बालक्रीडा - अभंग १ ते ५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
१.
लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चि-न्हांचा ॥१॥
चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥
भव्यरूप तुझें उंदीरवाहना । नमन चरणा करीतसें ॥३॥
तुझें नाम घेतां दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या नामें ॥४॥
चौदा विद्या तुझे कृपेनें येतील । मुके बोलतील वेदघोष ॥५॥
रूणझुण पायीं वाजताती वाळे । ऐकोनी भुललें मन माझें ॥६॥
भक्तवत्सला एकें पार्वतीनंदना । नमन चरणां करितसें ॥७॥
नामा ह्मणे आतां देईं मज स्फूर्ती । वर्णितसें कीर्ति कृष्णजीची ॥८॥
२.
सरस्वती माते द्यावी मज स्फुर्ती । येतों काकुलती तुजलार्गीं ॥१॥
लाडकें लडिवाळ मागतसें तूज । वंदीन हे रज चरणींचे ॥२॥
त्वरें येवोनिय मस्तकीं ठेवीं हात । जाईल ही आंत तेव्हां माझी ॥३॥
आपुल्या बाळासी धरी आतां हातीं । न करीं फजितीं जनामध्यें ॥४॥
विश्वात्मा जो हरि त्याची वर्णीन कीर्ति । आवडीचा ओतीं रस यातें ॥५॥
ऐकोनियां स्तव झालीसे प्रसन्न । नाम्या तुझा अभिमान मजलागीं ॥६॥
३.
प्रर्हाद नारद पराशर पुंडरीक । व्यास आणि वा-ल्मिक नमीयले ॥१॥
दालभ्य तो भीष्म अंबरीष शौनक । ब्रह्मनिष्ठ शूक नमीयले ॥२॥
रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ बिभीषण । केलेंसे नमन याजलागीं ॥३॥
टीकाकार श्रीधर बहिरंभट चतुर । करा नि-रतंर कृपा मज ॥४॥
साधुसंतसिद्ध शिरीं ठेवा हात । वर्णींन स-मस्त कृष्णलीला ॥५॥
नामा मनीं आठवी खेचरचरण । तयाच्या कृपेनें सिद्धि जावो ॥६॥
४.
देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दयानिधी ॥१॥
ब्रम्हा आणि इंद्रा वंद्य सदाशीवा । ऐकें वासुदेवा दीनबंधु ॥२॥
चौदा लोकपाळ करिती तुझी सेवा । ऐकें वासुदेवा कृपासिंधु ॥३॥
योगियांचे ध्यानीं नातुडसी देवा । ऐकें वासुदेव जगद्नुरु ॥४॥
निर्गुण निर्विकार नाहीं तुज माया । ऐकें वासुदेवा कानडिया ॥५॥
करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोया । ऐकें वासुदेवा राया गोजरीया ॥६॥
नामा म्हणे जरी दाखविशील पाया । तरी वदावया स्फूर्ति चाले ॥७॥
५.
क्षीरसागरांत अससी बैसला । धांवोनी मजला भेटी देईं ॥१॥
कैलासासी शीव पूजितसे तुजला । धांवोनी मजला भेटी देईं ॥२॥
शेषावरी जरी अससी निजला । धांवोनी मजला भेटी देईं ॥३॥
गहिंवरोनि नामा बाहात विठ्ठाला । धांवोनी मजला भेटी देईं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP