( वृत्त : साकी )
श्रीमुळपिठ वासिनी भवानी, येकविरे जगदंबे ।
रेणु राजाचे नंदिनि श्री, रेणुके विश्वकुटुंबे ।
रुचिकात्मज कांते । भृगुरामाचे माते ॥१॥
आदि नमोस्तुते सकळारंभे, जगदंबे हेरंबे ।
नमोस्तुते सतचितघनबिंबे, ह्रदयकमल - निलयांबे ।
करुणामृम गंगे । अनंत मानस रंगे ॥२॥
रत्नजडित - सिंहासन - मंडित अखंड ध्यान विराजे ।
चिंतिति देवी - देव - ऋषीगण, दानव मानवि राजे ।
सदगुण वेल्हाळा । नमितों सहस्त्रवेळां ॥३॥
प्रसन्न श्रीमुखचंद्र वरद कर, नळ करुणामृत झरिचा ।
हिरवीं कंचुकि पीत पितांबर, झोंक पदर भर जरिचा ।
बहुत सुगंधाची । उटि केशर गंधाची ॥४॥
बाळ्या बुगड्या काप कुंडलें, चमकति मोती भांगीं ।
तळमळती कविगुरु नक्षत्रें, म्हणती आम्हि अभागीं ।
भ्रमणामधें पडलों । कोंदणिं नाहीं जडलों ॥५॥
शिरिं केकत मुदराखडि वाकी, नाकीं नथ - सरज्याची ।
दिपतीं नक्षत्रें न पावती, चंद्र सूर्य सर ज्याची ।
पुष्पांच्या माळा । थाट त्रिभुवनीं अगळा ॥६॥
श्रीगुरु दत्तात्रेय - माउली, अनसूयेचे तनये ।
येई लवकर तुजविण या जिव - चैतन्या चेत न ये ।
दिगांबर नेसुन ये । पीतांबर नेसुन ये ॥७॥
पुरवि हेतु या अससि जरी तूं, माय दयाळु गड्याचा ।
दिगांबराहुनि मज बहु वाटे, अनंद या लुगड्याचा ।
शुभ कंकणपाणीं ॥ कुंकुम कज्जल नयनीं ॥८॥
तूं आदिमाये प्रणवरुपिणी, विधि माधव मदनारी ।
तूं नर नारायण नारायणि, तूंचि ब्रह्म नर नारी ।
बोलावें जें जें । तें तें गडे तुज साजे ॥९॥
हे दिनजननी । दीन बांधवा, दीनाच्या बापा हूं ।
घाल उडी दिन वत्सलतेचें, ब्रीद तुझें बा पाहूं ।
आहे मी दीन । झुरतों रात्रंदीन ॥१०॥
जयशंखासुरमर्दिनि येई, मीनेश्वरि आपक्षे ।
वेदास्तव उडि घालुनि उडवी, भवसिंधूजळ पक्षें ।
रक्षीं निर्वाणीं । निजवत्साची बाणी ॥११॥
येइ सुरासुर - नरवर - मोहिनि, अचल धरे कमठाई ।
सुरतरु चिंतामणि सुरभी धन, काय तुझ्या कम ठाईं ।
तूं अमृतपाणी । शुभवरदे कल्याणी ॥१२॥
ये भगवंते ! महाबळवंते ! तुजपासून वराहे ।
भुक्ति मुक्तिचे भक्तीनें बुध, म्हणती वरचि वरा हे ।
पृथ्वीच्या वजना । तोलिशि तरि कां ? मज ना ॥१३॥
ये नरसिंहे ! सुहास्य वदने ! तूं तरि नको गुरुगुरुची ।
आलिंगुनि मज अभयदान दे, तूं माउलि गुरुगुरुची ।
गुरगुरतो बोका । आत्मद्रोही बांका ॥१४॥
ये ग वामने हळूहळूची, पाय तुझे गे चिमणे
कोमल म्हणुनी त्या तळिं तो बळि, निज मस्तक दे चिमणें ।
तेथें रमलीस । उभि राहुनि श्रमलीस ॥१५॥
परशुधर श्री भार्गव रामें, एक्याची हांकेला ।
सहस्त्रार्जुन खलनिधिनें येउनि, स्वगृहिं अनर्थ केला ।
गमे दुःखचि कविस । क्षतें पडलीं येकविस ॥१६॥
कुठें गुंतली तरी कनकमृग, मारायासि अकेली ।
येई लौकर दशाननानें, हरण जानकी केली ।
जय श्री रघुवीरे । जयजय श्री एकवीरे ॥१७॥
येग येग श्रीघननीळे । देवकिचे तान्हाई ।
घोंगडि काठी वेणु शिदोरी, नसल्या चिंता नाहीं ।
नाटोपति गाई । कृष्णाबाइ अगाई ॥१८॥
अखिलहि अवताराची केली, श्री विकलित बहु ध्यान ।
प्रत्यक्ष पंढरपुरीं साजिरें, शोभें कलिंत बहु ध्यान ।
त्वदभजनीं रंगे । ये आइ पांडुरंगे ॥१९॥
अतांचि येऊनि या नरतनुची, तूं प्रक्षाळि कलंकी ।
गुंतुनि पडशिल होशिल जेव्हां, पुढें अवतार कलंकी ।
आज लेंकरवाळीं, मग होशिल करवाळी ॥२०॥
जय श्रीमहिषासूरमर्दिनी, श्रीवर्धिनि श्रीमंते ।
जय ब्रह्मेश्वरी माहेश्वरि जय, नारायणि भगवंते ॥
स्वस्ति श्रीस्वस्ते । उदयोस्तु ह्रदयस्थे ॥२१॥
हिमालयाची क्षिरसिंधूची, यज्ञाग्नीचि कुमारी ।
तूंचि द्रौपदी सीता तारा, अनुसूया सुकुमारी ।
गुणवती अरुंधती । पतिव्रता दमयंती ॥२२॥
आइ रेणुके कृष्णाबाई, गंगे गोदे यमुने ।
मजसाठीं त्वां सत्वर यावें, क्षणभरि कोठें गमुं ने ।
शोभति सकळ नद्या । पायिं जोडवीं वरुद्या ॥२३॥
येग येग दीन दयाळे ! जगदंबे लवलाही ।
पतितपावने पतित मी आहे, पावन करि मजलाही ।
ये माझे आई । अळस नको करुं कांहीं ॥२४॥
संकटिं म्हणे ये कृष्णा । कृष्णाबाई माझे आई ।
आइ जगदंबे तुला आइविण, । उपमा देउं मी काई ।
पाहुनि अपणाला । अठवि जननिपणाला ॥२५॥
भार्गवाचि सरि जरि नये आम्ही, । आइचें लाविलें नातें ।
कमर्दीस तें कसें मिळेल जे, । मोकलिलें हो नातें ।
कापीतांहि गळा । परंतु तो प्रिय अगळा ॥२६॥
आवडती पुढें नावडतीची, कुठुन दाद लागावी ।
समचि तिलाही असला गेला, उठुनि दादला गांवीं ।
न घडे संग तिला । सदगुण ये व्यंग तिला ॥२७॥
नसतिस तूं ‘ दिन - जननी ’ तरि हा, जगतीं पाठ कशाला ।
पडला असतां ? नसत्या शास्त्रादि श्रुति - पाठक शाला ।
धरितां शिरिं महिला । सोसवती न अहीला ॥२८॥
भार्गवाचि जशि तशीच अमुची, नव्हती तूं कां गाई ।
वेद पुराणें कीर्तन भजनें, अभंग तूका गाई ॥
न वदे कधिं ना ची । खरि तूं जननि दिनाची ॥२९॥
रात्रंदिन शतदां दिन - जननीं, म्हणतों मी दिनवाचें ।
एक वेळ तूं ‘ ओ ’ म्हणसिल तरि, सहज बहू दिन वांचे
मरतां मरतांही । पावेन अमरताही ॥३०॥
श्री भागीरथी भगीरथास्तव, भवलोकीं जी वाहे ।
वाटे कौतुक कीं तत्सम जगीं, अवलोकीं जीवा हे ।
ये अमुच्या कामा । व्यालिस भार्गवरामा ॥३१॥
कीं वाइट मी म्हणुनि येतो, तुज माझाचि त्रास ।
काय करुं जरि नीट चितारी, रंगवि ना चित्रास ।
मर्जि तुझी माते । ह्मणसी विद्रुप मातें ॥३२॥
मोठ शहाणा अथवा तान्हा, बालक यद्यपि त्याला ।
टाकुनि रक्षायास्तव येइल, माता मद्य पित्याला ।
मूर्खाची मोठी । वाहे काळजी पोटीं ॥३३॥
तुझ्या रेणुके मंगल भुवनीं, लेश नसे अशिवाचा ।
गरज दिनाचीं नाहीं म्हणुनी, बोलुं नये अशि वाचा ।
उचित हें माउलिला । करि कृपेच्या साउलिला ॥३४॥
लागलों साक्या दिंड्या आर्या, अरत्या परत्या गाया ।
घालिन गोंधळ पाहशिल जरि तूं, या उप्पर त्या गाया ।
भवानी जोगवा दे । वादे वा प्रतिवादे ॥३५॥
मूळपीठ स्थळ फार सुलभ परि, दुर्लभ मज वाटे कां ?
चढतो परंतु घसरुन पडतों, किंचित् द्यावा टेंका ।
प्रणितोदकिं वहातो । वाट तुझी मी पहातों ॥३६॥
थकलों जगदंबे अडरानीं, कुठवर टकरा खाव्या ।
ज्याच्या त्यांनी अपुल्या गाई, या नाटक राखाव्या ।
केल्या हावालीं । नाहि अतां अम्हि वाली ॥३७॥
काय करुं मी तुजविण अंबे, बहु मानस कळकळतें ।
दिन जननीला दीन जनांचे, बहुमान सकळ कळते ।
यास्तव मजलाही । दे दर्शन लवलाही ॥३८॥
आइ जगदंबे अंबे अपुल्या, तूं नको लपवुं पदास ।
दे दर्शन मज अहो तुझ्या मी, दासाचा उप - दास ।
नलगे अणिक मला । दाखवि निजपदकमला ॥३९॥
तुज जगदंबे काय म्हणावें । संचित अपुलें स्मरावें ।
सुत - विरहित - दशरथा - परीम्यां, अइ । अइ, म्हणुनि मरावें ।
आलें या ओघा । या पृथ्वीवर दोघां ॥४०॥
हे षड्रिपु वृक व्याघ्र उग्र मज, लागलेति गांजाया ।
कोठें पंचाननें ! बाळकें, गुंतलीस पाजाया ।
करतिल हे गट कीं । सत्वर ये या घटकीं ॥४१॥
हे शत्रू तुज हांक मारितां, कर्षित आधिक पाशीं ।
स्वाति जळानें जन्मति मोती, परि पडे व्याधि कपाशीं ।
अमृत कां ? हो ! तें । राहुसि विषवत् होतें ॥४२॥
तुझ्या समक्षचि शत्रु कापिती, दुःसह साही मान ।
राहिल जननीगृहीं अशानें, परि सहसाही मान ।
पुनरपि नयेचि घडी । होइल बिघडा बिघडी ॥४३॥
अफु देउनिया निजवी अवघीं, लेंकुरें लेंकुरवाळें ।
मजसाठीं ये हळुं नको वाजवुं, कंकण नूपुर वाळें ।
अडविल बहुजागीं । होइल पृथ्वी जागी ॥४४॥
जडमुढ कटिं खांदीं वागविशी, जो म्हणेलचि नमो त्याला ।
अन्योन्यहि भूषण परि कळ त्या नाकाचि न मोत्याला ।
अवड नसे सवती । म्हणुनि कष्ट सोसवती ॥४५॥
घातले लक्षावधि जगदंबे, जरि ब्राह्मण जेवाया ।
जाइल सत्वचि एक उपासी, गेला म्हणजे वांया ।
आणुनि लक्षांत । बैसविली लक्षांत ॥४६॥
जननिपणाच्या विषइ उणेपण, घेउन दे उनमत्ता ।
कथिलें कलिसी या विश्रांति घेउन दे उनमत्ता ।
गति भोंवर्या ऐशीं । करि फिरवी चौर्याएशीं ॥४७॥
ओळख माझी होति तुला तशि, तुझि या अधमा नव्हती ।
अनंत जन्मीचे मज्जननी, परि कैसे वध मानवती ।
लाभलि नरकाया । लोटुं नको नरका या ॥४८॥
दुर्लभ नर जन्मासी आलो, त्यांतुनि मी ब्राह्मण कीं ।
मारुं नको कुल भ्रष्टचि म्हणुनी तारुंन कुब्राह्मणकीं ।
भव दुष्कर्मातें । माझ्या दुष्कर्मा तें ॥४९॥
न लगे जप तप यज्ञ दान धन, जननीच्या अवतारा ।
म्हणुनी अंबाबाइ तुम्हासी, म्हणतों ‘ तारा ’ , ‘ तारा ’ ।
आग्रह म्हणुनि पुरें । गर्जति सत पद नुपुरें ॥५०॥
नमनादित्याऽभिषके शिवाला, अर्चनप्रिय घननीळा ।
भोजन विप्रा प्रिय तसेंची, ‘ आइ ’ म्हणणें जननीला ।
किर्तीचे लखोटे । कोणचि म्हणेल खोटें ॥५१॥
सांप्रतकाळीं अशीच फिरली, मर्जि काय देवाची ।
सोडुनि वेदाध्ययन ब्राह्मण, अर्जि कायदे वाची ।
सोवळें आटोपीं । पायीं बुट शिरिं टोपी ॥५२॥
कली वाढला धर्म बुडाला, नितिवर पडला छापा ।
पावलि गायत्री गति वंध्या, संध्या म्हणती छापा ।
हातीं दारुचिं पात्रें । लोपलीं अग्निहोत्रें ॥५३॥
संतसमागम अतां कशाचा ? अवघा कीरस्तान ।
झालि असार्थक गति या लोकीं, परलोकीं रस्ता न ।
भरि पडली स्वहितां । पशुवत विकिती दुहिता ॥५४॥
कोतवाली ऋणकरी शिपाई, जमादार आमीन ।
मीन असते तरी जागृत राहतें झोंपी जाती अमीन ।
चोरांच्या गस्ती । फिरती रस्तोरस्तीं ॥५५॥
हुजूर तहशिलदार तपशिली, कोतवालि अमिनाही ।
अरोपि यानें कबूल व्हावें, बोलावें अम्हि नाहीं ।
चोरांचे शाहू, कर म्हणती पैशा हूं ॥५६॥
हा जिव जावो अथवा राहो, परीन हरपो पैसा ।
पैशासाठीं बाळ कापिती, शिव हरहर हा पैसा ।
देवहि पैशाला ॥ पावति बघुन दुशाला ॥५७॥
आइ त्वां दिधला जन्म कशाला, राज्यामध्यें या कलिच्या ।
दुर्धर सागर तरावयाला, गति खुंटति अक - लीच्या ।
त्वा हें जाणावें ॥ आम्ही काय म्हणावें ॥५८॥
त्या युगिं भवनिधि तारक ज्या गुण, कीर्तीच्या नावा या ।
या कलियुगि त्या तुमच्या पातक, भरतीच्या नांवा या ।
डळमळती भारी ॥ तळमळती व्यापारी ॥५९॥
तरल्या जळ सागरीं न होतां, फाका फाक शिळांची ।
भव सागरिं तो गुणामृताचा, झाला पाक शिळाची ।
पसरितों आ तांका ॥ तूं लपसी आतां कां ॥६०॥
मुक्त मुक्ती घालणें आयत्या, पिष्टांच्या रांगोळ्या ।
दाविसि अंगुष्ठा दडपूनी, पापिष्टांचारांऽगोळ्या ।
ग्रंथाक्षरें काळीं । दिसती सांप्रतकाळी ॥६१॥
ज्यांसि नसे धनि वाली त्याला, कोणीही धोंपटतो ।
कैंचा न्यायान्यायचि पडला, राजमार्ग धोपट तो ।
मी अनुभवलो कीं ॥ तूं दिन जननि विलोकीं ॥६२॥
मद्रिपूसहि सांगसी मला दृढ, बांधुनिया शिक्षाया ।
मज म्हणसी रिपु जिंकशील तरि, मी येइन रक्षाया ।
हा तुजला न्याय । दिसतो कीं अन्याय ॥६३॥
न सुटे मजला दृढ काळानें, कंठिं घातली फाशी ।
सोडविशील मज म्हणुनी आलों, जगदंबे तुजपाशीं ।
प्रार्थितों निर्वाणीं । पाव अतां निर्वाणी ॥६४॥
काय म्हणावें तुला रेणुके, आइ तूं सदय शहाणी ।
उपेक्षुनीया मज न करावी, अपुली सद्यश - हानी ।
हेंचि निरिक्षावें ॥ मातुश्री रक्षावें ॥६५॥
मोहमायेच्या पंकीं फसलों, बसलों हांकित माशा ।
कळून आला मज आदिमाये, तुझाचि हा कीं तमाशा ।
किती तरि दासा या ॥ लाविसि मुख वासाया ॥६६॥
खचित तुझ्या जगदंबे आज्ञे - वांचुनि पान न हाले ।
विधि हरिहर तव अंकीं करुनी, अमृत पान नहाले ।
तूं मूळ शिराणी ॥ ब्रह्मांडाची राणी ॥६७॥
कोण करिल अदिमाये तुझिया, अवज्ञा नेमाची ।
तुझिया निज वत्साकडे पहाया, मगदुर काय यमाची ।
विघ्नें दुर पळती ॥ असंख्य पापें जळती ॥६८॥
तूं दिनजननी नसशिल मज या, कळतें कठिण प्रसंगीं ।
आला नाहीं दीनपणा कीं, अझुनी माझ्या अंगीं ।
संशय अकळेना ॥ हें मुळवर्म कळेना ॥६९॥
खचितचि व्हावें दीन अधीं मग, तुज ‘ दिनजननि ’ म्हणावें ।
जोंवरि अहंकारचि तोंवरी, अभिमानांत गणावें ।
दया तुज येईना ॥ अहंकार जाईना ॥७०॥
अहंकार अम्हि परिहरिल्या मग, त्वां दुर्गे भेटावें ।
पद्मिणिनें रजनी तम गिळिल्या, मग रविनें प्रगटावें ।
उलटा अविचार ॥ नाहीं नीट प्रचार ॥७१॥
तरि जगदंबे मज शत्रूंनीं, घातलें कसें बंदींत ।
तव गुण गाउनि असतां नित्यचि, चरण तुझे वंदीत ।
न त्यांची प्राज्ञा । शतदां तुझीच आज्ञा ॥७२॥
न्यायान्याय न दूत पाहती, मुख्य हुकुम रायाचा ।
बंदि - गृहांतुनि सोडायाचा, अथवा मारायाचा ।
दोषांची गाथा ॥ अवघी प्रभुच्या माथां ॥७३॥
गांजिति दुर्जन तव अनुमतें, असें मज पुष्कळ कळतें ।
ना चले सत्तेपुढें शहाणपण, बहु बोलणें बाष्कळ तें ।
आइ तूं आइ ऐसी । वाग, नव्हे रित ऐसी ॥७४॥
निच यवनीच्या संगें पडलें, निज लेंकरुं वाळींत ।
ऐसें समजुन स्वयें भागिरथीं, धांउनि कुरवाळीत ।
दुरितें सकळ हरी ॥ प्रसिद्ध गंगालहरी ॥७५॥
यमुना भागीरथी सरस्वति, तारिति संगमीं मरतां ।
तूं जगदंबे नमनें देशी, भक्तासी आमरता ।
देती या पक्षीं ॥ वेद पुराणीं साक्षी ॥७६॥
अंबे तुज दिनजननी म्हणावें, नाहीं उचित नरा हें ।
जननी नामोच्चारा आधीं दीनत्व खचित न राहे ।
रवि - उदयापूर्वीं ॥ सांदितसें निशि, उर्वी ॥७७॥
मिळेल अभाग्या सौभाग्यें, तुझि धुळ पदकमलाची ।
भाग्यवान तरि सभाग्य म्हणतिल, तुजहुनि अधिक मलाची ।
सोनें परि साचें ॥ तें भूषण परिसाचें ॥७८॥
सांपडलीया जग जिवनाची, गंगाबाइ मिना ही ।
जाणारा अन्योदकिं आतां । मी नाहीं मीं नाहीं ।
अटकेना मि गळीं ॥ अलि अमिषाची उगळी ॥७९॥
मी तुझें लेंकरुं माझि माउली, तूं जगदंबा साची ।
सोडुनि कल्पतरुंची छाया, मज नलगे बासाची ।
कळलें मज पुरतें ॥ हें सोनें खापर तें ॥८०॥
भक्ति रसापुढें सुरम रुचि । दुजी न गमे रेणुकेला ।
काय देउं उतराइ इनें नग, मेरुचि रेणू केला ।
प्रेमें लाडविलें ॥ प्रेमानें वाढविलें ॥८१॥
सकळहि धर्माचे श्रय घडतें, मातृचरण नमनानें ।
तरी आइचें उणें सुतानें, कल्पावें न मनानें ।
सुमती पर्णावें ॥ आइचे गुण वर्णावे ॥८२॥
खरि जगदंबे आइ तुं साची, विसाव्याची विसावी ।
कधिं मजला देशील विसावा, घसरलि तिसरि विसावी ।
लागली क्षरु चवथी ॥ चंद्रकळा जणुं चवथी ॥८३॥
तूं जगदंबे बंधुबाप आइ, गुरु शतपट भगवान ।
पाव मलातरि जपतप साधन, करिता पट भगवा न ।
मग या उपकारा ॥ नाहीं पारावारा ॥८४॥
जोंवरि देशि न भेटि तोवरी, घालिन मी बा दंगा ।
काय करुं परि वितंडवादी, मघेंचि करिती दंगा ।
म्हणुनी तडफडतों । तुझिया पायां पडतों ॥८५॥
जोंवरि नाहीं भक्ति तोंवरी, भुक्तीची खटपट ती ।
एकादशिहुनि बहु द्वादशिची, घंटापळि खटपटती ।
त्रासचि साराचा । लोभचि संसाराचा ॥८६॥
पुरुष शक्ति आणि बह्य म्हणावें, संकेतें तो ती तें ।
सृष्टि चालवित स्वयें बोलवित, जणु तोता तोतीतें ।
अभाव एकाचा ॥ भास गमे अनेकाचा ॥८७॥
रुची दिसेना नयनांसी परि, दिसें गुळाचा भेला ।
चाखुनिया रुचि पहातसे परि, न दिसे गूळ जिभेला ।
शैवचि शिव म्हणती । शाक्त शक्ति गुण गणती ॥८८॥
तुझ्या गुणाचें गणित मला जरि, नाहीं लागायाचें ।
तरी जसें येइल तसेचि गाणें, हें आइला गायाचें ।
अक्षयीं आनंदें ॥ पाहिन तुज आनंदे ॥८९॥
म्हणशिल निंदास्तुतिपर ऐशा, चाटूं कां कवितेला ।
योजक युक्त पदार्थी योजुनि, सेविति काकवि तेलां ।
भिन्नपणा ताटीं ॥ परि संगम घडे पोटीं ॥९०॥
हा जगदंबे तुझ्या पसंतिस, वाटे नये कवि चार ।
काय करावें मला कळेना, कांहीं एक विचार ।
कसें अठवूं पाय ॥ हरला सर्व उपाय ॥९१॥
मी एकाकी वेदधर्म हिन, कर्म न न्यास ध्यान ।
षडरिपु म्हणती चक्रिं धनंजय, अभिमन्या सध्या न ।
दुःख हें कानांही ॥ ऐकुं येत कां नाहीं ॥९२॥
काय कारावें अतां मरावें, म्यां शतशा वांचून ।
या भवचक्रीं जवळ नये जन, हित शतशा वांचून ।
करुणा येवोदे । कृष्णाबाई ओ दे ॥९३॥
हस्त मस्तकीं दस्त करुनी, दुर्गे तूं मग दुर हो ।
वक्र पहाया महाकाळाचि, काय असे मगदुर हो ।
पाप्याच्या कामीं ॥ कां नसे वेळ रिकामी ॥९४॥
मी जगदंबे जरो अहो तरि, पाप - धनाची - कोठी ।
वाढवीन परि तुझी माउली, पूर्ण क्षमेची कोठी ।
दे रस गाण्याला । लावी उस घाण्याला ॥९५॥
तूं जगदंबे हें रडगाणें, माझें लावि कडेला ।
भिड सोडुनि तरि कडेलोट करि, अथवा घेइ कडेला ।
उगीच रडवीसी । तारिसि ना बुडवीसी ॥९६॥
म्हणसिल कधिंतरि कृपा हि होइल, पायधरुन बसल्यानं ।
औषध वैद्याचें गुण देइल, अयुष्य बळ असल्यानं ।
हें बोलणें फोल । नसे कृपेची ओल ॥९७॥
किंवा म्हणसिल मोक्षचि देइन, करुं नको चिंता कांहीं ।
धाडुन देइल दूध काय ती, जी वंची ताकाही ।
समजुत मूर्खांची । भेट न देसि फुकाची ॥९८॥
परंतु भुवनत्रयीं कोण गे, म्हणेल मजला खोटा ।
त्रिभुवनराणीच्या नांवाचा, जवळ समज लाखोटा ।
दौंडी पिटवीन ॥ गूण तुझे अठवीन ॥९९॥
नको अबोला धरुं जगदंबे, करि करुणा ये, ‘ ओ ’ दे ।
या संगमिं भाग्योदय रविचा, रथ अरुणा येवो दे ।
किति रे दुर्दैवा । करविसि देवा देवा ॥१००॥
ऐकूं येइल विनंति तुमच्या, कधिं हो कानाला हो ।
सिंधु परी मज घ्या पोटीं मीं, नदि हो कां नाला हो ।
नांवाची अवडी । करुं नये निवडा निवडी ॥१०१॥
पहात बसलों प्रभु नांवाची, आणि पापाचि लढाई ।
जें निजबळें मज ओढुन नेइल, गाइन त्याचि बढाई ।
नसेचि भलत्याला । लज्ज्या ज्याची त्याला ॥१०२॥
हरहर म्हणतों परंतु मरतों, मिच पापी जगतांत ।
प्रभुच्या नामामृत - पानें षटशास्त्र वेद जगतात ।
सांगूं गार्हाणें । कुणासि लाजिरवाणें ॥१०३॥
अजवरी वियोगाचा केला, आइ दंडचि न रडे हो ।
आतां गिळितां त्या काळाचे, शतखंडचि नरडें हो ।
अनंत नवसांची । भेटी बहु दिवसांची ॥१०४॥
इथेंचि माझी प्रयाग काशी, भक्तिविना अळसानें ।
म्हणतों जरि तरि मन्मत - मंदिर, कल्पलते कळसानें ।
म्हणतिल तुज शहाणे । निज नांवाकडे पहाणें ॥१०५॥
वरचेवर निट जननि मुलासी, कैशापरि सांवरती ।
लोह अमंगळ जसें दिसेना, सहसा परिसावरती ।
आइला ये वळका । म्हणतां बेटा ‘ मळका ’ ॥१०६॥
बहु श्रमलों मी, बहु भ्रमलों मी, स्वहितांसी मुकलों मी ।
दिन झालों मी, शरण अलों मी, जगदंबे चुकलों मी ।
पंकीं फसलों मी । पाय धरुन बसलों मी ॥१०७॥
आरडतों मी ओरडतों मी, तुजविण तडफडतों मी ।
वर चढतों मी तळिं पडतों मी, व्यर्थचि बडबडतों मी ।
पाया पडतों मी । भवसागरिं बुडतों मी ॥१०८॥
कळेल तैसें गुण गातों मी, बहुदुःखचि सहातों मी ।
निर्भिड मी निर्भय होतों मी, प्राण तुला वहातों मी ।
पाठिसिं दडतों मी । षडरिपुसी लढतों मी ॥१०९॥
मनिं झुरतों मी तुज स्मरतों मी, जगदंबे मरतों मी ।
धरणें द्वारामधें बसतों मी, पदर तुझा धरतों मी ।
उगाचि रहातों मी । चरित्र तुझें पहातों मी ॥११०॥
दाता तूंची त्राता तूंची पतीत पावन तूंची ।
पूर्ण ब्रह्म सनातन तूंची, जगिं जगजीवन तूंची ।
भूताकृति तूंची । प्रकृति विकृति तूंची ॥१११॥
बालक तूंची पालक तूंची, चालक मालक तूंची ।
तारक तूंची मारक तूंची । भवाब्धिपारक तूंची ।
गृहवर्धन तूंची । पापपुण्य धन तूंची ॥११२॥
देवहि तूंची देविहि तूंची, शिव गणपति, गण तूंची
विश्वीं विश्वेश्वरही तूंची । विश्वपटांगण तूंची ।
कमळापति तूंची । कमलोदभवही तूंची ॥११३॥
लक्ष्मी तूंची पार्वति तूंची, श्रीसावित्री तूंची ।
सरिता तीर्थे यज्ञदान व्रत, जप गायत्री तूंची ।
शुभाशुभ तूंची । सुलभ दुर्लभ तूंची ॥११४॥
भुक्तीं मुक्ती भक्ती तूंची, भक्ताभक्तहि तूंची ।
शक्ती व्यक्ती उक्तीत्युक्ती, व्यक्ताव्यक्तहि तूंची ।
क्षर अक्षर तूंची । सृष्टिचराचर तूंची ॥११५॥
मूर्ख मुलांची अळ काढाया, तूंचि माउली बांकी ।
ठेउं नकोची किरकिर आतां, माझी कांहीं बाकी ।
तुज माझी आण । दयाक्षमा मनिं आण ॥११६॥
क्षमाचि करणें ही जननीच्या, संपादणि वेषाची ।
लागुं न दे तूं रेणुके अंगीं, मळि रागद्वेषाची ।
त्वां निट वागावें । असें म्यां कसें सांगावें ॥११७॥
अन्नपूर्णेच्या पुत्रानें पर - घरिं भिक मागावी कां ।
अपुल्या अइची तरि वंचक कृति, जगांत सांगावी कां ।
अडचण दोहिंकडे । इकडे अड दरि तिकडे ॥११८॥
करि संरक्षण अतां उपेक्षा, न करी पुरवि अशाची ।
असेच जडमुढ तारुनि लीला, केल्यापूर्वि अशाची ।
निज नांवासाठीं । गोष्ट नव्हे ती खोटी ॥११९॥
संरक्षिलि ती श्रीहरिनें निज, नांवाच्या अभिमानें ।
जी पांचाळी उपेक्षिली खळ, सभेंत पार्थभिमानें ।
आटक धर्माची । परि रित आधर्माची ॥१२०॥
श्रीकृष्णानें कृष्णेची तनू, झांकिलि चटकपटानें ।
कृष्णचि केली त्यांचीं त्यांच्या, वदनें चट कपटानें ।
भक्तांचा महिमा । वाढविसी विश्रामा ॥१२१॥
तूं पार्थांकित अससि तसाची, देशि मान वेदांसी ।
दास्यत्वासि न लाजशि तुजती, अधिक मानवे दासी ।
भक्तीची गोडी । यास्तव घाशिसि घोडीं ॥१२२॥
भक्तासाठीं मजवर करुणा, तूं करते कां नाहीं ? ।
कैसाहि असो मी दुर्बुद्धी, मंद अंध काणाही ।
भक्तांच्या वचनां । घोकुनि करितों सुचना ॥१२३॥
भक्तप्रिय तूं तुकारामकृत, देशि अभंगा मान ।
त्वां मजकडे पाहून करावा, मजवर हंगामा न ।
आहों जासुद मी । साधु असो की अधमी ॥१२४॥
अवयव पाहुं नये पुत्राचा, जासुद गुरु अतिथीचा ।
वडिलापरि वंदावा तिथीचा, अथवा द्विज अतिथीचा ।
असे असति धारे । शास्त्रांच्या आधारें ॥१२५॥
तुकारामकृत अभंग बारा, पढलों वर्षें बाराहो ।
आतां माझ्या ह्रदयीं राहो, कीं न विठोबा राहो ।
तळमळ तरि कां ? मी । करुं तरि चित्तिं रिकामी ॥१२६॥
निज भक्तांच्या वचनासाठीं, निश्चित ठाई ठाईं ।
नानास्वरुपानें अवतरलिस, तूं जगदंबे विठाई ।
स्तुति ऐकसि कां न । मजकडे देशि न कान ॥१२७॥
माझे लक्षुनि दोष मोडिसी, भक्तांच्या वचनासी ।
परी शर्करायुक्त क्षिरीची, स्वाद रुच्या वचनासी ।
शब्दचि शब्दाला । लागेल डाग ब्रिदाला ॥१२८॥
सहस्त्र नामांसहित अभंगचि, करितो द्वादश पाठ ।
मजकडे अजुनी कां न पाहसी, बसलिस करुनी पाठ ।
प्रसन्न मी होईना । म्हणशिल तरि भक्तहिना ॥१२९॥
अभंग वाणी पढलों मी तुझि, आइ भक्ती वाढाया ।
येतिस अमृत रस ठेवुनि विष, कां मजप्रति वाढाया ।
भक्ती मागाया । लागलों मी गुणगाया ॥१३०॥
अतिथि द्वारीं अलों मला दे, प्रेम जोगवा दान ।
सतावितां दात्यानें वाढतो, व्यर्थ वाद वादानं ।
रात्रंदिन त्रास । नये झोंप नेत्रास ॥१३१॥
कृपणचि झाली लागलि नवि कर, अखडावा संवय तिला ।
कर अखडिल तर, कासव होइल, म्हणतिल वा सवय तिला ।
लोकांच्या तोंडा । काय देउं आई धोंडा ॥१३२॥
तुज श्रमवाया व्यर्थ जन्मलों, गर्भिंच गळलों कां न ? ।
वाटल वंगळ आइ तुज म्हणतां, मज वंगळ लोकानं ।
वाइट दोघांस । घाल मुखीं दो घांस ॥१३३॥
कोरडि भाकर चारी मारी, जरि अइ अन्नपुर्णाचि ।
सरसचि परि ती निरस पराची, तुपपोळी पुरणाची ।
पिंडची मासाचा । अखंड प्रेमा साचा ॥१३४॥
जसा पदर निज आइचा नादर, मुलांसि हतभर पुरतो ।
पराइचा चौफळि पदर तसा, न दिसेची भरपुर तो ।
दोस्ताचें लुगडें । परिगर्तींपण उघडें ॥१३५॥
गवत झोंपडी बरी मुलासी, आइची सत राखणाची ।
नसें उपयोगीं मावशिची ही, हवेलि सतरा खणांची ।
ग्रामक हाजर । आइविण तो बाजार ॥१३६॥
सुखदुःखाच्या समयिं समानचि, आइचि मुलावर माया ।
विपत्ति काळीं येति न कामीं, लग्नाच्या वरमाया ।
कोणि न कोणाचे । साथि उदर भरणाचे ॥१३७॥
जें जें पाहिन मी स्थुळ सूक्ष्म, रुप अणुरेणू कांहीं ।
तें तें आहे म्हणेन माझी, माउलि रेणूका ही ।
लागो हें ध्यान । तुझेंचि अनुसंधान ॥१३८॥
दे दे प्रेमामृत पी पी म्हण, प्रेमाच्या वाटीनं ।
घे घे प्रेमाची खडिसाखर, प्रेमानें वाटीनं ।
प्रेमाची प्रेमाला । घेउनि या प्रेमाला ॥१३९॥
विस्मृति विषयाची पडो जैशी, मेल्यावर देहाची ।
चित्तिं तुझी जडो मूर्ति रेणुके, मजला वर दे हाची ।
नित्य सदाचरणीं । ठेविन मस्तक चरणीं ॥१४०॥
भक्ति वांचुनी परी युक्तिच्या, सकल कळा विकळाची ।
भक्तीसाठीं जगदंबे म्यां, जीव तुला विकलाची ।
सतत गुलामाला । लावी निज कामाला ॥१४१॥
मी जगदंबे तुजला गाणें, कळेल तसें गाईन ।
परि वत्साच्या दर हंब्रीप्रति, हंब्रावें गाईनं ।
न दिसे मग न्यून्या । हें सुखकर अन्योन्या ॥१४२॥
रत्नखचित नग तुला मि घडविन, उचित सर्व साकीन ।
सांग मला तुज असे जगदंबे, खचित भरोसा कीं न ? ।
अजवर बहु लटकें । बोललों घटके घटकें ॥१४३॥
हा पद जडिताचा घे काळ्या, सूत्राच्या सम हार ।
आई रेणुके पहा यासाठीं, झाला देव महार ।
तूं तरि सगुणाची । दृष्टि न घे कोणाची ॥१४४॥
अनाथ नाथ - गळीं पडल्या तरि, अनाथ जननि करानें ।
विष्णुदास म्हणें देउं नये बळि, सनाथ जन निकरानें ।
येवढी अनंती । वारंवार विनंती ॥१४५॥