मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|विवाहाचे आठ प्रकार|
ब्राह्मादी चार विवाहांचा संकोच

ब्राह्मादी चार विवाहांचा संकोच

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


ब्राह्म, दैव, आर्ष व प्राजापत्य हे चार विवाह फ़क्त ब्राह्मणांसच उक्त म्हणून सांगितले आहेत, त्या अर्थी कन्या नग्निका स्थितीत असेतोपर्यंत, म्हणजे कन्येला रजोदर्शन होण्यापूर्वीच, पिता तिला हातानिराळी करून टाकीत असे. अर्थात स्मृतिकाळी निदान ब्राह्मणवर्णात तरी बालविवाहपद्धती होती, असे मानणे जरूर दिसते. अरण्यात राहणारे ब्राह्मण आणि नगरात राहणारे ब्राह्मण यांच्या परिस्थिती अर्थातच निरनिराळ्या, तेव्हा त्यांचा परिणाम त्यांच्या नित्याचारावर, व त्याचेचबरोबर यज्ञयाग, संस्कारकृत्ये इत्यादी गोष्टींवर झाल्याशिवाय राहिला नसेल हे निराळे सांगणे नकोच.
त्या काळी राजेलोकांची व इतर धनिकांची ब्राह्मणमंडळीवर श्रद्धा अधिक असल्यामुळे त्यांजकडून ब्राह्मणांस द्रव्यादिद्वारा मदत होत असेल; तथापि ही मदत देण्यास अरण्यवासी ब्राह्मणांकडे मुद्दाम कोणी उठून जाण्याचा संभव फ़ार थोडा, व नगरवासी ब्राह्मणांसच या मदतीचा अधिक मोठा भाग मिळत असता ब्राह्म आणि प्राजापत्य या प्रकारचे विवाह करण्याची प्रवृत्ती बहुधा नगरात अधिक व दैव आणि आर्ष यांची प्रवृत्ती अरण्यात विशेष, असे असण्याचा संभव दिसतो.
साधेल तोपावेतो ब्राह्मविवाह घडावा अशी दोन्ही ठिकाणच्या लोकांची इच्छा खरी; तथापि अरण्यातील ब्राह्मणांपाशी जामात्यास शुल्क ( देणगी ) देण्याचे सामर्थ्य प्राय: कमी असणार, व प्रसंगविशेषी ते नसणारही.
तेव्हा तशा स्थितीत थोड्या खर्चात विवाह आटपून घेण्याचा स्वाभाविक मार्ग हाच काय तो राहतो. नगरवासी लोकांत जे कोणी विशेष धर्माचरणी व सदाचारसंपन्न असतील, ते कदाचित ब्राह्माशिवाय इतर विधीचे नाव घेत नसती, परंतु ज्यांची स्वत:ची धर्मश्रद्धा बेताबेताची, व ज्यांचे आचारसंपन्नतेचे मानही त्याच तोलाचे, असे लोक जावयाची योग्यता आपल्या स्वत:हून निराळ्या प्रकारची असण्याची अपेक्षा बाळगीत असतील असे संभवत नाही. त्यांची दृष्टी जावई व आपली कन्या या उभयतांचा संसार जगाच्या रीतीप्रमाणे चांगला चालावा एवढ्यापुरतीच असावयाची, व तशी दृष्टी असल्यामुळे जावयापासून हडसून खडसून करारमदार वगैरे करून घेण्यापर्यंत त्यांची साहजिक मजल येत असली पाहिजे. असे करारमदार होणारा विवाहविधी म्हणजेच प्राजापत्यविधी हे मागे सांगितलेच आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP