मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|विवाहाचे आठ प्रकार|
ही स्थिती व्यवहाराशी जुळतीच आहे

ही स्थिती व्यवहाराशी जुळतीच आहे

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


वास्तविक विचार करू गेल्यास अशी स्थिती होणे हे जगातील व्यवहारास अनुसरूनच आहे. स्मृतिकाळी ऋषिमंडळाची कुळे अरण्यात क्वचित कोठे रहात असली तथापि जागोजाग नगरांची रचना पण झाली होती. अरण्यात राहून नैष्ठिक ब्रह्मचर्याची कडकडीत दीक्षा घेऊन राहणारे लोक कोठे कोठे असले, तरी नगरात वास पत्करल्यामुळे तशी दीक्षा पाळण्यास असमर्थ व व्यावहारिक मार्गाचे अनुसरण करणारे, अशा लोकांची संख्या अधिक असली पाहिजे.
शिष्यवर्गाची नीतिमत्ता सुटत जाऊन पंचमहापातकांपैकी एका महापातकाकडे प्रवृत्ती होऊ लागल्यामुळे असो, किंवा तिच्या जोडीला अन्य काही कारणे असोत, अरण्यवासात राहून वेदविद्येकडे लक्ष देण्याचा मूळचा संप्रदाय सुटत चालला असला पाहिजे; व प्रत्यक्ष गुरुपत्नीशी शिष्यवर्गांनी बोलूदेखील नये अशा प्रकारचे संशयपूर्ण व मत्सरप्रेरित निर्बंध अस्तित्वात येऊ लागून, नागरिक स्थिती पत्करण्याकडे लोकांची प्रवृत्ती साहजिक होऊ लागली असली पाहिजे. ज्या कोणाची वृत्ती उच्छृंखलपणाची नाही असे लोक कलाकौशल्ये, कृषिकर्म, व्यापारादी उपायांनी द्रव्यसंपादन, इत्यादी गोष्टींमध्ये आपले मन घालीत असले, तरी खुशालचंडू व चैनी अशा लोकांचा भरणा समाजात बराच होऊन, ते लोक आपल्या द्रव्यादी साधनांचा व काळाचा व्यय अन्य रीतीने करण्याकडे वळले असले पाहिजेत.
अरण्यवासी समाजात साधेभोळेपणा अधिक, व नीतीचे मानही त्या मानाने जास्ती, हा मूळचा प्रकार जाऊन आता नगरातील लोकांत छक्केपंजे, लबाड्या, द्रव्यांदिकांचा लोभ, स्वच्छंदी वर्तन इत्यादिकांचे प्राबल्य विशेष झाले असले पाहिजे. कोणत्याही देशास अगर समाजास अवनती येते ती या अशाच प्रकारच्या कारणांनी, हा जगाचा सर्वत्र अनुभव आहे. तेव्हा आता लिहिल्या प्रकारच्या स्थितीपासून वरील कलमात लिहिलेल्या परिणाम घडला यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP