झाले पांच सुरद्रुमसम सुत, आनंद पांडुचा पिकला.
पिक लाभला बहुदिसां आम्रांला, सुरभि ज्यामधें टिकला. ॥१॥
त्यावरि वसंतकाळीं, एकांतीं, रम्यानंदनाभवनीं,
माद्री अनुसरली, जसि सेवी त्या पूरुनंदना भवनीं. ॥२॥
होता विरक्तिभस्माच्छादित कामाग्नि पांडुहृत्कुंडीं;
फुकिला, सुरभिवनश्रीधमनी काळें धरूनियां तुंडीं. ॥३॥
पावे स्मराग्नि, जागा होता, स्त्रीदृष्टिसर्पिराहुतिला.
लोपे विवेकशशिरुचि मुनिशापचि होय दर्पि राहु तिला. ॥४॥
धृति नव्हति काय ? मुनिचा नव्हता तो विदित काय कोप तिला ?
परि होणार चुकेना ! वारूं न शकेचि बायको पतिला. ॥५॥
स्मरकाळमूढ पांडु प्रेमें आलिंगुनि स्वरामेला,
सुरतीं प्रवर्तला जों, झाला मुनिशाप तो खरा,मेला ! ॥६॥
दृङ्मीलन निश्चलता पांडूची प्रथम भासली सुरतें.
मग मरण समजलें, हो ! झालें वपु शीत कांतिभासुर तें. ॥७॥
माद्री, ‘ हा प्राणेश्वर ! हा देव ! ’ असे करी विलाप वनीं.
ते नेउनि भेटविले क्षिप्र तिचे शब्द कुंतिला पवनीं. ॥८॥
ससुता कुंती तेथें जाय म्हणे, ‘ हाय ! माद्रि ! हें काय ?
शाप विदित असतां, त्वां स्पर्शों द्यावें पतीस हें काय ? ॥९॥
क्षणसुखलोभें मूढे ! एकांतीं कांत भुलविला, साचा
केला घात ! कसा गे ! या व्यसनीं काम तुज विलासाचा ? ॥१०॥
माद्री म्हणे, ‘ न म्यां, नरदेव नियतिनेंचि, भुलविला साचा,
बाइ ! हरि पुढें दिसतां आठवहि करेणु करि विलासाचा ? ॥११॥
दीपकलिकेसि धावुनि आलिंगी आग्रहें पतंग जसा,
पडला गळांचि माझ्या; रंभेच्या दीप्तमद मतंगजसा, ॥१२॥
कुंती म्हणे, ‘ पतीसीं मीं जात्यें, ऊठ, तूं मुळें पाळीं. ’
माद्री म्हणे, ‘ मला दे आज्ञा, माझ्याचि हें असो भाळीं. ’ ॥१३॥
तूंचि मुलें रक्षाया दक्षा, यादवि ! न मीं, तुझी ममता
सर्वत्र तुल्य आहे; राहेल न मन्मनीं असी समता. ॥१४॥
दे मज अग्नि, स्वर्गीं पतिसह सुकृतें तुझ्याचि जाईन.
बाई ! न दया टाकीं, तेथें मीं त्वद्गुणासि गाईन. ॥१५॥
कुंतीनें माद्रीची सफळा सहगमन - कामना केली.
नियतीमना ये त्यांचा सवतीच्या ये न कां मना केली ? ॥१६॥
शतशृगवासि मुनिजन झाला तेथें समस्त एकवट;
आश्रय मुनिला बुडतां, कुंतीसहि होय तोचि एक वट. ॥१७॥
त्या पांडुकुटुंबातें ते साधु महर्षि गुह्यकवनांत
उघडें पडों न देती, सुकवि जसे वेदगुह्य कवनांत. ॥१८॥
पंच सुतांसह कुंतीप्रति समजावूनि, आपुल्या संगें,
संस्कार घडायास्तव त्या दोघांचींहि आणिती अंगें. ॥१९॥
येउनि पुरासि केलें मुनिनीं तें स्वांघ्रिशुद्धिवृत राष्ट्र.
भेटाया आणविले सत्यवती - भीष्म - विदुर - धृतराष्ट्र. ॥२०॥
वृत्त कथुनि, बाळ, पृथा भेटवुनीं, दाखवूनि अस्थि, ‘ रहा
धैर्यनयें, धर्मपथीं, ’ मुनि म्हणति, ‘ असाचि, अर्थ अस्थिर हा. ’ ॥२१॥
मुनि गेले, झालें तें पाडूमरणवृत्त धृतिनगीं भिदुर.
करवी उत्तरकार्य प्रज्ञाचक्षुर्मतें सुधी विदुर. ॥२२॥
विध्युक्त पारलौकिक झाल्यावरि पुत्र पांडुचे गेहीं
नेले, गमले, सिरले ते पंचप्राण टाकिल्या देहीं. ॥२३॥
त्यावरि मातेसि कथी व्यास कुरुकुळीं अनर्थ जो भावी;
धाडी तपोवना; कीं, ती स्वर्गीं तप करूनि शोभावी. ॥२४॥
दोघी सुनाहि घेउनि, भिष्मासि पुसोनि, जाय ती न टिके.
त्यजिले आप्तजन तसे, स्वप्नींचे अर्थ ते जसे लटिके. ॥२५॥
गेल्या तिघीहि उत्तमलोकीं त्या धरुनि कास योगाची.
पडली गळांचि त्यांच्या निःसीम समृद्धि दिव्यभोगाची. ॥२६॥