रेणुकेचें अष्टक - आठवें

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( कामदा )
श्रीकृपानिधे विश्वनायके ।
हे भवानि ! सौभाग्यदायके ॥
प्रार्थितों तुला मी पदोपदीं ।
रेणुके ! मला पावसी कधीं ॥१॥
पापि मी तुझ्या द्वारिं तिष्ठतों ।
येउं दे कृपा फार कष्टतों
आटली कृपेची नसे नदी ॥ रेणुके०२॥
लागलीस तूं कां दडावया ।
धांव लागलों मी बुडावया ॥
नावरेचि संसार वारधी ॥ रेणुके०३॥
काम क्रोध हे मान मोडिती ।
प्राणसंकटा - माजि पाडिती ॥
ओढिती जसे फासि पारधी ॥ रेणुके०४॥
चिंतनेंत आयुष्य दाटलें ।
पंच प्राण कंठांत दाटले ॥
क्षीण जाहली शक्ति आगदीं ॥ रेणुके०५॥
अंतकाळिं हा शत्रु आगळा ।
कापिल्याविना राहिना गळा ॥
पीडिताति व्याधीं शतावधी ॥ रेणुके०६॥
हें अमूल्य तारुण्य वेंचलें ।
हें समीप वार्धक्य पोंचलें ॥
काय ऊरली सांग आवधी ॥ रेणुके०७॥
चित्तिंची आशा चित्तिं राहिली ।
वाट म्यां तुझी फार पाहिली ॥
सार कां ? न ये मंथितां दधी ॥ रेणुके०८॥
यावया दया लागेना क्षण ।
अंगिं हें तुझ्या माय लक्षण ॥
गर्जुनी स्वयें साक्ष दे विधी ॥ रेणुके०९॥
पावली कृपेनें कृपावती ।
विष्णुदास ही देत पावती ॥
नामकीर्तनीं भक्ति दे सुधी ॥ रेणुके०१०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 05, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP