजगानीं,
आम्हीं वरिलासि; तुझे गावूं दे हे गुणाढ्य भुज गानीं. ’ ॥३०॥
कर्ण म्हणे, ‘ परि आहे एक मनीं काम, तो करीं पूर्ण.
वाटे मजसीं तिसर्या पार्थासीं द्वंद्वयुद्ध हो तूर्ण. ’ ॥३१॥
कलिपुरुष म्हणे, ‘ कर्णा ! अरिमूर्धमहत्त्वकक्षदव डावा
त्वच्चरण हो, दिगंतीं त्वां रिपुजनमद समूळ दवडावा. ’ ॥३२॥
जिष्णु म्हणे, ‘ न बहातां जाताति महाजनांत दाटूनि;
बोलतिहि न बोलवितां ते घडिले मूर्खकोटी वाटूनिं. ॥३३॥
कर्णा ! दंडक रुचला तुज फार तुझा, परंतु हा नीच;
सावध हो, नाहीं तरि, होईल प्राणकीर्तिहानीच. ’ ॥३४॥
कर्ण म्हणे, ‘ काय तुझें येथें ? हा रंग सर्वसामान्य.
न वदें बहु, तुज बहुधा प्राणपरिचयहि न गर्वसा मान्य. ॥३५॥
यावरि कटु वदतां, शिर उडवीन शरें, जसाचि चेंडु करें.
आदिवराहपरिभव न करिजेल स्वकुळनुतिवचें डूकरें. ’ ॥३६॥
ऐसें कर्ण वदे, तों गुर्वाज्ञेसह धनुलता पार्थ
स्वीकारी; तेजस्वी लोकीं वर्ते यशप्रतापार्थ. ॥३७॥
पांचहि पांडव उठले; बह्रला उत्साह अंतरंगांत.
उठले कौरव शतही; म्हणति तदा, संत, ‘ हंत ! ’ रंगांत. ॥३८॥
दैवानें दाखविलें समराडंवर वृथा, न नाश तदा;
परि सुतकलहारंभीं ‘ हाय ’ असें ये पृथानना शतदा. ॥३९॥
बुडवि पृथापृथिवीला जेव्हां मोहांवुनिधि महा खोल;
तिस उद्धरी गुरुसुमतिदंष्ट्रेनें विदुरकविमहाकोल. ॥४०॥
झाले पांडवपक्षीं द्रोण कृपाचार्य भीष्म उत्साहें.
थोरांसि नावडे, श्रितसाधुत्यागें घडेल कुत्सा हे. ॥४१॥
जों नाहींच सुतांचे अन्योन्यास्रह्रदीं शर विझाले;
बंधुत्व त्यजुनि, सुतस्नेहें रिपुसे सुरेश - रवि झाले. ॥४२॥
कृप कर्णासि म्हणे, ‘ हा नृपसुत करणार तुजसवें युद्ध.
जे द्वंद्वयुद्धकर्ते वीर असावे कुळादिकें शुद्ध. ॥४३॥
गौरव हातें वाणीदेवी हि लिहों शकेचिना ज्यांचें,
गौर वहातें लोकीं यश गांगस्रोतसेंचि राज्यांचें. ॥४४॥
ते पूर्वज याचे, हा कौरव गौरवपदेंदुकुळजात,
जाणे विश्व; तुवांही सांगावे स्वान्वय, प्रसू, तात. ॥४५॥
कोणांचें कुळभूषण तूं, कर्णा ! प्रथम हेंचि कळवावें;
भलत्यासींच नृपसुतें द्वंद्व करुनि शस्त्रयश न मळवावें. ’ ॥४६॥
वृषवदन उतरलें, जै कृपवाक्शर काळजात खडतरले;
मर्म उघडितां, मानी पुरुष बुडाले त्रपेंत, जड तरले. ॥४७॥
अंधसुत म्हणे, ‘ गुरुजी ! जाचा; बहु सोसितो हिरा जाच.
न्यायें तों, सत्कुळजहि, सैन्यपतिहि, शूर तोहि राजाच. ॥४८॥
जरि जिष्णु युद्ध न करी, तरि देतों राज्य अंगदेशाचें.
या कर्णाचें यश हो, झालें तें जेंवि अंगदेशाचें. ’ ॥४९॥
ऐसें वदोनि करवी रंगीं राज्याभिषेक तो कर्णीं.
भरिला सुहृदी क्षण शिशुतृप्तिद पीयूषरसचि गोकर्णीं. ॥५०॥
कर्ण म्हणे, ‘ राज्य दिलें ऐसें तुज राजनंदना ! काय
द्यावें ? सांग; गुणज्ञप्रीत्यधिक गमे न चंदना काय. ’ ॥५१॥
भूप म्हणे, ‘ अत्रुटिता धारा सरळी जसीच तैलाची,
यावज्जीव असावी त्वन्मैत्री, स्थिति धरूनि शैलाची. ’ ॥५२॥
दिधला सुयोधनाला सख्यवर सुतें तसाचि सवित्याच्या;
अतुळोदारत्वातें गाति व्यासादि सर्व कवि त्याच्या. ॥५३॥
आला तशांत तेथें अधिरथ, त्यातें करी नमन कर्ण.
तेव्हांचें कुतुक कथुनि रसिकीं प्रमुदित करीन मन कर्ण. ॥५४॥
अधिरथ सूत, तदात्मज वृष, कळतां भाव तो तसा रंगीं,
भीम वदे, जो कर्णीं विभय, जसा सिंहपोत सारंगीं. ॥५५॥
‘ कर्णा ! वर्णाधम तूं सूत, तुला युद्धमृति नव्हे उचिता.
परगति पावों पाहसि; परि पदरीं फार पाहिजे शुचिता. ॥५६॥
उचित प्रतोदधारण तुज, चापग्रह नव्हे उचित रंगीं.
पावनता निजधर्मीं, गंगेच्याहि न तसी शुचितरंगीं. ॥५७॥
अंगविषयराज्यपदीं अनुचित तूं रे ! नराधमा ! उतरें.
पात्र पुरोडाशाला झालें आहे कधीं तरी कुतरें ? ’ ॥५८॥
उपहास असा परिसे, परि सेनानीपिता तसा साहे.
किंचित्प्रस्फुरिताधर कर्ण व्योमस्थ रविकडे पाहे. ॥५९॥
कल्यंश म्हणे, “ भीमा ! या बोलें मानितील विषम दहा.
न वदावें कटु पटुनें. बोले भुजवीर्यगर्वविषमद हा. ॥६०॥
‘ जे जे कोणी क्षत्रिय त्यांसि बळ ज्येष्ठ ’ हेंचि सन्मत रे !
अबळ न अहितोदधिला घेउनिहि क्षत्रियांत जन्म तरे. ॥६१॥
जेथें बळ गुण तो गुरु; शूर बळा मानिती, न कुळशीला.
गुणहीन शाल्मलि वृथा; लघु न म्हणति, भजति साधु तुळशीला. ॥६२॥
शूरांच्या, तटिनींच्या ठेविति सुगुणीं, न मन कवि प्रभवीं.
भजति स्वगुरुत्वेंचि; न पाहति कुळशीळ कनकविप्रभवीं. ॥६३॥
उदकापासुनि झाला वैश्वानर, कृत्तिकासुत स्कंद
मंद प्रताप त्यांचा म्हणेल तो मूर्खतालताकंद. ॥६४॥
असुरांसि जो स्वतेजें घूंकांला अर्कसाचि तापवितो,
झाला दधीचमुनिच्या अस्थीपासूनि जन्मता पवि तो. ॥६५॥
ज्याच्या यशोमृतरसें झाली आहे सदैव धौत मही,
विश्वामित्र क्षत्रियपुत्र, शरस्तंबजात गौतम ही. ॥६६॥
द्रोणगुरुहि कलशोद्भव, तुमचाहि प्रभव मज असे कळला.
सांग स्वयोनिदोषें तेजस्वी यांत कोण तो मळला ? ॥६७॥
सर्वसुलक्षणमंडित, सकवचकुंडल, जगीं असामान्य,
तेजोराशि उपजला, वद दुसरा कोण रे ! असा मान्य ? ॥६८॥
प्राकृत योषा याची जननी, हें तों न येचि युक्तींत;
पिकतें मौक्तिक मुक्ताशुक्तींतचि, तें न अन्य शुक्तींत. ॥६९॥
प्रसवे व्याघ्रास मृगी ? काय उकिरड्यांतही हिरा पिकतो ?
जर्हि वाढला कुलायीं काकाच्या काक काय रे ! पिक तो ? ॥७०॥
स्वल्पा न अंगराज्या, समुचित हा सार्वभौमपदवीतें.
आज्ञाकरा मज असें कर्णाचें भाग्य भावि वदवीतें. ॥७१॥
हें ज्याला मानेना तेणें म्हणतील जीप्रति ज्ञाते
अत्युग्रा करुनि असी सिद्ध करावी रणीं प्रतिज्ञा ते. ॥७२॥
शत्रु उठावा आम्हांदेखत लावूनि अंघ्रि चापातें;
आम्हांसि वधू कीं हो हतमस्तक अस्मदंघ्रिच्या पातें. ” ॥७३॥
ऐसी रंगी वदला धृतराष्ट्रकुमार तो यदा वाणी,
हाहाकारें गर्जति तों रंगीं लोक तोयदावाणी. ॥७४॥
व्हावा रण; परि जावुनि अस्ता तो समय साधु रवि टाळी,
कुद्धेक्षणांसि देउनि तेज जगद्वांधवत्व न विटाळी. ॥७५॥
किति म्हणति, ‘ रंजवाया वारुण्यबळेसि अर्यमा वळला. ’
किति वदति ‘ कलि न व्हावा म्हणउनि तेजस्विवर्य मावळला. ’ ॥७६॥
अक्षत गृहासि गेले, सर्व करी कुशळ अर्क, राहो तें;
ज्ञातसुतपृथेसि तसें होय, जसें त्यजुनि शर्करा होतें. ॥७७॥