शौनक सौतीसि म्हणे, ‘ सत्रीं कर्मांतरीं कथा व्यासें
कथिल्या नृपा तस्या त्या वाटे आम्हां तुवां कथाव्यासें. ’ ॥१॥
सौति म्हणे, ‘ परिसा जी ! कथनीं आहे मलाहि हव्यास;
सांगेन तेंचि, वदला नृपतिप्रति जें सुखावह व्यास. ’ ॥२॥
व्यासासि म्हणे राजा, ‘ संतति संरक्षिली तुवां कुरुची;
क्षयहेतु विरोधाची उठली तीच्या मनांत कां कु - रुची ? ॥३॥
कौरव पांडव बंधू, वेर कसें त्यांत वाढलें ? अजि ! तें
सांगा, न वारिलें त्वां प्रभुनें कां ? त्याहि ईश्वरें अजितें ? ’ ॥४॥
श्रीव्यासें स्वच्छात्र श्रीवैशंपायना दिली आज्ञा;
‘ पूर्वजकथा कथावी राया जनमेजया तुवां प्राज्ञा ! ’ ॥५॥
सांगे वैशंपायन संक्षेपें प्रथम सर्वही, परि तें
तृप्ति न दे, म्हणुनि पुन्हां सांगे राया सविस्तरें चरितें. ॥६॥
उपरिचरवसुकथा, जी मुनिगीता, आयका कवी हो ! ती.
हेचि सुधा; तुळितां तरि, बहु बोलों काय ? काकवी होती. ॥७॥
पुरुवंशज वसु पूर्वीं उग्र तप करि प्रजावन त्यागी;
त्यासि हरि म्हणे, ‘ तुज भूत्राणचि हित, हे नव्हे असत्या गे. ’ ॥८॥
सुरमुनिहि तसेंचि म्हणति; मग वसु तें मान्य करि; तया माळा
यष्टि, स्फटिक, विमानहि दे शक्र सख्या स्वचेदिभूपाळा. ॥९॥
तो हरिदत्तविमानीं हरिसा साजे; म्हणोनियां प्रणती
करुनी, ‘ उपरिचरवसु ’ प्रेमें गंधर्व अप्सरा म्हणती. ॥१०॥
होती नदी श्रुतिमती त्याच्या नगरासमीप जी, तीतें
रोधुनि बळेंचि कोलाहलनग भोगी, त्यजूनि नीतीतें. ॥११॥
तटिनीस सोडवाया, बळसिंधु नृपति, जसें विटा मत्ता,
त्या कोलाहलगिरिला हाणी, अशनी जसी, तसी लत्ता. ॥१२॥
पादाघातें पडलें विविअर; तयांतूनि ती निघोनि, नृपा
अर्पुनि नगज सुत - सुता, ‘ मजवरि केली ’ म्हणे ‘ उदंड कृपा. ’ ॥१३॥
सेनापति करुनि तिचा सुत, वसुनें तत्सुतेहि गिरिकेला
स्त्रीत्वें वरूनि विधिनें, श्वशुरत्वें धन्य तोहि गिरि केला. ॥१४॥
गिरिकेच्या ऋतुकाळीं केली आज्ञा स्वयेंचि पितरानीं;
म्हणुनि मृगयार्थ गेला, संपादाया तदीय हित रानीं. ॥१५॥
तें वन चैत्ररथोपम, खवळी कामासि, म्हणुनि गिरिकेला
वसुनृप चिंती; मदनें वश तो तत्काळ धैर्यगिरि केला. ॥१६॥
चित्तांत चिंतितांचि स्त्रीसंगसुखासि शुक्रपात घडे;
पत्रपुटीं द्फ़्हरुनि, वसु क्षितिपति पळमात्र संकटांत पडे. ॥१७॥
वीर्य अमोघ व्यर्थ न जावें, ऐसा विचार आठविला;
तें स्त्रीस द्यावयाला, मग खग नगरासि शीघ्र पाठविला. ॥१८॥
पत्रपुट धरुनि तुंडीं श्येन उडे, त्यासि धांवतां अडवी
आमिषशंकी अन्य श्येन नभीं; दैव अन्यथा घडवीं. ॥१९॥
ते श्येन तुंडयुद्धीं जेव्हां खपथीं प्रवर्तले दोघे,
तेव्हां पादनखानीं पत्रपुटातें धरूनि खग तो घे. ॥२०॥
तें वसुवीर्य गळालें, श्येनाचें चित्त गुंततां युद्धीं;
पडलें दैवनियोगें श्रीमद्भास्करसुतोदकीं सुद्धीं. ॥२१॥
त्यातें मत्स्यी प्राशी; ती तैसी अद्रिकाप्सरा शापें
विधिच्या झाली होती, आपण संपादिल्या तशा पापें. ॥२२॥
शापान्तहि, वसुवीर्यें प्रसवोनि अपत्ययुग, तिचा विधिनें
केला होता निश्चित, पूर्वीं शापूनिही दयानिधिनें. ॥२३॥
वसुवीर्य सेविल्यावरि, मास दहावा भरे, अशा काळीं
सांपडली दाशांला तो, त्या यमुनेंत टाकिल्या जाळीं. ॥२४॥
चिरितां अपत्ययुग दे, मुक्तायुग उकलितां जसी शुक्ती;
तत्काळ अद्रिका त्या शापापासूनि पावली मुक्ती. ॥२५॥
ते त्या उपरिचराला आश्चर्यें दाश दाविती बाळॆं;
कन्या दाशांसि दिली, सुत आपण घेतला धरापाळें. ॥२६॥
तो मत्स्यनाम राजा; जी दाशपतीसि ओपिली कन्या
ती सत्यवती, धीवरवरसदनीं वाढली सती धन्या. ॥२७॥
त्या कन्येच्या देहीं मीनाचा गंध येत होता; तें
परि वपु निरुपम; रक्षी यमुनातीरीं स्वतात - पोतातें. ॥२८॥
त्यावरि, ज्याच्या जन्में होय वसिष्ठ स्वयें परमहर्षी,
तीर्थाटनप्रसंगें तेथें आला पराशर महर्षी. ॥२९॥
वंदुनि सत्यवतीनें बैसविला निजतरींत उतराया;
झाला प्रसन्न विनयें, निरुपमरूपेंहि, शक्तिसुत राया ! ॥३०॥
दिव्यज्ञानमुनि म्हणे, ‘ सुंदरि ! मज अंगसंग दे; हरितें
त्वद्रूप मन्मनातें; कामज्वर नुरवि तिळहि देह रितें. ’ ॥३१॥
ती त्यासि म्हणे, ‘ दोहीं तीरीं सर्वत्र विप्र आहेत;
दिवसा, अशा प्रकाशीं, तुमचा कैसा घडेल हा हेत ? ’ ॥३२॥
करि अंधकार तेथें, निर्मुनि तो योगिराज नीहार;
त्यावरुनि, मनिं म्हणे ती, ‘ दुर्लभतम होय हा जनीं हार. ’ ॥३३॥
विनवुनि ती त्यासि म्हणे, ‘ गुरुजन द्ती वरासि कन्या; या
मार्गासि लंधितां, मीं प्रभुजी ! होईन पात्र अन्याया. ’ ॥३४॥
तो मुनि हांसोनि म्हणे, ‘ स्वपरांच्या दूषणासि कवि टाळी;
‘ हूं म्हण; माग वर; सुमुखि ! कोणासहि साधुसंग न विटाळी. ॥३५॥
‘ देहीं दुर्गंध नसो ’ ऐसा वर मागतांचि दे; हातें
स्पर्श करुनि, करि विप्र क्षिप्र तिच्या दिव्यगंध देहातें. ॥३६॥
योग्यत्व अंगसंगीं आलें; कुदशा, त्यजूनि तनु, सरली;
योजनगंधा मुनिला, जसि गंगा शंकरासि, अनुसरली. ॥३७॥
अदयमुनिनें भवाध्वश्रांतांचें दुःख हेरिलें; रेतें
नच उतला; सुक्षेत्रीं कल्पद्रुमबीज पेरिलें रे ! तें. ॥३८॥
वाटे, सोडुनि जातां, गर्भवती निरविलीच यमुनेतें;
वदली असेल तीही, ‘ विसरावें स्ववरदान न मुने ! तें. ’ ॥३९॥
यमुनाद्वीपीं झाली तत्काळ सुखप्रसूति; सुत पातें
हालों न दे पहातां; करि कौतुक शक्तिपुत्र सुतपा तें. ॥४०॥
प्रसवें कन्याभाव न मळला; पळ लागलें न सुटकेला.
सत्यवतीकुक्षीनें लज्जीत सद्रत्नशुक्तिपुट केला. ॥४१॥
तो उपजतांचि झाला प्रौढ मुनि; स्वजननीस करि नमन;
तीस म्हणे ‘ येतों मीं; स्मरतां, भेटोनि, हृष्ट करिन मन. ’ ॥४२॥
द्वीप अयन - आश्रय - त्या मुनिसि उपजतां, म्हणोनि, कवि त्यातें
‘ द्वैपायन ’ म्हणति नृपा ! अज्ञानमहातमिस्रसवित्यातें. ॥४३॥
होतिल बहु कलिमलिनप्रज्ञ जन न पावतील भव्यास;
यास्तव करी चतुर्धा वेदविभागासि, म्हणुनि, तो व्यास. ॥४४॥
ऐसा भगवान् व्यास ब्राह्मणरूपें मुकुंद अवतरला;
जन, ज्याच्या उपदेशें, निजहित जाणुनि, सुखेंचि भव तरला. ॥४५॥
या श्रीव्यासप्रभुला वंदुनि, मीं भारतेतिहासरस
पाजीन तुम्हां श्रोत्यां, अमृतरसाहूनि फार हा सरस. ॥४६॥
दितिज, दनुज, राक्षस बहु, धरुनि मनुष्यादिरूप, या महिला
पीडीति अधर्मभारें, धरुनि सुरद्वेष मानसीं पहिला. ॥४७॥
निजभरपरिहारार्थ प्रार्थी श्रीपद्मयोनिला अवनी;
तो देवांसि म्हणे, ‘ जा अंशें, व्हा सिद्ध भूमीच्या अवनीं. ’ ॥४८॥
इंद्रें विष्णु विनविला; झाला वसुदेवपुत्र तो अंशें;
ज्याच्या उदयें लोकीं वरिलें सद्यश सुधांशुच्या वंशें. ॥४९॥
बळदेव शेष झाला; यादव देवांश, भीष्म वस्वंश;
जेणें निजप्रतापें कुरुचा नाहीं बुडों दिला वंश. ॥५०॥
मांडव्याच्या शापें झाला यमधर्म शूद्रयोनिजनी;
कुरुच्या वंशीं तेजें भीष्म विदुर हींच दिव्य दोनि जनीं. ॥५१॥
सूर्यांशें कुंत्युदरीं कर्ण उपजला; तसाचि जो द्रोण
तो अंश बृहस्पतिचा; तैसा होता सुविद्यजन कोण ? ॥५२॥
तो रुद्रकाळकामक्रोधांशोत्पन्न हें नृपा ! जाण
जो द्रोणाचार्याचा अश्वत्थामा बहिश्चर प्राण. ॥५३॥
रुद्रगणांशोद्भव कृप, शकुनिनृप द्वापरांशज ख्यात;
मरुदंशज कृतवर्मा; द्रुपदहि, शैनेय तोहि, तज्जात. ॥५४॥
गंधर्वपति अरिष्टानंदन, नामेंकरूनि जो हंस,
तो धृतराष्ट्र, सुयोधन कळि, केला ज्या खळें कुळध्वंध. ॥५५॥
दुर्योधनानुजन्मे पौलस्त्य; तयां न साधु मानावें.
विस्तरभयें तयांचीं मीं सांगेंनाचि सर्वथा नावें. ॥५६॥
पहिला दुर्योधननृप; तदनुज दुःशासनाख्य तो दुसरा;
दुःसह, दुःशल, ऐसे शत झाले, मकर कुरुकुळा सुसरा. ॥५७॥
वेश्यापुत्र युयुत्सु स्तुत्य, शतावेगळाचि तो त्यांत;
जैसें गुणें अधिक गजमौक्तिक एकचि अनेक मोत्यांत. ॥५८॥
अत्र्यंश पांडुराजा; त्याच्या दोघी सुलक्षणा भार्या,
त्या सिद्धिधृती कुंती माद्री झाल्या सुरांचिया कार्या. ॥५९॥
त्यांचा ठायीं झाले जे, कुरुचा भूषवावया वंश,
सुत पांच, धर्ममारुतहरिदस्त्रांचे प्रसिद्ध ते अंश. ॥६०॥
शच्यंश द्रुपदसुता झाली, साध्वीजनीं जिची अर्चा.
कृष्णानुजोदरज जो अभिमन्यु सुधांशु - पुत्र तो वर्चा. ॥६१॥
कुरुगुरुशिरोंबुजातें जो धृष्टद्युम्न धरुनि असि खंडी
तो अग्न्यंश; नृपाळा ! राक्षस तो, सुर मनुष्य न शिखंडी. ॥६२॥
प्रतिविंध्य युधिष्ठिरसुत, सुत सोम वृकोदरात्मज ख्यात;
श्रुतकीर्ति - शतानीक - श्रुतसेनांचे क्रमें तिघे तात. ॥६३॥
हे पांच द्रुपदसुताकुक्ष्युद्भव अंश विश्वदेवांचे;
अवतरले अंश असे, बहु सुखवायासि विश्व, देवांचे. ॥६४॥
जो विप्रचित्ति दानव, तोचि जरासंधनृप महासत्त्व;
शिशुपाळ हिरण्यकशिपु; कंसहि तो काळनेमि हें तत्व. ॥६५॥