न कन्याया : पिता विद्वान् गृह्णीयाच्छुल्कमण्वपि ।
गृह्णन् शुल्कं हि लोभेन स्यान्नरोऽपत्यविक्रयी ॥४५॥
स्त्रीधनानि तु ये मोहादुपजीवन्ति बांधवा : ।
नारीयानानि वस्त्रं वा ते पापा यान्त्यधोगतिम् ॥४६॥
यः कन्यापालनं कृत्वा करोति यदि विक्रयम् ।
विपदा धनलोभेन कुंभीपाकं स गच्छति ॥४७॥
अपत्यविक्रय करुन त्याचें द्रव्य घेणें ह्यास मनूनें शुक्ल असें म्हटलें आहे . आणि जो बाप कन्याविक्रय करून द्रव्य घेईल किंवा उपजीविकेकरितां स्त्रीधनाचा अपहार करील तो अधोगतीस जाईल असेंही सांगितलें आहे . मुलाचा हुंडा घेणें हा देखील मनूच्या मताप्रमाणें अपत्यविक्रयच होय . परंतु हुंडा घेणें ही गोष्ट लोकांत वाईट समजली जात नाहीं आणि कन्याविक्रय मात्र लोक निंद्य समजतात ! तथापि शास्त्रदृष्ठया शुल्क किंवा हुंडा घेणारे दोघेही सारखेच दोषी आहेत . सांप्रत हुंडयाचें प्रमाण अमर्याद वाढत चाललें आहे हें बव्हंशीं दारिद्याचेंच द्योतक आहे . असो ; कोणत्याही पुरुषानें वधू विकत घेऊन तिचें पाणिग्रहण करूं नये . कारण मनूनें असें सांगितलें आहे कीं , " क्रयक्रीता च या कन्या पत्नी सा न विधीयते " । वधू विकत घेऊन तिचें पाणिग्रहण केलें असतां ती वधू , पत्नी या पवित्र संज्ञेला पात्र होत नसून दासी होते आणि धर्मकृत्यांना दासी वर्ज्य मानिलेली आहे . यासाठीं विचारी पुरुषानें वधू विकत घेऊन तिच्याशीं विवाह करूं नये . म्हणजे त्या योगानें कन्याविक्रयाच्या पातकाला उत्तेजन दिल्याचा दोष लागणार नाहीं ; व दासीच्या पाणिग्रहणापासून घडणारें पातकही टळेल . असे दोन अर्थ साधितां येतील .