( वृत्त : शिखरिणी )
नमस्ते श्रीअंबात्मज गणपती ब्रह्मकुमरी ।
नमस्ते श्रीविद्यावदन कमलानंद भ्रमरी ॥
नमस्ते श्रीदत्तात्रय गुरु कृपासागर मुनी ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥१॥
भवान्धःकारान्ता, प्रगटलि महारत्न दिपिका ।
अयोनीसंभव्या, सकल गुणमंडीत लतिका ॥
स्वयं भंगा रंगा, सगुणरुप लावण्य अवनी ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥२॥
निघाली यज्ञाच्या, सजिवन कला अग्निमधुनी ।
वसे सिंहाद्रींही, दशशतकरांलागिं वधुनी ॥
विराजे सदभक्तांकित भगवती याज्ञशयनी ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥३॥
पिता रेणूराजा, रुचिक तपराशी श्वशुर तो ।
महा उग्र क्षोभी, रमण जमदग्नीच हरतो ॥
जिच्या जन्मांत्राच्या, त्रिभुवनिं सुता बंधुभगिनीं ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥४॥
पतीतोद्धाराया, सुखकर भवाब्धींत नवका ।
जिच्या दैत्यानाशें, सुरवरगणालागिं तवका ॥
अई रेणूकाही, प्रबल महिषासूर मथनी ।
नमस्ते श्रीअंबे, विजयि परशूरामजननी ॥५॥
जणूं वत्सासाठीं, टपत विजनीं धेनु बसली ।
न येती कां कोणी, म्हणुनि मनिं कीं काय रुसली ॥
अपापें पान्हावें, मुळपिठ निरालंब अवनी ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥६॥
गळा माळा पीतांबर भरजरी रंग पिंवळा ।
उरस्थ प्रेमाच्या, उदधिंत मनोभाव कवळा ॥
इच्या वाटे कोटी, हरपति रवीं चंद्र वदनीं ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥७॥
कृपाब्धीची वाहे, क्षितितळवटीं वत्सलहरी ।
पतीतांची सारीं, दुरित मलपापें परिहरी ॥
करी विष्णूदासा, अळस त्यजुनी पावन जनीं ।
नमस्ते श्रीअंबे विजयि परशूरामजननी ॥८॥