विवाहाचे प्रकार

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


ब्राह्मो दैवस्तथैवार्ष : प्राजापत्यस्तथासुरः ।

गांधर्वो राक्षसश्चैव पैशाचश्चाष्टमोऽधम : ॥५१॥

१ ब्राह्म , २ दैष , ३ आर्ष , ४ प्राजापत्य , ५ आसुर , ६ गांधर्व , ७ राक्षस आणि ८ पैशाच असे आठ प्रकारचे विवाह आहेत . त्यांपैकीं सांप्रत ब्राह्म आणि गांधर्व असे दोन प्रकारचे विवाह मात्र प्रचारांत आहेत . त्यांचीं लक्षणें येथें सांगतो .

ब्राह्मविवाहाचें लक्षण .

आच्छाद्य चार्चयित्वा च श्रुतिशीलवते स्वयम् ।

आहूय दानं कन्याया ब्राह्मो धर्मः प्रकीर्तित : ॥५२॥

विद्वान् आणि गुणवान् असा वर आपल्या घरीं आपण बोलावून आणून वस्त्रांनीं आच्छादित आणि अलंकारांनीं यथाशक्ति विभूषित केलेली आपली कन्या त्यास विधियुक्त देणें , अशा प्रकारच्या विवाहाला ब्राह्मविवाह म्हणतात .

गांधर्वविवाहाचें लक्षण .

इच्छयान्योन्यसंयोग : कन्यायाश्च वरस्य च ।

गांधर्व : स तु विज्ञेयो मैथुन्य : कामसंभव : ॥५३॥

कन्या आणि वर यांच्या परस्परप्रेमानें व विषयाच्या लालसेनें होणारा जो विवाह त्यास गांधर्व किंवा प्रीतिविवाह म्हणतात . सर्व विवाहांत विषयाचा उद्देश आहेच आहे , तेव्हां वरील श्लोकांत ‘ कामसंभव :’ हें पद विशेषें करून घालण्यांत ग्रंथकाराचा इतकाच उद्देश दिसतो कीं , कामेच्छा उत्पन्न होऊन विवाहाची आवश्यकता भासण्याइतकें प्रौढ दांपत्य असावें ; म्हणजे परस्परांच्या संमतीनें हा विवाह व्हावा . तथापि दात्याची म्हणजे पिता किंवा पालक यांचीही संमती त्याला अवश्य पाहिजे . कारण , त्यावांचून विवाह सशास्त्र होत नाहीं ; असो . हा प्रीतिविवाह असल्यामुळें अर्थात् पत्रिका पाहून घटित जमविण्याची आवश्यकता नाहीं . ब्राह्मणांवांचून इतर वर्णांना मात्र गांधर्वविवाहाची मोकळीक शास्त्रकारांनी ठेवली आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP