रेणुकेचें अष्टक - सोळावें

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( वृत्त : चामर )
येक वेळही कधीं न, ब्रह्मवृंद वंदिले ।
सर्व काळ पुण्यवंत, साधुसंत निंदिले ॥
जाहली वडील सभ्य, सज्जनांचि मस्करी ।
आपराध हे क्षमा तुं, माय रेणुके करी ॥१॥
ब्राह्मणाचिये कुलांत, श्रेष्ठ धर्म लाधला ।
भ्रष्टवोनि सर्व तो, प्रपंच मानिला भला ॥
तत्र पोषणार्थ केलि, दुर्जनांचि चाकरी ।
आपराध हे क्षमा तुं, माय रेणुके करी ॥२॥
कामिनींत प्रेमयुक्त, चित्तवित्त अर्पिलें ।
मी क्षुधीत याचकांसि, भोजनें न तर्पिलें ॥
लाधले प्रपंच पात्रिं, भेद दोष या करीं ।
आपराध हे क्षमा तुं, माय रेणुके करी ॥३॥
काळजांत काळकूट, वीष शर्करा मुखीं ।
चिंतनेंत होत घातपात हात गौमुखीं ॥
साधनांहि साधलें मिं, सोंगढोंग तस्करी ।
आपराध हे क्षमा तुं, माय रेणुके करी ॥४॥
स्त्रीधनांत दुर्मदांत स्वगृहांत माजलों ।
वर्ततां अधर्मिं कांहीं, स्वल्प नाहिं लाजलों ॥
पापपुण्य कर्दमांत, नाचलों जसा करी ।
आपराध हे क्षमा तुं, माय रेणुके करी ॥५॥
सर्व काळ काम धाम, कामिं चित्त गुंतलें ।
तै तुझें भवानि नाम, येकदां न चिंतिलें ॥
दाविली जनासमोर, नाचवून वैखरी ।
आपराध हे क्षमा तुं, माय रेणुके करी ॥६॥
लौकिकार्थ पाठ केलिं, श्रीगुरुचिं अक्षरें ।
जेंविं कृष्ण यामिनींत, चमकताति नक्षरें ॥
तेंविं तीं न प्राप्त होतिं, शुद्ध ज्ञान भास्करीं ।
आपराध हे क्षमा तुं, माय रेणुके करी ॥७॥
मी प्रचंड पातकें, प्रशस्त मानलीं हिता ।
चित्तिं त्रासला असेल, चित्रगुप्त लीहितां ॥
प्रार्थनाहि अष्टश्लोकिं, स्पष्ट बोलिलों खरी ।
आपराध हे क्षमा तुं, माय रेणुके करी ॥८॥
थोर पाप हें म्हणून, साफ ब्रीद संपलें ।
हें म्हणावें काय माय, पाय दावि आपुले ॥
विष्णुदास दे म्हणे, कृपाळु दृष्टि लेंकरीं ।
आपराध हे क्षमा तुं, माय रेणुके करी ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 05, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP