प्रदीर्घ अष्टक
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( वृत्त कामदा )
जय नमोस्तुते श्री नमोस्तुते । अदि नमोस्तुते प्रार्थितों तुतें ।
जननि देशि कीं ! लक्ष ईकडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥१॥
अदि भवोद्भवे विश्वनायके । तुज अनंत आनंत बालकें ।
तरि तयांत कां मीच नावडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥२॥
बहुत वाटे संसार व्यापसा । कुथिसि कां मला द्यावया पसा ।
तुजसि सोडुनी जाउं कुणिकडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥३॥
दुध दिल्या जरा क्षुधित मांजरा । तुजसि येइना काळिमा जरा ।
समिप पाळिल्या काय बीघडे ? । खचित रेणुके ! सांग येवढें ॥४॥
म्हणसि तूं मला माझें लेंकरुं । अशि वशकृती काय मी करुं ।
चटक चाटकें चूटकें कुडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥५॥
बहुत आसती लेंकुरें तुला । परि तुं एकची माउली मला ।
समचि तोलिसी कां न पारडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥६॥
नवसिं द्रव्य घेऊन पावशी । तरि अम्हां कशी गे निभावशी ।
बधिर दूबळे अंध लंगडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥७॥
कटक कुंडले गोफ साखळ्या । हार तुरे हिरे जाइच्या कळ्या ।
कुठुन आणुं मीं उंची लूगडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥८॥
असं सताविशी कां ग लेंकरा । अडुनि मागसी तूप शर्करा ।
वरण भात पोळ्या कढी वडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥९॥
जडित दागिने घालिसी नवे । भुषण आइचें हें नव्हे नव्हे ।
मनिं विचारुनी तूंचि रोकडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥१०॥
रडत हिंडतों मी भयाभया । जवळ धांउनी ये बया बया ! ।
बघसि माय, निर्वाण केवढें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥११॥
पतित मी असे थोर पातकी । म्हणुनि प्रार्थना बाइ ! ईतकी ।
कठिण हें तुला काय सांकडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥१२॥
जननिची कृती चित्तिं नाठवे । अळसलीस कीं काय नूठवे ।
दिनदयाळ हें ब्रीद नावडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥१३॥
भगवती मला कां न तारिसी । शरण आलिया काय मारिसी ।
तव कृपांबुधीं खंड कां पडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥१४॥
अधिंच कापितो शत्रु हा गळा । करिसि तूंहि कां कोप आगळा ।
वधिसि पाळुनी जेवि शेरडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥१५॥
जरि असाहि त्वां अंत पाहिला । तरि तुलाचि म्यां देह वाहिला ।
ढकलिसी मला कां पलीकडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥१६॥
बहिण बाप तूं माय मावशी । सुशिल नाम हें कां गमावशी ।
किंव कशी न ये ऐकुनी रडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥१७॥
बहिण द्रौपदी सच्चिदांबरें । स्वकरिं झांकिली श्रीपितांबरें ।
मजसि ठेविसी काय ऊघडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥१८॥
खुटलि वाटची वाट पाहतां । अटलि शाइही पत्र लीहितां ।
करुं वृथा किती तोंड कोरडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥१९॥
कधिं उठोनि कैवारें चालसी । कधिं बसूनि सन्नीध बोलसी ।
कधिं रडें तरी लाविसी कडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥२०॥
विषयव्याळ जंजाळ सोसेना । जळुनि जाइना द्वाड वासना ।
कधिं कुबुद्धिचें काढिसी मढें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥२१॥
बघुं न देति श्रीमूख रेखडें । स्वरिपु लोचनीं घालिती खडे ।
परि तुला कसें चैनची पडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥२२॥
मजवरचि का, प्रेम थोडका । परशुरामची काय लाडका ।
भवधि तो तरे काय मी बुडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥२३॥
चतुर तूं गुणाची अई कशी । वचन एवढें कां न ऐकशी ।
करुं गती कशी मीं तुझ्यापुढें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥२४॥
उगिच कामदा वृत्त वांचणें । तव कृपेविना व्यर्थ वांचणें ।
पिळुन काय एरंड लांकडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥२५॥
स्तुतिच ऐकुनीया कृपा करी । प्रियचि मानुनी भाजि भाकरी ।
जशि दशीच चंद्रीं स्पृहा चढे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥२६॥
तुझि स्तुतीच तूं विश्वनायके । तुंचि वदोनियां तूंचि आयके ।
मज कशासि आढ्यत्व एवढें । खचित रेणुके सांग येवढें ॥२७॥
कर धरुनि चालून चालवी । अपण बोलुनी बाळ बोलवी ।
नबल मानुनी घेतसे पुढें । खचित रेणुके सांग येवढें ॥२८॥
भुजगि भावना जों नुठेचि ती । अइ लुचाडिचें तोंड ठेंचिती ।
शिशुसि धांवुनी घेतसे कडे । खचित रेणुके सांग येवढें ॥२९॥
करिंच ब्रह्म येईल धुंडितां । आइ ! नये तुझें रीण फेडितां ।
पदतनासि देतांहि चामडें । खचित रेणुके सांग येवढें ॥३०॥
किती किती तुझे गूण आठवूं । किति किती कृपामृत साठवूं ।
किती किती गुणूं गूण आंकडे । खचित रेणुके सांग येवढें ॥३१॥
मिठ मिरें दहीं भात रायतें । वदनिं घालिसी ग्रास आयते ।
अवडि लेविसी टोपि अंगडें । खचित रेणुके सांग येवढें ॥३२॥
तुंचि ऋणी ऋणांतूनि काढिसी । जनन मृत्युचे पाश तोडिसी ।
समुळ शत्रुचे पाडसी हुडे । खचित रेणुके सांग येवढें ॥३३॥
शशिकले ! तुझें सत्य लेंकरुं । अमृत प्राशुनी पथ्य कां करुं ।
अवडतें न कां भक्षु वावडें । खचित रेणुके सांग येवढें ॥३४॥
सुरभिची मुखीं आलि कास या । करुं मनोरथीं वाणि कासया ।
विषयभूमि कां चाटुं पोपडे । खचित रेणुके सांग येवढें ॥३५॥
फसवि लावि दाक्षायणी अशी । म्हणति नाहि नारायणी तशी ।
तसि मसि कशी गोष्ट ही घडे । खचित रेणुके सांग येवढें ॥३६॥
पद तळाब्जिं जो रंग लालसा । नयनिं तो पहायाचि लालसा ।
कधिं तरी असे दैव ऊघडें । खचित रेणुके सांग येवढें ॥३७॥
कधिं धरुन अद्वैत भावना । सम बघेन ब्रह्मांड भूवना ।
कधिं तरी असे दैव ऊघडें । खचित रेणुके सांग येवढें ॥३८॥
कधिं टळोनि जाईल मीपणा । कधिं दिसेन मी मीच आपणा ।
कधिं तरी असे दैव ऊघडें । खचित रेणुके सांग येवढें ॥३९॥
कधिं निराशनीं निंब वर्पुनी । कधिं अशाहि टाकीन कर्पुनी ।
कधिं तरी असे दैव ऊघडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥४०॥
कधिं उपाधि होतील या मना । कधिं अरोग्य वाटेल या मना ।
कधिं तरी असे दैव ऊघडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥४१॥
जिव रथस्थ मी नरतनूरथीं । अइ तुं होइ सदबुद्धि सारथी ।
कधिं तरी असे दैव ऊघडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥४२॥
मन चतुष्ट वाग्दोर घे करीं । फिरवि अश्व इंद्रीयसंगरीं ।
कधिं तरी असे दैव ऊघडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥४३॥
वचकलों भ्रमें शत्रु भंगितां । भ्रम हरीतसे बोधुनी गिता ।
कधिं तरी असे दैव ऊघडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥४४॥
विजय वीजया वाणिं देउनी । बसवि आत्म स्वस्थानिं नेउनी ।
कधिं तरी असे दैव ऊघडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥४५॥
बहुत बोलणें कोण कोणचें । परम मिष्ट पक्वान्निं लोणचें ।
रुचति हे तुला शब्द बोबडें । खचित रेणुके ! सांग येवढें ॥४६॥
स्वगुण रत्न श्रीमाय शीकवी । मग मलाचि तूं मानसी कवी ।
करिन पाठ सूकीर्तिचे धडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥४७॥
शिशुसवें पदें माय घोकि ती । मग दुराक्षरें हीं निघो किती ।
सुरस तीळ संक्रांतिचे पुडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥४८॥
शिशुच शोभवी माउलीपण । सजल पारदाऽश्रींत दर्पण ।
असति कोटिच्या पोटिं शेंकडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥४९॥
खटकतीं तुझ्या पायिं जोडवीं । खट कपाळिं या बाइ जोडवी ।
खटचि कां न होतील चोपडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥५०॥
प्रगटली महानंदि राजसा । दिनमणी अला मंदिरा जसा ।
लपति काजवे शत्रु ते किडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥५१॥
सुरभि कल्पवृक्षाचि साउली । सदय विष्णुदासाचि माउली ।
गरजती स्वयं सिद्ध चौघडे । खचित रेणुके ! सांग येवढें ॥५२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP