रेणुकेचें अष्टक - अकरावें

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


वृत्त : ( भुजंगप्रयात )
नमो आदि गौरीसुता एकदंता ।
नमो शारदा सदगुरु ज्ञानदाता ॥
नमो आदिशक्ती महीषासुरारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥१॥
तुला चिंतिल्या पावती मोक्ष प्राणी ।
अशी गर्जना व्यासवाणी पुराणीं ॥
महाद्वाड हा एवढा पापि तारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥२॥
अगा जाहलीसी अनाथाचि आई ।
म्हणूनी तुला प्रार्थितों मी तुकाई ॥
करी कींव कीं गांजिलों संवसारीं ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥३॥
जगन्नायके ! आयके एक आतां ।
उणें काय होतें मला अल्प देतां ॥
बहु जन्मिचा मी तुझा ऊपकारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥४॥
अराधीत मी दास तूझा अराधी ।
करावी कृपा त्याहुनी आपराधी ॥
कृपा जोगवा दान मागे भिकारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥५॥
नको येउं कोपा कृपादृष्टिं पाहे ।
मला आसरा दूसरा कोण आहे ॥
तुला लाज माझी तुझी आस सारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥६॥
अझूनि कशी पाहसी नीरवाण ।
पहा माझिया दाटला कंठिं प्राण ॥
जिवा त्रासलों पावलों कष्ट भारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥७॥
श्रीदेवि जयदेवि जय जय भवानी ।
महादेवि तूं माय कैवल्यदानी ॥
स्तुती विष्णुदासाचिही आवधारी ।
अतां रेणुके ! दुःख माझें निवारी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 05, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP