रेणुकेचें अष्टक - नववें

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( दिंड्या )
माझि पतिताची, पापकृती खोटी ।
तुझी पावन करण्याचि शक्ति मोठी ॥
समजवंता मी, काय समजाऊं ।
ऊठ अंबे ! तूं झोंपि नको जाऊं ॥१॥
जरी गेलिस तूं मायबाइ झोंपी ।
तरी बुडतिल भव - सागरांत पापी ।
ब्रह्मज्ञानीही लागतील वाहूं ॥ ऊठ० २॥
कामक्रोधादिक चोरटे गृहांत ।
शिरुनि पडले ते दुष्ट आग्रहांत ॥
लुटूं म्हणती हणुं, मारुं जीव घेऊं ॥ ऊठ० ३॥
काळसर्प मुख, वासुनी उशाला ।
टपत बसला तो, भीइना कशाला ॥
कितीतरि या निर्वाणिं तुला बाहूं ॥ ऊठ० ४॥
कृपा सोडुनि निजलीस यथासांग ।
उपेक्षीसी मज, काय अतां सांग ।
कृपावंते ! निष्ठूर नको होऊं ॥ ऊठ० ५॥
तुझ्याविण मी कोणासि हात जोडूं ।
आइ म्हणुनी, कोणाचा पदर ओढूं ॥
तुझे पाय सोडूनि कुठें जाऊं ॥ ऊठ० ६॥
जगीं त्राता तुज - वीण कोणि नाहीं ।
माझि कोणी कळवळ जाणिनाही ॥
तूंच जननी तूं, जनक बहिण भाऊ ॥ ऊठ० ७॥
नको सांड करुं, माझिया जिवाची ।
तुला एकविरे ! आण भार्गवाची ॥
नको सहसा जगदंबे अंत पाहूं ॥ ऊठ० ८॥
जरी माझी ना, करिसी तूं उपेक्षा ।
तरी वाढेल तुझें नांव याहिपेक्षां ॥
विष्णुदास म्हणे, गूण तुझे गाऊं ॥ ऊठ० ९॥


References : N/A
Last Updated : September 05, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP