मनुस्मृति अ. ९ श्लोक १६० पुढीलप्रमाणे आहे :
कानीनाश्च सहोढश्च क्रीत: पौनर्भवस्तथा ।
स्वयंदत्तश्च शौद्रश्च षडदायादबान्धवा: ॥
या श्लोकात सहा प्रकारच्या पुत्रांची नावे सांगितली आहेत, त्यांपैकी कोणाचाही पितृधनावर हक्क नाही. ( १ ) कानीन म्हणजे स्त्री विवाहित होण्यापूर्वीच तीस झालेला, ( २ ) सहोढ म्हणजे विवाहाच्या वेळी स्त्री गरोदर असून विवाह झाल्यानंतर जन्मास आलेला, ( ३ ) क्रीत म्हणजे विकत घेतलेला, ( ४ ) पौनर्भव म्हणजे पुनर्विवाहाच्या स्त्रीच्या पोटी झालेला, ( ५ ) स्वयंदानी म्हणजे आपले आपण दान करून दत्तक झालेला, व ( ६ ) शौद्र म्हणजे शूद्र जातीच्या स्त्रीच्या उदरी जन्म पावलेला.
या सहा पुत्रांपैकी ( ३ ) क्रीत अथवा ( ५ ) स्वयंदत्त या दोघांचा पित्याशी जो संबंध आहे तो केवळ मानीव असाच व बाकीच्या चोहोंचा साक्षात जनकत्वाचा आहे. जर पिता या चारी प्रकारच्या पुत्रांचा ‘ जनक ’ आहे, तर पुत्रांच्या दायांच्या न्यायाने त्याजकडे काही तरी जबाबदारी असलीच पाहिजे. परंतु स्मृत्कारांनी ती तशी राहिली नाही, यामुळे ‘ पुत्र ’ संज्ञेस पावूनही या चौघांस अनंश होण्याची पाळी येते ! ज्यांचे जनन ज्या मातेच्या पोटी झाले, ती स्वत:च अंशग्रहणास अपात्र ठरलेली, व तिला फ़ार तर पतीकडून अन्नवस्त्र काय ते मिळणार, अशा स्थितीत तिच्याकडून पुत्रांस मदत होण्याची आशा ती कोठून असणार ?
आपला संबंध ज्या पुरुषाबरोबर घडला तो पुरुष आपला खरा पती, व त्याच्याविषयी आपल्या मनात कायमचे प्रेम असले पाहिजे, ही कल्पना तिच्या मनात कशी राहणार ? ही कल्पना एक वेळ सुटली की, मूळच्या भार्यापणाच्या जागी दायात्वाच्या कल्पनेचा उदय होतो; व तीच कल्पना अंगवळणी पडली म्हणजे पापापुण्याची आठवणही होण्याचे बंद पडते. ही अशी स्थिती होऊ देण्याला खरे कारणीभूत म्हटले म्हणजे पुरुषच होत. स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांना प्राय: सर्वच बाबतींत राजरोस मुभा आहे; व त्यांना व्यभिचार करण्यात, - विशेषत: अंगवस्त्रे बाळगण्यात, - मोठे भूषण वाटत असते, ही गोष्ट आपण आजमितीस प्रत्यक्ष पाहतो परंतु ती नव्हे, - तर मनुस्मृतीच्या काळापासून अशीच चालत आलेली आहे.
पुरुष कोणत्याही जातीचे अगर वृत्तीतील असोत, व्यभिचाराकडे मनाची प्रवृत्ती न होऊ देणारे लोक विरळा. पुरुषांच्या मानाने स्त्रियांस स्वातंत्र्य कमी आहे, तथापि या बाबतीत त्या कित्येक शुद्धाचरणी आहेत हे त्यांस अत्यंत भूषणावह आहे. हे भूषण अर्थातच विवाहित स्त्रीवर्गापुरतेच समजले पाहिजे. ज्या स्त्रियांना विवाहाचा प्रश्नच आला नाही, अथवा ज्यांना तो येऊ देणे न्यायाचे असता समाज त्यांना तो मिळू देत नाही, अशा स्त्रियांनी अशा प्रसंगी कोणता मार्ग स्वीकारावयाचा हे निराळे सांगण्याची जरूर नाही.
कित्येक स्त्रियांस वंशपरंपरेने व्यभिचार करीत राहण्याची मोकळीक समाजाने ठेविली आहे. अशा स्त्रियांपैकी कित्येकांच्या व्यभिचारास धर्माचेही स्वरूप येऊन बसले आहे. खंडोबाच्या मुरळ्या, देवीच्या भाविणी, मद्रास प्रांताकडील देवदासी, या म्हणजे व्यभिचाराच्या मूत्री आहेत. तथापि त्यांची कृती धर्माच्या दृष्तॆएने सोवळी गणिली गेली आहे ! हे रूढ झालेले सोवळेपण काढून टाकण्याला सांप्रतचे धर्मगुरूदेखील सर्वथा असमर्थ झाले आहेत. पुढेमागे या सोवळेपणावर काही काही प्रहार होईल तर तो राजसत्तेकडून; परंतु तो होण्यापूर्वी स्वत: जनसमाजच जागृत होऊ शकेल तर तसे होणे विशेष इष्ट आहे.