अम्लपित्तनिदान
अम्लपित्ताचीं कारणें व व्याख्या .
विरुद्धदुष्टाम्लविदाहिपित्तप्रकोपिपानान्नभुजो विदग्धम् ॥
पित्तं स्वहेतूपचितं पुरा यत्तदम्लपित्तं प्रवदन्ति सन्त : ॥१॥
अविपाकक्लमोत्क्लेशतिक्ताम्लोद्रारगौरवै : ॥
ह्रत्कण्ठदाहारुचिभिश्चाम्लपित्तं वदेद्भिषक् ॥२॥
संयोग विरुद्ध पदार्थ असलेले व दूषित अन्न व तसेच आंबट , दाहक व पित्तवर्धक असे खाद्य व पेय पदार्थ यांचे सेवन केल्याने रोग्याच्या शरीरांत वर्षादि ऋतुकाळी स्वकारणांनी साचलेले पित्त नासणे यास वैद्य अम्लपित्त असे म्हणतात . अन्नाचे अपचन , आयासावाचून थकवा , मळमळ , अन्नद्वेष व त्याचप्रमाणे कडवट व आंवट ढेकर येणे , अंग जड होणे , ह्रदय व घशात जळजळ लागणे ही लक्षणे रोग्याचे ठिकाणी उदभवली असता हे झाले आहे म्हणून समजावे .
अम्लषित्त अधोगत व ऊर्घ्वगत अशा दोन प्रकारचे आहे ; त्या दोन्ही प्रकारांची लक्षणे खाली दिली आहेत ---
अधोगत अम्लपित्त .
तृडदाहमूर्च्छाभ्रममोहकारी प्रयात्यधो वा विविधप्रकरम् ॥
हृल्लासकोठानलसादहर्षस्वेदाङ्गपीतत्वकरं कदाचित् ॥३॥
अधोगत अम्लपित्तात तहान , दाह , मूर्च्छा , मनास व्याकुलता , घेरी , मळमळ , अंगावर फोड व पिवळेपणा , रोमांच , घाम , आणि अग्निमांद्य ही लक्षणे उद्भवतात व रोग्याच्या गुदद्वारावाटे दुर्गंधीयुक्त व काळया तांबडया अशा अनेक वर्णांचे पित्त पडते . अंग पिवळे होते .
अम्लपित्त उर्ध्वगत .
वान्तं हरित्पीतकनीलकृष्णमारक्तरक्ताभमतीच चाम्लम् ॥
मांसोदकाभं त्वतिपिच्छिलाच्छं श्लेष्मानुयातं विविधंरसेन ॥४॥
भुक्ते विदग्धे त्वथवाप्यभुक्ते करोति तिक्ताम्लवमिं कदाचित् ॥
उद्नारमेवंविधमेव कण्ठे हृत्कुक्षिदाहं शिरसो रूजं च ॥५॥
ऊर्ध्वगत अम्लपित्त झालेल्या रोग्यास हिरवे , काळे , निळे , लाल , तांबूस , मांस धुतलेल्या पाण्यासरखे , अत्यंत आंबट व बुळबुळीत , स्वच्छ , कफयुक्त व खारट , तु ट वगैरे अनेक रसयुक्त असे पित्त पडते ; तसेच केव्हा केव्हा त्याने खाल्लेले अन्न पचत असता अथवा काही खाल्लेही नसता त्यास कडवट व आंबट असे ढेकर येतात व त्याच प्रमाणे वांतीही होते आणि त्याच्या गळयात , कुशीत व उरात जळजळते व त्याचे डोके दुखते .
अम्लपित्ताचे परिणाम व साध्यासाध्य विचार .
करचरणदाहमौष्ण्यं महतामरूचिं ज्वरं च कफपित्तम् ।
जनयति कण्डूमण्डलपिटिकाशतनिचितगात्ररोगचयम् ॥६॥
रोगोऽयमम्लपित्ताख्यो यत्नात्संसाध्यते नव : ॥
चिरोत्थितो भवंद्याप्य : कृच्छ्रसाध्य : स कस्यचित् ॥७॥
वर सांगितल्या प्रकारचा हा अम्लपित्तरोग हातापायांचा दाह , अंगात क की , अत्यंत अरुचि , ज्वर , कंड , कफ व पित्त यांचा प्रकोप , अंगावर शेकडो पुळयांचा उद्भव असे अनेक विकार रोग्याच्या ठिकाणी उत्पन्न करतो . हा नविनच झालेला असला तर प्रयस्न केल्यास साध्य होतो , नाही तर जुना झाला म्हणजे याप्य होऊन राह्तो . फार दिवसांचा हा रोग असलेला रोगी जर पथ्याने वागणारा असले तर हा कष्टाने साध्य होणारा आहे .
सानिलं सानिलकफं सकफं तच्च लक्षयेत् ॥
दोषलिङ्गेन मतिमान् भिषङमोहकरंहि तत् ॥८॥
अम्लपित्ताच्या ऊर्ध्वगत व अधोगत या दोन्ही प्रकारांत वातयुक्त अम्लपित्त कोणते ? वातकफयुक्त कोणते ? आणि कफयुक्त कोणते ? या तिन्ही प्रकाराविषयी बुद्धिमान वैद्याने चिकित्सा करतेवेळी पुढे सांगितलेल्या लक्षणांवरून फार सूक्ष्म विचार केला पाहिजे ; नाहीतर ऊर्ध्वगत अम्लपित्ताचे ठिकाणी छर्दिरोगाचा मास होऊन व अधोगत अम्लपित्ताचे ठिकाणी अतिसाराचा भ्रम पडून त्याच्या चिकित्सेचा घोटाळा होण्याचा संभव असतो . वातयुक्त , कफयुक्त व वातफयुक्त आणि कफपित्तयुक्त अम्लपित्ताच्या प्रकारांची लक्षणे आता क्रमाने सांगतो .
वातयुक्त अंम्लपित्त ,
कम्पप्रलापमूर्च्छाचिमिचिमिगात्रावसादशूलानि ॥
तमसो दशनविभ्रमविमोहहर्षाण्यनिलकापात् ॥९॥
कंप सुटणे , बडबड , मूर्च्छा , अंगास मुंग्या येणे व ते व्याकुल होणे , पोट दुखणे , डोळयांपुढे अंधेरी येणे , भ्रांति , इंद्रिये व मन यांच्या ठिकाणी ग्लानि आणि रोमांच ही लक्षणे वातयुक्त अम्लपित्ताची होत .
कफयुक्त अम्लपित्त .
कफनिष्ठीवनगौरवजडताऽरुचिशीतसादवमिलेपा : ॥
दहनबलसादकण्डूर्निद्राश्चिन्हं कफानुगते ॥१०॥
कफयुक्त अम्लपित्तात शरीराचे ठिकाणी ग्लानि व जडपणा , आळस , अग्निमांद्य , शैत्य , अरुचि , बलनाश , कंड , निद्रा व वांति ही लक्षणे असतात व रोग्याच्या तोंडास चिकटा येऊन कफाचे बेडके पडतात .
उभयमिदमेव चिन्हं मारुतकफसम्भवे भवत्यम्ले ॥११॥
वर सांगितलेली वातयुक्त व कफयुक्त अम्लपित्ताची लक्षणे एकत्र द्दष्टीस पडली म्हणजे त्यास वातकफयुक्त अम्लपित्त म्हणावे .
कफपित्तयुक्त अम्लपित्त .
भ्रमोमूर्च्छाऽरुचिच्छर्दिरालस्यं च शिरोरुज : ।
प्रसेकोमुखामाधुर्यं श्लेष्मपित्तस्य लक्षणम् ॥१२॥
कफयुक्त अम्लपित्ताची लक्षणे - भ्रम , मूर्च्छा , ओकारी , अरुचि आळस व त्याचप्रमाणे डोके दुखणे , तोंड गोड होणे व त्यास पाणी सुटणे याप्रमाणे जाणावी .