समाजाची उत्क्रान्ती; राजसत्ता व कुटुंबस्वामी
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
जगाचा साधारण क्रम पाहू जाता समाजाची पहिली स्थिती रानटी असते, व ती हळूहळू क्रमाने स्थिरावत जाऊन तिला नियमबद्ध सुधारणेचे रूप येते. स्थिती कोणतीही असो; स्त्री आणि पुरुष यांस सृष्टिधर्माप्रमाणे अन्योन्याची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, व ती अपेक्षा दोघेही हरप्रकारे भागवून घेतातच. प्राणिमात्र - मग ते उद्भिज्ज कोटीपैंकी का असेना - त्यामध्येदेखील हे स्त्रीपुरुषसंयोगाचे तत्त्व आहेच आहे, या न्यायाने अगदी रानटी स्थितीतसुद्धा त्या तत्त्वाचा अंमल होणारच, व तो झाला म्हणूनच तर प्रजावृद्धी होऊन कालान्तरी समाज एकत्र राहू लागण्यापर्यंत मजल आली.
अशा समाजात स्त्रिया व पुरुष एकत्र गोळा झाले, तथापि पुरुषवर्गात जो इतरांपेक्षा अधिक प्रबळ असेल त्याने आपल्या इच्छेस येईल त्या वेळी पाहिजे त्या एक अगर अनेक स्त्र इया आपल्या ताब्यात ठेवून दुसर्या कोणास त्या मिळू देऊ नयेत; दुसर्या कोणापाशी एखादी विशेष तरुण अथवा सुंदर स्त्री आढळली, तर तिचे हरण करावे; प्रसंगी मारामारी करून दुसर्या पुरुषाचा खून करण्यासही मागेपुढे पाहू नये; एकान्त स्थळी एखादी स्त्री आढळली, व तिजविषयी मनात इच्छा उत्पन्न झाली, तर तिच्या कबुलीची अपेक्षा न धरिता तिजवर जुलूम करण्यास प्रवृत्त व्हावे; समाजात अद्यापि नात्याची कल्पना उत्पन्न झाली नसल्यास भाऊबहिणी इत्यादिकांमध्येदेखील अन्योन्यसंयोगाचे व्यापार घडावे, - इत्यादी प्रकारचा घोटाळा नेहमी चालू रहावयाचाच.
वासना मनात उद्भवली की ती बरी अथवा वाईट कशीही असो, तिची तृप्ती करून घेण्याकडे प्रत्येक व्यक्तीची निसर्गत:च धाव असावयाची. समाजात भांडणतंटे नेहमी चालू राहून अनेक वेळी सुंदोपसुंदांच्या भांडणापर्यंत मजल पोचून एखाद्या स्त्रीच्या पायी व्यक्तीव्यक्तींचे नाशही होत राहावयाचे. स्त्रीप्राप्तीसाठी अगर गाईगुरांची लूट मिळविण्याकरिता परक्या समाजांशी भांडणे, लढाया इत्यादी प्रकारही निराळे चालावयाचेच; व अशा अनेक गोष्टी एकवटत राहून अखेर ‘ बळी तो कान पिळी ’ या तत्त्वावर निरनिराळी राजकुळे उत्पन्न होऊन, प्रत्येकाच्या ताब्यात अनेक कुटुंबे, याप्रमाणे व्यवस्था व्हावयाची.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP