मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग १५६ ते १६०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१५६.
भेट देईं मज ह्मणे बळीराम । न वर्णवे प्रेम अक्रूराचें ॥१॥
पेंद्यासी पुसती अवघे गडी तेव्हां । कोणरे हा बावा आला येथें ॥२॥
आपुल्या कान्होबाच्या पायां कां पडतो । काय हा मागतो सांग आह्मां ॥३॥
अक्रूर बळिराम घरीं आले गोपाळ । मंदादि सकळ भेटीयेले ॥४॥
मधुपर्कविधि करीती पूजन । ह्मणे धन्य दीन आईचा हा ॥५॥
अक्रूराबरोबरी करिती भोजन । पुसे वर्तमान मग त्यासी ॥६॥
भक्त माझें दैवत जगा दावी मात । कृपाळु बहुत नामा ह्मणे ॥७॥

१५७.
प्रात:काळीं मात झाली गोकुळांत । जातो भगवंत मथुरेसी ॥१॥
गौळणींचा मेळा मिळाला सकळ । पिटिती कपाळ आपुले हातें ॥२॥
एकी त्या घालीती केंसामध्यें माती । एक त्या लोळती भूमीवर ॥३॥
आह्मां सोडूनियां तू रे कैस जासी । तुजविण पीशीं आह्मी सर्व ॥४॥
कोणी रथापुढें जाऊनि पडली । आक्रोशें रडती सकळीक ॥५॥
अक्रूर नव्हे बाई मोठा असे क्रूर । नामीं निरंतर क्रीया वसे ॥६॥
अक्रूर आह्मी सर्व पसरीतों पदर । नेऊं नको श्रीधर मथुरेसी ॥७॥
नामा ह्मणे शोक न वर्णवे आतां । झाला तो हाकिता रथ त्वरें ॥८॥

१५८.
ब्रह्मनिष्ठ तेव्हां स्थिरावला चित्तीं । अक्रूराचे गळती दोन्ही नेत्र ॥१॥
दहींदूधतूप भरिल्या कावडी । चालती तांतडी सकळीक ॥२॥
चिंतेनें व्यापिलें अक्रूराचें मन । काय वर्तमान होईल नेणें ॥३॥
नरनारी शोक करीती सकळ । दुराचारी खळ कंस आहे ॥४॥
मारगीं स्नानासी उतरे अक्रूर । रथावरी किशोर नंदजीचे ॥५॥
सोडोनियां घोडीं चालिला तांतडी । दिल्ही असे बुडी जळां-मध्यें ॥६॥
दावोनी कौतुक निरसी त्याचा धाक । सांगतसे शुक परिक्षिती ॥७॥
जुंपोनियां घोडीं चालिला सत्वर । लपे दिनकर नामा ह्मणे ॥८॥

१५९.
जोडोनियां कर विनवी विश्वंभरा । चलावें मंदिरा सकळिकीं ॥१॥
अनाथावरी कृपा करा कृष्णनाथा । ठेवीतसें माथा पायांवरी ॥२॥
मारूनियां कंस येईन तुझ्या घरा । आग्रह अक्रूरा करूं नको ॥३॥
सकळ समुदाय मथुरेचे वनीं । साह्य चक्रपाणी ह्मणे नामा ॥४॥

१६०.
प्रात:काळीं गडी उठे कृष्णराम । पाहावया ग्राम चालियेले ॥१॥
मागती रजका देईना तो वस्त्रें । वधी नख शस्त्रें पापियासी ॥२॥
ती ठायीं वांकडी नीट केली तीसी । तीनें चंद-नासी लवियेलें ॥३॥
जोडोनियां हात विनवी सुदामा । चला मेघ:-शामा घरा माझ्या ॥४॥
वस्त्रें देती तेव्हां मथुरेचे लोक । नरनारी मुख पाहाताती ॥५॥
मोडितां धनुष्य येती रक्षपाळ । नामा ह्मणे खळ वधियेले ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP