शोथरोगनिदान
शोथाची संप्राप्ति .
रक्तपित्तकफान्वायुर्दुष्टो दुष्टान्बहि : शिरा : ॥
नीत्वा रुद्धगतिस्तैर्हि कुर्यात्त्वङमांससंश्रयम् ॥१॥
सोत्सेधं संहतं शोथं तमाहुर्निचयादत : ॥
जेव्हा दूषित वायु आपापल्या कारणांनी दूषित झालेल्या रक्तपित्तकफांस रोग्याच्या बाह्य शिरांत नेतो तेव्हा त्यांच्याकडून तो कोंडला जातो ; मग अशा प्रकाराने त्याची गति बंद झाली असता तो त्वचा व मांस यांचा आश्रय करून शोथरोग ( सूज ) उत्पन्न करतो . यात येणारी सूज उंच व कठीण असून तिच्या ठिकाणी रक्तासहित त्रिदोष संबंध असतो , म्हणून ती सान्निपातात्मक आहे असे वैद्य म्हणतात .
शोथरोगाचे प्रकार .
सर्वं हेतुविशेषैस्तु रुपभेदान्नवात्मकम् ॥२॥
दोषै : पृथग्द्वयै : सर्वैरभिघाताद्विषादपि ॥
कारणविशेषेकरून रूपभेद्रामुळे होणारे या शोथरोगाचे नऊ प्रकार असतात , ते पृथक् पृथक् दोषांपासून होणारे तीन , द्वंद्वज ( दोन दोषांच्या आघात , संयोगाने होणारे ) तीन व सन्निपातजन्य एक असे सात आणि जखमेमुळे व विषामुळे उत्पन्न होणारे निरनिराळे असे दोन मिळून एकंदर नऊ जाणावे .
पूर्वरूप .
तत्पूर्वरूपं दवथु : शिरायामोऽङगगौरवम् ॥३॥
सूज यावयाच्या पूर्वी रोग्याचे अंग जड होते . शिरा ताणल्यासारख्या वेदना होतात व त्याच्या नेत्रादि इंद्रीयांचा संताप ( दाह ) होतो .
शोथाची कारणें .
शुद्धामया भक्तकृशाबलानां क्षाराम्लतीक्ष्णोष्णगुरूपसेवा ॥
दध्याममृच्छाकविरोधिदुष्टगरोपसृष्टान्ननिषेवण च ॥४॥
वमन व रेचक इ . विधीव्या चुकीमुळे ज्वरादि रोग व उपवास यांनी कृश व अशक्त झालेल्या मनुष्यानी संयोगजन्य विषाने दुषित झालेले अन्न अथवा संयोगविरुद्व . ( दूध , मासे वगैरे ) पदार्थ खाणे आणि खारट , आंबट , तिखट , उष्ण न जड अशा पदार्थांचे सेवन करणे , व्यायाम न करणे , मर्मस्थानी अपवात होणे , मूळवयध उद्भवणे बमनादि पंचमर्मांचा व्यमिचार घडणे आणि अपव्क गर्बपात होऊन प्रसूति होणे ही सर्व दोषजन्य शोथरोग ( सूज ) उत्पन्न होण्याची कारणे सांगितली आहेत .
शोथाचीं लक्षणें .
अर्शांस्यचेष्टा न च देहशुद्धिर्मर्मोपघातो विषमा प्रसूति : ॥
मिथ्योपचार : प्रतिकर्मणां च निजस्य हेतु : श्वसथो : प्रदिष्ट : ॥
सगौरवं स्थादनवस्थितत्वं सोत्सेधमूष्माथ शिरातनुत्वम् ॥
सलोमहर्षश्च विवर्णता च सामान्यलिङ्गंश्वयथो : प्रदिष्टम् ॥६॥
अंग जड होणे व त्याचा वर्ण बदलणे , बदलणे , दाह होणे , मनास स्वस्थता नसणे , काटा येणे , शिरा बारीक होणे व सुजलेला उंचवटा असणे , ही शोथ रोगाची ( सुज्ञेची ) सामान्य लक्षणे होत .
वातजन्य शोथाचीं लक्षणें .
चलस्तनुत्वक् परुषोऽरुणो सित :
सुषुप्तिहर्षर्तियुतोऽनिमित्तत : ॥
प्रशाम्यति प्रोन्नमतिप्रपीडितो
दिवा बली स्यात् श्वयथु : समीरणात् ॥७॥
वातदोषापासून उद्भवलेली सूज घटकेत कमीजास्त होणारी , खरखरीत , तांबूस अथवा काळीळ , मेहेरलेली पातळ त्वचेची व मिणमिण वेदना करणारी अशी असून ती दाबली असता वर येते शिवाय ही दिवसा जोर करते व कधी कधी कारणावाचून कमी पडते .
पित्तजन्य शोथ ,
मृदु : सगन्धोऽसितपीतरागवान् भ्रमज्वरस्वेतृषामदान्वित : ॥
व उष्यते स्पर्शरुगाक्षिरागकृत् स पित्तशोथो भृज्ञदाहापाकान् ॥
पित्तजन्य असलेली सूज मऊ , किंचित् वास असलेली , काळी , पिवळी अथवा तांबूस , जळजळणारी व हात लावला असता दुखणारी अशी असून तिच्या ठिकाणी अत्यंत दाह असतो व ती पिकते . ही उद्भवली असता नेत्रास लाली , चक्कर , तहान , घाम , उन्मत्तपणा व ज्वर ही लक्षणे रोग्याच्या ठिकाणी द्दष्टीस पडतात .
कफजन्य शोथाचीं लक्षणें .
गुरू : स्थिर : पाण्डुररोचकान्वित :
प्रसेकनिद्रावमिवह्निमान्द्यकृत् :
सकृच्छ्रजन्मप्रशमो निपीडितो
न चोन्नमेद्रात्रिबली कफात्मक : ॥९॥
कफप्रकोपाने आलेली सूज जडत्व आणणारी , पांढरी , स्थिर राहणारी , दाबली असता वर न येणारी व रात्रीस जोर करणारी असून तिजमुळे अग्निमांद्य , अरुचि , ओकारी , लालास्राव व निद्रा ही लक्षणे उत्पन्न होतात .
द्वंद्वज व सान्निपातिक शोथ .
निदानाकृतिसंसर्गाच्छवयथु : स्याद्द्विदोषज : ॥
सर्वाकृति : सन्निपाताच्छोथो व्यामिश्रलक्षण : ॥१०॥
जेव्हा द्वंद्वज शोथरोग उद्भवतो तेव्हा त्यात येणार्या सुजेमध्ये वर सांगितलेल्या वात , पित्त व कफ या तिन्ही दोषांपासून उत्पन्न होणार्या सुजेच्या निरनिराळया लक्षणांपैकी तिजमध्ये ज्या दोन दोषांचा संयोग झालेला असतो त्याची लक्षणे संयुक्त असतात व त्याचप्रमाणे सान्निपातिक असलेल्या सुजेत तिन्हीही दोषांची लक्षणे मिश्र झालेली द्दष्टीस पडतात .
अभिघातजन्य शोथाचीं लक्षणें .
अभिघातेन शस्त्रादिच्छेदभेदक्षतादिभि : ॥
हिमानिलोदध्यनिलैर्भल्लातकपिकच्छुजै : ॥११॥
रसैशूकैश्च संस्पर्शाच्छ्वयथु : स्याद्विसर्पवान् ॥
भृशोष्मा लोहिताभास : प्रायश : पित्तलक्षण : ॥१२॥
लाकडाचा वगैरे घाव , शस्वादिकांनी तुटणे , फुटणे , क्षत , थंड अथवा समुद्रावरील वारा , बिव्याचे तेल व कुहिलीचे लागलेले कूस किंवा रस यामुळे येणारी सूज तांबडया रंगाची , अत्यंत दाह करणारी व चहूकडे पसरणारी असून प्राय : वर सांगितलेल्या पित्तजन्य सुजेच्या लक्षणांनी युक्त असते .
विषजन्य शोथाचीं लक्षणें .
विषज : सविषप्राणिपरिसर्पणमृत्रणात् ॥
दंष्ट्रादन्तनखाघातादविषप्राणिनामापि ॥१३॥
विण्मूत्रशुक्रोपहतमलवद्वस्नसङ्करात ॥
विषवृक्षानिलस्पर्शाद्नरयोगावचूर्णनात् ॥१४॥
मृदुश्चलो वलम्बी च शीघ्रो दाहरुजाकर : ॥
विषारी प्राण्यांचे अंगावरून जाणे , त्यांचे मूत्र पडणे , अथवा विषारी नसलेल्या प्राण्यांचेही दात , दादा व नखे य़ांचा त्याच्या ठिकाणी प्रयोग होणे , किंवा विष्ठा , मूत्र , शुक्र यांनी भरलेले व मलीन वस्त्र अंगावर घेणे , तसेच विषवृक्षावरून आलेल्या वार्याचा त्यास स्पर्श होणे अथवा संयोगजन्य विषाने ते चोळवटले जाणे , या कारणांमुळें उद्भवणारी सूज विषजन्य समजावी . ती तत्काळ होणारी , खाली लोंबणारी , चंचल ( घटकेत कमीजास्त होणारी ) मऊ व दाह आणि वेदना करणारी अशी असते .
कोणते दोष कोठें शोथ उत्पन्न करितात ?
दोषा : श्वयथुमूर्ध्वं हि कुर्वन्त्यामाशयास्थेता : ॥
पक्काशयस्था मध्ये तु वर्चस्थानगतास्त्वध : ॥१५॥
कृत्स्नदेहमनुप्राप्ता : कुर्यु : सर्वसरं तथा ॥
आमाशयातील दोष उरापासून वरील भागावर , पव्काशयातील दोष ऊर व पव्काशय यांच्यामधील भागावर व मलस्थानानील दोष पव्काशयापासून पायापर्यंतच्या खालील भागावर या क्रमाने सूज उत्पन्न करतात ; व जेव्हा हे दोष सर्व शरीरात पसरलेले असतात तेव्हा सर्वांग सुजेने व्याप्त होते .
यो मध्यदेशे श्वयथु : स कष्ट : सर्वगश्च य : ॥
अधोऽङ्गेऽरिष्टभूत : स्याद्यश्चोर्ध्वं परिसर्पति ॥१६॥
श्वास : पिपासा छर्दिश्च दौर्बल्यं ज्वर एव च ॥
यस्य चान्ने रुचिर्नास्ति शोथिनं परिवर्जयेत् ॥१७॥
अनन्योपद्रवकृत : शोथ : पादसमुस्थित : ॥
पुरुषं हन्ति नारीं तु मुखजो गुह्यजो द्वयम् ॥
नवोऽनुपद्रव : शोथ : साध्योऽसाध्य : पुरेरित : ॥१८॥
नवीन उद्भवलेली व उपद्रवरहित असलेली सूज साध्य होते व शरीराच्या मध्यभागावर अथवा सर्व शरीरावर आलेली सूज कष्टसाध्य असते ; परंतु खालच्या भागावर उत्पन्न होऊन वर चढणारी सूज रोग्याचे मरणच सुचवते . जो सूज आलेला रोगी श्वास , तहान , ओकारी , अरुची व ज्वर या लक्षणांनी युक्त असून अशक्त झालेला असेल त्याची केलेली चिकित्सा निष्कळ होते . तसेच , दुसर्या रोगाचा उपद्रव म्हणून न आलेली अशी सूज पायांवर येऊन वर चढणारी असली तर पुरुषाचा नाश करणारी , तोंडावर येऊन खाली उतरणारी असली तर स्त्रीला मारणारी आणि गुह्यस्थानी [ शिश्न अथवा योनि यांच्या ठिकाणी ] उत्पन्न होऊन मग सर्व शरीर व्यापणारी ती दोधांचीही [ पुरुष व स्त्री यांची ] वाट लावणारी असते म्हणून समजावे .