मातुः सपल्या भगिनीं तत्सुतां च विवर्जयेत् ।
पितृव्यपत्नीभगिनी तत्सुतां च विवर्जयेत् ॥४८॥
पैतृष्वसेयीं भगिनीं स्वस्त्रीयां मातुरेव च ।
एतास्तिस्त्रस्तु भार्यार्थे नोपयच्छेत बुद्धिमान् ॥४९॥
मातुलस्य सुतामूढ्वा मातृगोत्रां तथैव च ।
समानप्रवरां चैव त्यक्त्वा चांद्रायणं चरेत् ॥५०॥
वधूचें लक्षण पूर्वीं सांगितलें आहे तें ध्यानांत ठेवून , त्याशिवाय आतेबहीण , मावसबहीण व मामेबहीण यांच्याशीं विवाह करूं नये . कित्येक ठिकाणीं मामेबहिणीशीं लग्न करण्याचा परिपाठ आहे ; पण तो गौण पक्ष होय . आपल्या बायकोच्या बहिणीची कन्या ; चुलत्याच्या बायकोची बहीण व तिची कन्या ; सापत्न मातेची बहीण व त्या बहिणीच्या कन्या ; ह्यांबरोबर विवाह करूं नये . तसेंच ‘ ज्येष्ठो भ्राता पितुः समः ’ । म्हणजे वडील भाऊ बापाप्रमाणें होय . असें वचन असल्यामुळें ज्येष्ठ भ्रात्याच्या पत्नीची बहीण ती आपणाला मावशीप्रमाणें होते , म्हणून तीहि वर्ज्य करावी . असें कित्येक म्हणतात . माध्यंदिनशाखेच्या ब्राह्मणांनीं मामाचें गोत्र वर्ज्य करावें असें सांगितलें आहे ; म्हणजे त्या गोत्रांतील किंवा त्या गोत्राच्या समान प्रवरांतील कन्येशीं विवाह करूं नये किंवा त्या गोत्रांत कन्या देऊं नये . तथापि अडचणीच्यावेळीं मामाचें केवळ गोत्र मात्र पाळावें , परंतु प्रवरांचा विचार करण्याची जरुरी नाहीं . असें शास्त्रमत आहे . वजुःशाखेच्या कित्येक ब्राह्मणांत भाचीबरोबर मामीचें लग्न करण्याचा क्वचित अडचणीच्या प्रसंगीं प्रघात आहे , पण ही गोष्ट शास्त्रदृष्टया निंद्य आहे . पूर्वीं विरुद्धसंबंध या विषयांत हें विवेचन झालें आहेच .