मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग १३१ ते १३५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१३१.
शरणागता तारी भवसिंधु त्वरीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥१॥
अरण्यांत दुष्ट दैत्यांसी मारीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥२॥
वेणू पांवा जया हातांत शोभत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥३॥
घेवोनी शिदोर्‍या गडयांसी वांटीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥४॥
रक्षावया व्रजां उचलिला पर्वत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥५॥
सुवर्णाचीं कडीं भूषणें अमूप । पाहतां निष्पाप नामा म्हणे ॥६॥

१३२.
अभिमानें घाला घातला आह्मांसी । म्हणून लपलासी देवराया ॥१॥
तुजवांचोनियां जाऊं पाहे प्राण । दाखवी वदन एक वेळा ॥२॥
मुकुट कुंडलें श्रीमुख सांवळें । केशरी लविलें गंध भाळीं ॥३॥
पाहोनियां जीवीं होय फार मुख । हरेल ही भूक डोळियांची ॥४॥
तुजवांचोनी आम्हां नाहीं कोणी । तिहीं त्रिभुवनीं नामा म्हणे ॥५॥

१३३.
चरणासीं शरण तुझिया जे येती । तेचि उतरती भवसिंधू ॥१॥
लक्षुमीनें ज्यातें असे आराधिलें । ठेवीं तीं पाउलें स्तनावरी ॥२॥
आवडीनें शिवें मस्तकीं वंदिलें । ठेवीं तीं पाउलें स्तनावरी ॥३॥
नामा ह्मणे ऐशी करिताती स्तुती । शिंपीयेली क्षिती अश्रुपातें ॥४॥

१३४.
आम्हावरी कांरे धरियेला राग । काय तुझें सांग आम्हीं केलें ॥१॥
रडतसों आम्हीं मारितसों हांका । विश्वाच्या जनका नायिकसी ॥२॥
कामाग्नीनें आम्हीं जळतों सकळ । करावें शीतळ अधरामृतें ॥३॥
नामा म्हणे देईं एक वेळ भेटी । तुजसाठीं कष्टी फार होती ॥४॥

१३५.
वाजवोनी वेणू पसरिलें जाळें । आम्हांसी न कळे कपटिया तूं ॥१॥
दुखवोनी सर्वां टाकियेलें वनीं । गेलासी वधुनी पारधिया ॥२॥
धरूनियां धीर न राहावे कृष्णा । देऊं मग प्राणा सकळिकां ॥३॥
सकळांच्या हत्या येती तुजवरी । नामा म्हणे हरि भेट आतां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP