बालक्रीडा - अभंग १३६ ते १४०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
१३६.
त्रिविधतापें प्राणी होताती संतप्त । शीतळ करीत कथामृतें ॥१॥
अमृतापरीस तुझी कथा अधिक । सांगतसे ऐक देव- राया ॥२॥
स्वर्गीं जें अमृत प्राशन करिती । पुण्य सरल्या येती मृत्यु लोकां ॥३॥
तुझी कथा देत अच्युत पदासी । न विचारीं मा-नसीं याति कांहीं ॥४॥
नाहीं चतुराई बोबडे हे बोल । संतोषे विठ्ठल नामा ह्मणे ॥५॥
१३७.
गायी घेवोनियां जासी जेव्हां राना । आमुचिया मना दु:ख वाटे ॥१॥
सुकुमार सांवळीं जैसीं रातोत्पळें । त्याहूनि कोंवळे पाय तुझे ॥२॥
खडे कांटे बहू कठिण तृण मुळें । ठेवीसी पाउलें त-यावरी ॥३॥
पावतोसी क्लेश अगा वासुदेवा । म्हणोनियां जीवा दु:ख वाटे ॥४॥
सांगतसों आम्ही नित्य यशोदेसी । धाडूं नको यासी वनामध्यें ॥५॥
नामा म्हणे होय सकळांचा उद्धार । म्हणोनी श्री-धर वना जाय ॥६॥
१३८.
तुजवांचोनियां वैकुंठनायका । आह्मांसी घटिका युग होय ॥१॥
अस्तमान होतां येसी तूं गोकुळीं । मुखावरी धुळी गोर-जांची ॥२॥
कुरळ हे केंश सुंदर नासिक । पाहोनियां सुख फार होये ॥३॥
लवती पांपण्या न सोसती आह्मां । अहिर्निशी नामा हेंचि गाय ॥४॥
१३९.
टाकियेलें आम्हीं पतिबंधुसूतां । आलोंत अच्युता तुजपाशीं ॥१॥
आमुची ही इच्छा करिशील पूर्ण । आहेसी कठीण ठावें नाहीं ॥२॥
घालोनियां कूपीं कापियेला दोरा । साधियेलें वैरा आपुलिया ॥३॥
वरोनियां टाकी मोठासा पर्वत । म्हणती समस्त नामा म्हणे ॥४॥
१४०.
तुझे भेटीविण । जाती सकळांचे प्राण ॥१॥
दया तुझिया मना । कांरे नये नारायणा ॥२॥
बोलवेना आतां । कंठ शोकला अनंता ॥३॥
ऐसें पाहोनियां । नामा म्हणे आली दया ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP