अनिष्ट मंगळ

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


लग्ने तुर्येऽष्टमे भौमे सप्तमेऽन्त्ये च जन्मनि ।

भर्तुर्योषिद्विनाश : स्यात् स्त्रिया भर्तृविनाशनम् ॥६०॥

एवंविधे कुजे संख्ये विवाहो न कदाचन ।

कार्यो वा गुणबाहुल्ये कुजे वा तादृशे द्वयो : ॥६१॥

जन्मलग्नीं किंवा लग्नापासून चवथा , सातवा , आठवा आणि बारावा असा पांच स्थानीं मंगळ असेल तर तो अनिष्ट मंगळ होय . वधूवरांतून एकाला अनिष्ट मंगळ असून दुसर्‍याला तसा नसेल तर तें ग्राह्य नाहीं . वधूवरांपैकीं एकाला ज्या स्थानांतील मंगळ असेल त्याच स्थानीं दुसर्‍याला असला पाहिजे असें नाहीं . फक्त पांच स्थानांपैकीं कोणत्या तरी एका स्थानांतील असावा . तसेंच एकाच्या सप्तमस्थानांत मंगळ असून दुसर्‍याच्या सप्तमस्थानांत शनि किंवा सप्तमस्थानावर शनीची दृष्टि असेल तर तेंही ग्राह्य धरून विवाह करावा असें कित्येकांचें मत आहे . तसेंच , कित्येक ज्योतिष्यांच्या मतें , सप्तमेश जेथें असेल त्या स्थानापासून जर १।४।७।८।१२ या स्थानीं मंगळ असेल , तर मात्र तो अनिष्ट मंगळ समजावा , असें आहे . तथापि दोन्ही नियम अपवादात्मक आहेत असा अनुभव आहे . गुणांची संख्या पूर्ण असतां कुजदोष नष्ट होतो . येथें एवढें अवश्य सांगितलें पाहिजे कीं , मंगळ वगैरे पाहणें असेल तर जन्मपत्रिका मात्र अत्यंत विश्वसनीय , म्हणजे जन्मकाळ बरोबर साधून केलेली असली पाहिजे . घडयाळाशिवाय अनुमानानें वेळ ठरवून त्याप्रमाणें कुंडली तयार केलेली असेल तर ती व्यर्थ होय . कारण पांचदहा मिनिटांचा फरक पडला तरी देखील सर्व कुंडली बदलते . अशा वेळेस आपण चवथा मंगळ म्हणून जो ठरवावा तो तिसरा किंवा पांचवा देखील असूं शकेल ; याकरितां आपण केलेली कुंडली विश्वसनीय आहे , अशी आपली पक्की खात्री असेल तरच कुंडलींत अनिष्ट मंगळ असल्यास , त्याचा विचार करावा . विश्वसनीय कुंडली म्हणजे जन्मकाळ गणितानें सिद्ध करून त्या वेळचें लग्न , द्वादश भाव व स्पष्टग्रह साधून व ग्रहांच्या बलाचा विचार करून नंतर घटिताचा व मंगळाचा विचार करावा . कारण ग्रह हीनबली असतील तर निष्फळ होतात , अथवा विरुद्धफळही देतात . वेधामुळेंही ग्रहांपासून विरुद्ध फळ मिळतें . म्हणून ग्रहांचीं फलें पाहतांना वेधाचाही अवश्य विचार करावा . स्पष्टग्रह सिद्ध करावयाचे ते जन्मस्थानाच्या स्थानिक पंचांगावरून करावे .

शनि आदिकरून इतर पापग्रह विशेष दोषास्पद न मानितां विवाहकालीं मंगळच मुख्यत्वेंकरून कां अमंगळ मानिला आहे हें कळत नाहीं . लग्नीं , चतुर्थस्थानीं व द्वादशस्थानीं असलेल्या मंगळाची दृष्टि सप्तमस्थानावर असते ती अशुभ होय , किंवा अष्टमस्थानीं मंगळ असल्यास कुटुंव ( द्वितीय ) स्थानावर दृष्टि पडते म्हणून ती अशुभ , आणि सप्तमस्थान हें तर वधूकुंडलींत पतीचें स्थान आणि वरकुंडलींत जायास्थान म्हणून तेथें असणारां मंगळ तर अर्थातच अशुभ होय . अशा कल्पनेनें मंगळाचें स्तोम विवाहसमयीं घटित जमवितांना कोणींतरी प्रचारांत आणिलें आहे ; पण याला प्राचीन जातकग्रंथांत आधार सांपडत नाहीं . मुहूर्तचिंतामणि , मुहूर्तमार्तंड , बृहज्जातक , सारावली वगैरे ग्रंथांतून विवाहघटिताचा विस्तृत विचार केलेला आहे . परंतु त्यांत मंगळाविषयीं कांहीं उल्लेख नाहीं . वधूचें सप्तम व अष्टम स्थान खलग्रहानें दूषित नसावें इतकेंच त्यांत सांगितलेलें आहे . यावरून असें दिसतें कीं , ही कुजदोषाची कल्पना अर्वाचीन म्हणजे शेंदोनशें वर्षांची असावी . आधाराकरितां घेतलेली उपरिनिर्दिष्ट दोन श्लोक मुहूर्तगणपतिनामक ग्रंथांतील असून तो ग्रंथ गुर्जरप्रांतस्थ ज्योतिर्विदानें रचिलेला आहे . यावरून गुजरात प्रांतांतून ही कुजदोषाची कल्पना आली असावी असें कित्येकांचें मत आहे . शिवाय हा भौमदोष पहाण्याचे दोनतीन प्रकार आढळतात . कोणी चंद्रापासून म्हणजे जन्मलग्नकुंडलींत जेथें चंद्र असेल तेथपासून मंगळ मोजतात ; कित्येक सप्तमेश जेथें असेल तेथून मंगळ मोजतात ; आणि कोणी जन्मलग्नापासून मोजतात . यांपैकीं अधिक विश्वसनीय प्रकार कोणता हें निश्चितपणें कोणी ठरविलेलें नाहीं . सारांश , खलग्रहांचा विचार कर्तव्य असेल तर पत्रिका सूक्ष्मगणितानें सिद्ध केलेली व विश्वसनीय तरी असावी . जन्मापासून १५।१६ वर्षें लोटल्यानंतर विवाहसमयीं अनुमानानें कशी तरी पत्रिका करवितात हें खूळ किंवा फसवणूक आहे .

मंगळाचा दोषपरिहार .

जामित्रे च यदा सौरिर्लग्ने वा पंचमेऽथवा ।

अष्टमे दशमे चैव भौमदोषो न विद्यते ॥६२॥

अजे लग्ने व्यये चापे पाताले वृश्चिके कुजे ।

द्युने मृगे कर्की चाष्टौ भौमदोषो न विद्यते ॥६३॥

सवले गुरौ भृगौ वा लग्नाद द्युनगेपि वाथवा भौमे ।

वक्रिणि नीचारिगृहस्थेवार्कस्थेपि वा न कुजदोष : ॥६४॥

राशिमैत्रीं यदा याति गणैक्यं वा यदा भवेत् ।

अथवा गुणबाहुल्ये भौमदोषो न निद्यते ॥६५॥

अस्तगे नीचगे भौमे शत्रुक्षेत्रगतेऽपि वा ।

कुजाष्टमोद्भबो दोषो न किंचिदपि विद्यते ॥६६॥

कुंडलींत सप्तमस्थानीं , लग्नीं , पंचमस्थानीं , अष्टमस्थानीं , दशमस्थानीं ( किंवा द्वादशस्थानीं ) शनि असतां भौमदोष मानूं नये . कारण तेथून शनीची दृष्टी सप्तमस्थानावर व कुटुंबस्थानावर पडते . तसेंच , मेषराशीचा मंगळलग्नीं , धनु राशीचा व्ययस्थानीं , वृश्चिकराशीचा चतुर्थस्थानीं मकरराशीचा सप्तमस्थानीं व कर्कराशीचा अष्टमस्थानीं असलेला मंगळ दोषावह होत नाहीं . तसेंच , तो मंगळ वक्री , नीचीचा , शत्रुगृहींचा , अस्तंगत अथवा शुभग्रहानें पूर्णद्दष्ट असल्यास किंवा बलवान् गुरु - शुक्र लग्नीं अथवा सप्तमस्थानीं असतां कुजदोष रहात नाही . अथवा वधूवरांच्या राशींच्या स्वामींची मैत्री असल्यास , एक गण असल्यास , किवा गुणबाहुल्य असतां म्हणजे २४ गुणांहून अधिक गुण असतां मंगळाचा दोष नष्ट होतो .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP