रेणुकेचें अष्टक - दहावें
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( वृत्तः भुजंगप्रयात )
तुझीं आसती कोटि ब्रह्मांड बाळें ।
तसें घेइ पोटीं मलाही दयाळे ॥
नको दुसर्या गर्भवासासि धाडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥१॥
तुझ्या वांचुनी होतसे जीव कष्टी ।
तुला एकदां पाहुं दे माय दृष्टीं ॥
नको प्रीतिचा लाविला कोंभ मोडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥२॥
समर्थागृहीं इष्ट शिष्टाधिकारी ।
तया पंगतीं बैसलीया भिकारी ॥
नको अन्नपात्रामधें भिन्न वाढूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥३॥
जपोनी तुझें नांव मोठें प्रतापी ।
बुडाला जगीं कोणता सांग पापी ॥
नको येकट्याला मला खालिं धाडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥४॥
तुझ्या भेटिची लागली आस मोठी ।
परी दुष्ट येती आडवे शत्रु कोटी ॥
नको भीड त्यांची धरुं माझि तोडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥५॥
तुझा पुत्र हा वाटल्या तारणें हो ।
तुझा शत्रु हा वाटल्या मारणें हो ॥
नको तीसरा याविणें खेळ मांडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥६॥
पुरे झाली ही नांवनीशी कवीता ।
रसाभास होतो, बहु शीकवीता ॥
मना माउलीला नको व्यर्थ भांडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥७॥
अम्ही लेकरांनीं रडावें रुसावें ।
अमा देउनी त्वांचि डोळे पुसावे ॥
नको कायदा हा तुझा तूंचि फाडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥८॥
गडे ! येउनी तूं कडे घे मुक्यानें ।
करी शांत आलिंगुनीया मुक्यानें ।
नको विष्णुदासाप्रती तूं विभांडूं ।
नको रेणुके ! आपुलें ब्रीद सोडूं ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : September 05, 2013
TOP