मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग १४१ ते १४५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१४१.
देतसे दर्शन । सकळांसी नारायण ॥१॥
झाला सकळा आनंद । ह्लदयीं धरिला गोविंद ॥२॥
टा कोनियां आम्हां । कां गेलासी पुरुषोत्तमा ॥३॥
तुम्हां झाला अभिमान । नामा म्हणे सांगे खूण ॥४॥

१४२.
सकळांची इच्छा करीतसे पूर्ण । भुलला श्रीकृष्ण त्यांच्या भावा ॥१॥
विमानीं बैसोनी सुरवर पाहाती । गंधर्द गाताती सप्त-स्वरें ॥२॥
विणे वाजताती मृदंगाचे घोश । वाचे तो उल्हास वर्ण-वेना ॥३॥
न जाय चंद्रमा न जाती नक्षत्रें । पाहाती सर्वत्र रास-क्रीडा ॥४॥
जलक्रीडा करी लक्षुमीचा पती । लाळ घोटीताती देवस्रिया ॥५॥
धन्य त्या गोपिका धन्य त्यांचें पुण्य । भोगिताती कृष्ण पूर्णब्रह्म ॥६॥
नामा ह्मणे होय कामाची ते पूर्ती । नव्हे वीर्यच्युती गोविंदाची ॥७॥

१४३.
होता प्रात:काळ सांगतसे तया । जावें येथोनियां शीघ्र आतां ॥१॥
क्षणोक्षणा पाहाती देवाजीचें मुख । येती सक-ळीक गोकुळासी ॥२॥
परिक्षिती ऐके ऐका कौतुकासी । होत्या त्यांज-पाशीं त्याच्या स्त्रिया ॥३॥
ह्मणोनियां कोणी नाहीं विचारिलें । अंतरीं न कळे दुजियाला ॥४॥
यथामती रास वर्णिला देवाचा । संपूर्ण हे वाचा काय करी ॥५॥
चरित्र श्रवण करील जो कोणी । धन्य तोचि प्राणी नामा ह्मणे ॥६॥

१४४.
सरस्वती तीरीं अंबिकेचें स्थान । गोकुळींचे जन जाती तेथें ॥१॥
करोनी पूजन करिती प्रार्थना । नंदाच्या नंदना सुखी राखी ॥२॥
सारितां भोजन लपाला आदित्य । नामा ह्मणे तेथें राहाताती ॥३॥

१४५.
निद्रिस्थ सकळ तये वनीं व्याळ । गिळितसे बळें नंदालागीं ॥१॥
कृष्णा धांव वेगीं मज गिळी सर्प । काळावरी दर्प तुझा देवा ॥२॥
माझिया पाडसा येईंरे धांवोन । दाखवीं वदन अंतकाळीं ॥३॥
आली काय तुज निद्रारे कान्हया । माझिया तान्हया ऊठ वेगीं ॥४॥
ऐकोनियां ऐसें बोलती सकळ । घालिती मुसळ सर्पावरी ॥५॥
श्रमले सकळ सोडिना नंदाला । पिटी वक्ष-स्थळा नंदपत्नीं ॥६॥
उठे जगद्‍गुरु काय झालें माय । लवितसे पाय तयालागीं ॥७॥
टाकियेलें तेव्हां सर्पें कलेवर । पुरुष सुंदर दिसतसे ॥८॥
नामा ह्मणे वाचे स्तवी विश्वंभरा । करूनि नम-स्कारा जाता झाला ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP