मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग २१ ते २५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२१.
सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्चर्य करीत मनामाजी ॥१॥
रोहिणी उदरीं नेवोनी घातला । न कळे कोणाला देवावीण ॥२॥
कंसाचिया भेणें यादव पळाले । ब्राह्मण राहिले अरण्यांत ॥३॥
नाहीं कोणा सुख तळमळ मानसीं । वधील दुष्टांसी कोण आतां ॥४॥
विश्वाचा जो आत्मा कळलें तयाला । दावितसे लीला संभूतींची ॥५॥
अहर्निशीं ध्यान भक्तांचे मानसीं । स्थापील धर्मासी नामा ह्मणे ॥६॥

२२.
देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचें ह्लदय जळतसे ॥१॥
हरणें पळती देखोनियां । व्याघ्र । कांपे थरथर तैशापरी ॥२॥
अजासर्पन्यायें कीटकभ्रमर । दिसती नारीनर कृष्णरूप ॥३॥
जेवि-तां बोलतां शेजे शीणें निज । आला आला मज मारावया ॥४॥
नाशील हा आतां दैत्याचें तें बंड । फाटलीसे गांड तेव्हां त्यांची ॥५॥
नामा ह्मणे भय लागलेंसे ध्यान । चराचरीं कृष्ण दिसतसे ॥६॥

२३.
विमानांची दाटी अंतरिक्षीं देव । करिताती सर्व गर्भ-स्तुती ॥१॥
सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ति । यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥२॥
साहाजणें भांडती नवजणी स्थापिती । न कळे कोणा-प्रती अंत तुझा ॥३॥
अठराजण तुझी वर्णिताती कीर्ति । गुणातीता श्रीपति नमो तुज ॥४॥
चौघां जणां तुझा न कळेचि पार । श्रमसी वारंवार आह्मांसाठीं ॥५॥
अठयांशीं सहस्र वर्णिताती तुज । ब्रह्मां-डाचें बीज तुज नमो ॥६॥
जन्ममरणाचें नाही तया भय । आठविती पाय तुझे जे कां ॥७॥
नवजणी तुझ्या पायीं लोळताती । परब्रह्म मूर्ति तुज नमो ॥८॥
नामा ह्मणे ऐशी करिताती स्तुती । पुष्पें वाहूनि जाती स्वस्थळासी ॥९॥

२४.
मयूरादि पक्षी नृत्य करीताती । नद्या वाहताती दोहीं थडया ॥१॥
भूमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरीं सक-ळांच्या ॥२॥
विमानांची दाटी सुरवर येती । गंधर्व गाताती सप्त-स्वरें ॥३॥
मंदमंद मेघ गर्जंना करीती । वाद्यें वाजताती नानापरी ॥४॥
नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती । अप्सरा नाचती आनंदानें ॥५॥

२५.
दशरथें मारिला तोचि होता मास । वर्षाऋतु असे कृष्णपक्ष ॥१॥
वसुनाम तिथी बुधवार असे । शुक सांगतसे परी-क्षिती ॥२॥
रोहिणी नक्षत्र दोन प्रहररात्र । माया घाली अस्त्र रक्ष-पाळां ॥३॥
नवग्रह अनुकूळ सर्वांचें जें मूळ । वसुदेव कपाळ धन्य धन्य ॥४॥
जयाचा हा वंश तयासी आनंद । माझे कुळीं गोविंद अवतरला ॥५॥
अयोनीसंभव नोहे कांहीं श्रमीं । नामयाचा स्वामी प्रगटला ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP