रेणुकेचें अष्टक - चवथे
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( वृत्त : दिंडी )
तुझें सुंदर रुप रेणुके विराजे
वर्णिताती मुनि देव देवि राजे
कोण स्वगुणाचा करिल गुणाकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१॥
सदानंद मुख चंद्रमा सबंध
रत्नहार, मणी, वांकि बाजुबंद
मुक्तजडित सुवर्ण अलंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥२॥
विलोकुन नथ नासिकीं, काप कानीं
मार्ग विसरावा मोक्ष साधकांनीं
हांक द्यावी लक्षुनी लक्षवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥३॥
साडि पिवळी खडिदार भरजरीची
तंग चोळी अंगांत अंजिरीची
टिळा कुंकुम, निट वेणि पिळेदार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥४॥
सप्तशतिचे पुढें पाठ घणघणाट
टाळ, घंटा, कंकणें, खणखणाट
पायिं पैंजण घन देति झणत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥५॥
मूळ धाडी दर्शना यावयासी
लावि भजनीं या उर्वरित वयासी
तोडि सारा हा दृष्ट अहंकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥६॥
पर्वतीं या बसलीस अम्हांसाठीं
परी अमुची खरचली जमा साठी
भरत आला स्थळ - भरतिचा अकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥७॥
माय वंची दुरदेशिं मुलांनाही
अशी वार्ता ठाऊक मला नाहीं
अगे आई ! हा काय चमत्कार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥८॥
ब्रीद सोडुन बसलीस बेफिकीर
मला केलें सरदार ना फकीर
काय म्हणतिल व्यासादि ग्रंथकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥९॥
तरी आतां ये, धांव, पाव, तार
त्वरित आतां तरि धांव, पाव, तार
करी माझा अविलंबें अंगिकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१०॥
काय रागें झालीस पाठमोरी
तेरि अम्मा फिर एकि वाट मोरी
केशराचा हरपेल कीं शकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥११॥
पहा जातो नरजन्म - रंग वायां
नये सहसा परतून रंगवाया
म्हणुनि करितों विशेष हाहाःकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१२॥
कृपासूत्रें वोढोनि पाय दावी
जशी बांधी कृष्णासि माय दावीं
अहो मीही अन्यायि अनीवार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१३॥
मीच अथवा तुज ह्रदय - मंदिरांत
प्रेमसूत्रें बांधीन दिवस - रात
यथातथ्य परि नसे अधीकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१४॥
कसा एका पुष्पाचिया आवडीनें
मुक्त केला गजराज तांतडीनें
तसा मीही अर्पितों सुमनहार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१५॥
केली दुल्लड ही पदर पंधराची
तुझ्यासाठींची, आण शंकराची
विष्णुदास म्हणे रेणुके स्विकार
तुला माझा अंबिके ! नमस्कार ॥१६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP