मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग १६६ ते १७०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१६६.
चारी वेदां ज्याचा नयेचि उमज । करीतसे मुंज वसु-देव ॥१॥
कर्दळीचे स्तंभें वाडे शृंगारिले । गर्गासी धाडिलें आणा-वया ॥२॥
देशोदेशीं चिठया लिहिल्या वसुदेवें । मुंजीसीठीं यावें कृष्णजीच्या ॥३॥
मथुरेचे लोक आणिती आहेर । होतसे गजर वाजंत्रांचा ॥४॥
उग्रसेनें तेव्हां फोडिलें भांडार । द्विजांसी अपार द्रव्य दिल्हें ॥५॥
विष्णुदास नामा वांटितो सुपारी । झाले ब्रह्मचारी रामकृष्ण ॥६॥

१६७.
घालितसे पंथ तरावया जना । गेले संदीपना घरीं दोघे ॥१॥
गुरुसेवा करिता वंदिती चरणा । जाहली संपूर्ण विद्या तेव्हां ॥२॥
जोडोनियां हात करिती प्रार्थना । मागावी दक्षणा गुरुराया ॥३॥
नामा ह्मणे द्विज ह्मणत स्त्रियेसी । असे जें मानसीं इच्छा तुझ्या ॥४॥

१६८.
समुद्रांत पुत्र बुडाला रे माझा । पराक्रम तुझा ठावा असे ॥१॥
अवश्य म्हणोनी तेथोनी निघाले । समुद्रांत आले राम-कृष्ण ॥२॥
करोनियां पूजा पुसे वर्तमान । देईंरे आणून गुरुपुत्र ॥३॥
पांचजन्य दैत्य येथें बळी राहे । बंधु तेथें पाहे कृष्णनाथा ॥४॥
टाकोनियां उडी वधिलें तयासी । पाहे ह्लषिकेशी उदरांत ॥५॥
नाहीं ऐसें कळों आलें तें ईश्वरा । घेवोनी शरीरा आला ॥६॥
परीक्षिती काय न कळे तयाला । दावीतसे लीला नामा म्हणे ॥७॥

१६९.
यमाचिया नगरीं दोघेजण गेले । शंखातें स्फुरीलें कृष्ण-नाथें ॥१॥
ऐकोनियां नाद कांपतसे काळ । उठिले सकाळ पाहावया ॥२॥
जोडोनियाम हात आणी अधोक्षजा । करोनियां पूजा पुसतसे ॥३॥
संदीपनपुत्र आहे तुजपाशीं । आणींरे तयासी शीघ्र आंता ॥४॥
तुमचा मी किंकर निरोप हो द्यावा । रामा वासुदेवा पुसतसे ॥५॥
घेवोनियां पुत्र तेथोनी चालिले । नामा ह्मणे आले गुरुगृहीं ॥६॥

१७०.
काढीतसे दृष्टी संदपिनपत्नी । न वर्णवे वाणी हर्षं तिचा ॥१॥
असे कांहीं इच्छा मागावें आणीक । दिल्हें हें बाळक ह्मणती दोघे ॥२॥
अहर्निशीं तुझ्यां असावें कल्याण । आले रामकृष्ण मथुरेसी ॥३॥
कृतांतासी धाक नामा ह्मणे त्याचा । आहें मी तयाचा शरणागत ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP