बालक्रीडा - अभंग ९१ ते ९५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
९१.
जगजेठी तेव्हां क्रोधावला चित्तीं । करीन मी शांति तुझी आतां ॥१॥
माझिया लेंकरा दिधलासे त्रास । करीन मी नाश आतां तुझा ॥२॥
त्रैलोक्यांत कोण ऐसा हो समर्थ । माझे शरणा-गत मारील जो ॥३॥
माझिया भक्तां कोण गांजी निर्दय । करीन प्रळय त्याजवरी ॥४॥
स्फुरताती दंड कांपती अधर । उठला सत्वर जगदीश ॥५॥
कळंबाचे वृक्षीं देव चढतसे । पीतांबर गोसे खोंची-यले ॥६॥
जगद्गुरु तेव्हां पुष्पमाळा काढी । टाकितसे उडी जळा-मध्यें ॥७॥
नामा ह्मणे शोकें व्यापिलें समस्त । करूनि एकांत मने ऐका ॥८॥
९२.
घालीतसे वेढे दिसतसे जळीं । आकांत सकळीं मांडियेला ॥१॥
गडी रडताती वत्स पळताती । कपाळ पिटिती सकळीक ॥२॥
तुजवांचोनीयां रक्षी कोण आह्मां । काय सांगूं रामा सकळीक ॥३॥
रुसल्या आमुचें करी समाधान । तुजवीण वन ओस वाटे ॥४॥
आम्हांसाठीं तुवां दुष्टासी मारिलें । कोण आतां लळे पुर-वील ॥५॥
तुजवांचोनियां आह्मी सर्व दीन । न जाऊं येथून गोकु-ळासी ॥६॥
वियोगानें तेव्हां पक्षी रडताती । आतां कृष्णमूर्ती कैंची आह्मां ॥७॥
बोलोनियां ऐसें निस्तेज पडती । नदी वाहत होती स्थीरावली ॥८॥
नामा म्हणे होती दुश्चिन्हें बहुत । गोकुळीं समस्त विचारिती ॥९॥
९३.
यशोदा व्याकूळ जाहालीसे प्राणें । सुखी असो तान्हें वनामाजी ॥१॥
उठती तिडका स्तनीं माझ्या फार । लवतसे नेत्र वेळोवेळां ॥२॥
जीव तळमळी दाटे माझा प्राण । केव्हां मी पाहीन पाडसासी ॥३॥
गोकुळींचे जन निघाले सकळ । पाहाताती गोपाळ वनामध्यें ॥४॥
कालिंदीच्या तीरीं पडिले सकळ । पाहोनी कोल्हाळ करीताती ॥५॥
कपाळ पिटिती यशोदा रोहिणी । आताम चक्रपाणी कैंचा आम्हां ॥६॥
धांव धांव कृष्णा दावींरे वदना । पाजूं आतां पान्हा कोणालागीं ॥७॥
तुझिया कौतुकें कंठीं मी संसार । जळतें अंतर तुजसाठीं ॥८॥
कोणावरी आतां घालूं अलंकार । बुडालें हें घर माझें आतां ॥९॥
नामा म्हणे शोकें जाऊं पाहे प्राण । सकळाचें जीवन कृष्णनाथ ॥१०॥
९४.
नंद ह्मणे माझें बुडालें जहाज । अभाग्यासी मज कृष्ण कैचा ॥१॥
काय माझें तप संपूर्ण सरलें । ह्मणोनी बुडालें तान्हें माझें ॥२॥
चिंतेनें व्याकूळ पिटी वक्षस्थळा । दावरे सांवळा प्राण माझा ॥३॥
आलिया अतीता त्रासें दवडीलें । ह्मणोनी बुडालें बाळ माझें ॥४॥
प्रात:काळीं पाहूं कोणाचें मी मूख । येथुनियां सुख नाहीं नाहीं ॥५॥
समस्तांची दृष्टी करी तुज कष्टी । ह्मणोनी जगजेठी ठाकियलें ॥६॥
गोकुळींचे जन देऊं पाहाती प्राण । वा-चाया कारण काय आतां ॥७॥
अभय देतसे बळिभद्र सर्वांसी । मारून दुष्टांसी येईल आतां ॥८॥
अंतर्यामीं जाणे जन झाले वेडे । नामा ह्मणे वेढे काढितसे ॥९॥
९५.
तयाचे मस्तकीं नाचे नारायण । आरंभी गायन जग-दीश ॥१॥
त्रैलोक्याचा भार घाली ह्लषीकेशी । दमीत दुष्टासी स्वामी माझा ॥२॥
होतां एक क्षण झाला तेव्हां क्षीण । जाऊं पाहे आण काळीयाचा ॥३॥
तेव्हां त्याच्या स्त्रीया करिताती स्तुती । लक्षुमीच्या पती कृपाळूवा ॥४॥
यज्ञेशा अच्युता गोविंदा माधवा । दयानिधि केशवा कृष्णनाथा ॥५॥
श्रीधरा वामना अगा वासुदेवा । ऐकावी ही देवा विज्ञापना ॥६॥
आह्मांलागीं आतां देईं चुडेदान । धरिती चरण कृष्णजीचे ॥७॥
दीना़चा दयाळ दासाच्या कैवारी । नामा ह्मणे हरि उतरला ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP