प्रदीर्घ अष्टक

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( आर्या - गीती )
ये जगदंबे ! धांवत, टाकुन मागें कराल पवन मना ।
म्हणतिल सुर त्वत्पदिं या, आयोग्यचि किंकरा लपव नमना ॥१॥
या संकटिं ये पायीं, बाई ! तुजवीण प्राण तळमळती ।
वंदुनि नयनाश्रुनें, प्रक्षाळिन जरि स्वपादतळ मळती ॥२॥
जाते नयनाश्रूजळ माते ! तव अवकृपादशे वाया ।
मज सन्मुख जगदंबे ! करि यास्तव अवक्रपाद सेवाया ॥३॥
नाहीं तसाऽपराधी भार्गवसा मी तपीळ पद राशी ।
यास्तव अंबे बसलों, बळकट घालीत पीळ पदरासी ॥४॥
अइ ! तुजसाठीं गुरुची, जपतों जपमालिका मि नावडती ।
जैशी वश्य कराया, निजपतिला भजति कामि नावडती ॥५॥
श्रीमंत कामिं गुंतुन, विसरशि गरिबाचि लाज राखाया ।
ताटापुढेंचि बसल्या, मिळतें उच्छिष्ट मांजरा खाया ॥६॥
आई बाई म्हणतां, गोष्ट कधीं एकही न आयकशी ।
झालिस कां ? जगदंबे, अगदिच अशि प्रेमहीन आइ कशी ॥७॥
तुज चिंतितांचि चित्तां, चिंता पाठिसि लाविली सगळी ।
मी तरि कशास घालूं, ऐशा निष्ठूर माउलीस गळी ॥८॥
अंबे ! वधूहि वधलिस, केलिस तनु नागवी प्रपंचांत ।
आतां तव नामें हा, मागतसे भीक विप्र पंचांत ॥९॥
त्वा जरि बहुविध चिंता - संकट - दुःखेंहि दाविलीस मज ।
तरि मी शरण कुणाला, नाहीं जाणार, माउली समज ॥१०॥
सोडुनि कल्पलता ही, आतां कोठें मि जाउं देवा ! रे ।
म्हणताति संत येथें, सदभाग्याचें सदा उदय वारें ॥११॥
पाय तुझे पाहूं दे, जोंवरि आहेत प्राण देहांत ।
बुडतों भवसागरिं या, काढ तुला माझि आण, दे हात ॥१२॥
झाली मार्जरक्रीडा, परि मुषकांचें खरेंच मातेरें ।
यास्तव निगमाक्षरि तूं ! घडिघडि घालूं नकोचि मातेरें ॥१३॥
जिव - धन - क्षय - कर्त्याची, काय करावी सुपाक - शाला हो ।
घातक चिंतामणिची, मात्रा वैद्याचि त्या कशाला हो ॥१४॥
भार्गवरामाधिक म्यां, मोठा अपराध काय केला हो
पापी म्हणूनि धरिला, चित्तिं तुझा माय रेणुके ! लाहो ॥१५॥
छळितो मला अहाहा ! हा आहंकार काय हानिकर ।
उचित तुला जगदंबे ! मजवरती सांग काय हा निकर ॥१६॥
कविता करितां थकलों, घे लेखणी दौत आणि कागद गे ।
दे दर्शन जगदंबे ! देशी मजला बहूत कां ग दगे ॥१७॥
सुखसंवादें पुण्यश्लोकाच्या, मूळपीठ नायकिला ।
वाटे पापिष्टाचा, जातो लघुशब्द नीट नायकिला ॥१८॥
भेटि न देतां मुक्ती, देशिल अंबे ! परी सवंगानें ।
किमयागार पुटाविण, काय करावा परीस वंगानें ॥१९॥
अंबे ! तुलाचि गावें, बोलावें तुजसि, या सुखापरतें ।
सूवर्णामृत भोजन, हें यापुढें तुच्छ मोक्ष खापर तें ॥२०॥
करुनि वधावा दुर्गे, त्वां आहंकार हा उपायशतें ।
महिषासुरमर्दिनि जें सत्यचिं मानिन तुझें कृपा यश तें ॥२१॥
निज पदरानें झांकुनि, हा वंगळवाणि चांदि सोन्याची ।
तुमच्या सदनीं राहिल काया सदयश्रिं चांदि सोन्याची ॥२२॥
आइनें छळक मुलाची, न करावी तोड फोड जोडावी ।
हातीं घ्यावा जरि तो, घासुनिया हाड फोड जोडावी ॥२३॥
दुर्वासना हि गाढवि, दंडी दुर हाणिती उदंडचि हो ।
त्यांतें हि न मानी मग, मी तों दुर्बळ मुळीं अदंडचि हो ॥२४॥
मद - रानडुक्कराची, टक्कर सोसावयास मुसकल कीं ।
त्यांतुन त्या खवळीतो, लाउनि हा अधिक दुष्ट फुस कलकी ॥२५॥
चंद्रापरी क्षमेची, शोभवि तप लक्षुमी क्षमाशीला ।
यास्तव अवक्षमेच्या, वारावें तूं अभक्ष माशीला ॥२६॥
किति विनवूं जगदंबे ! करुणा तुज कांहिं यावयासाठीं ।
पहा भर ऊमर खचली, आलि जरा बाइ या वयासाठी ॥२७॥
आनंदीच्या सदनीं, कल्पलता - द्रुम अराम अमराई ।
अक्षयीं अनंद तेथें, यइना यम हराम अमराई ॥२८॥
मज माझ्या आइकडे, मजवर ममता असो नसोऽन्याची ।
साजणि काय करावी, माय परावी असोन सोन्याची ॥२९॥
मोठी उदार अंबा - बाई श्रुति जी वदे उदारांत ।
ती तूं कृपणचि झालिंस, काय तुझ्या जीव देउं दारांत ॥३०॥
पडला सुरनंदिनिच्या, आज दुधाचा घरांत तोटा कीं ? ।
जो दोष रोष योगचि, करुणेच्या सागरांत तो टाकी ॥३१॥
तुजपुढें मि म्हणेना, मोक्षाचें राजतखत कधिं नामी ।
सुंदर रुप हें पाहिन, गाइन नाचेन तकतक धिन्ना मी ॥३२॥
तूं  जगदंबे अपुलीं, मजला वर भक्ति दे वरायास ।
तुज ऐसी माय नसे, जगिं दुसर्‍या शक्ति देवरायास ॥३३॥
अपवर्ण संकराची, धड हिंदी ही न फारशी कविता ।
करितां उगें न राहे, हें मन मतिहीन फार शीकवितां ॥३४॥
तरि काय जाणुं जाणें, मायेची माय मावशी मामी ।
तूं माय रेणुके मज, मायेची माय मावशी मामी ॥३५॥
तूं दिनजननी म्हणूनि, करितों मी इतकि दीन काकुलती ।
त्वां लाविलीस ह्रदयीं, चिंतेची रात्रदीन कां कुलती ॥३६॥
कां मज सताविसी तूं, दीनाची माय होन दीनाला ।
चालुनि पोटीं अब्धीं, निवडे तो काय हो गदी नाला ॥३७॥
आइ जगदंबे, जातों, मी होउनि स्ववपुनाश पतनासी ।
परि पतितपावनाची त्वां, वहावी कीं पुन्हां शपथ नासी ॥३८॥
तूं ही तशीच मी ही, आलों आहों जसा तसा गांवा ।
हा अपमान मुखानें, काय तरी मानवांत सांगावा ॥३९॥
अंबे ! भेटीवांचुनि, जाऊं येथूनि काय माघारी ।
क्षुधितचि गगनीं जाती, येती बघतांच चंद्रमा घारी ॥४०॥
माते ! कळेल तिकडे, जातों परि पाय एकदां दावी ।
काय करुं गे पडला, बाप विधाता सदा कदा दावी ॥४१॥
परि माय - लेंकराचा, लागुं नये वाद अन्य कानातें ।
तूं दिन जननी मी दिन, आहे अर्थात न्यून कां नातें ॥४२॥
अळ काढिल्या अईनें, घ्यावी मग कां न मुरड लेकानं ।
दुर्व्यसनांचे अगोदर, शिक्षेस्तव कां न मुरडले कान ॥४३॥
शरणांगतासि अंबे ! दे तव सन्मान कायदा साचा ।
विष्णूदास म्हणे या, धरिसि न अभिमान काय दासाचा ॥४४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP