अष्टक - अंबाबाईचें

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( वृत्त : शार्दूलविक्रीडित )
जन्मा येउनि व्यर्थ मानवकुळीं एरंडसा वाढलों
झालों मी धड ईकडे न तिकडे आधें - मधें नाडलों
नाहींची परमार्थ - स्वार्थ लवही स्वप्नांतरीं लाभला
अंबाबाइ, अतां नको पुनरपी संसारिं घालूं मला ॥१॥
संसारीं कुळदेवताच सगळी म्यां मानिली बायको
आज्ञेनें परि वागलों मिच तिच्या ती आयको नायको
झाला लंपट वीषयांध खळ हा बैलापरी शोभला
अंबाबाइ, अतां नको पुनरपी संसारिं घालूं मला ॥२॥
माती खातिल कां घरींच बसल्या ही कारटीं पोरटीं
जातां दूर स्थळीं कुणीकडे तरी पाहील स्त्री गोरटी
एवं काळजि काळजीच करितां काळेंचि आटोपला
अंबाबाइ, अतां नको पुनरपी संसारिं घालूं मला ॥३॥
पोटासाठिंच दाविलीं वरघडी सोंगें जनाला भलीं
हातीं एकहि शेवटास फुटकी कौडीहि ना लाभली
आशा - सर्पिणिच्या मुखीं अखुपरीं गे देह हा कोंबला
अंबाबाइ, अतां नको पुनरपी संसारिं घालूं मला ॥४॥
अंगाला विभुती, कमंडलु करीं, कानांमध्यें कुंडलें
केले रंग विरंग ढंग अगळे, शिष्ये बहू मुंडले
मोक्षाला मुकलों, धनार्थ शिकलों, सारा नटाची कला
अंबाबाइ, अतां नको पुनरपी संसारिं घालूं मला ॥५॥
आशा रांड खराब तोंडचि सदा नीलाजरि वासवी
सोडी ना परि वाट दैवगतिनें झाला जरि वासवी
मेल्याही मरेना समंधचि करी जी लागलीसे मुलां
अंबाबाइ, अतां नको पुनरपी संसारिं घालूं मला ॥६॥
लक्षाची घडि चालली झरझरा ही रात्र हा दीवस
गेली आलि दिवाळि जाय दसरा ही पौर्णिमा आवस
काळाने अवचीत कंठ तितुक्या संधीमधें दाबला
अंबाबाइ, अतां नको पुनरपी संसारिं घालूं मला ॥७॥
कामक्रोध पहा महारिपु कसे साही जणे दांडगे
दारा - पुत्र - कलत्र व्याघ्र - शुकरादी अस्वलें लांडगे
वांछीती जिव घ्यावयास अवघा शत्रू जगीं व्यापला
अंबाबाइ, अतां नको पुनरपी संसारिं घालूं मला ॥८॥
सांगूं मी तुजला घडी घडि किती कर्माचि ही काहणी
विघ्नें हीं दुर वारिसी कुठवरी आहेस तूं शाहणी
विष्णूदास म्हणे म्हणून इतुकी आहे विनंती तुला
अंबाबाइ, अतां नको पुनरपी संसारिं घालूं मला ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 05, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP