घटितं प्रथमं ज्ञात्वा शुभदं वरकन्ययो : ।
उद्वाहस्तु विधातव्यस्तेनादौ वच्मि तत् शिवम् ॥५७॥
वर्णो वश्यं तथा तारा योनिर्ग्रहगणस्तथा ।
भकूटं नाडिमैत्री च इत्येवं चाष्टमैत्रिका ॥५८॥
एकैकवृद्धितो ज्ञेया वर्णादीनां गुणाः क्रमात् ।
विवाहे शुभदास्तेषां गुणे त्वष्टादशाधिके ॥५९॥
वधूवरांचें टिप्पण जमविणें याला ज्योतिषांत घटित किंवा मैत्री जमविणें असें म्हणतात . ही मैत्री जन्मनक्षत्र आणि जन्मराशि ह्यांवरून जमवितात . ती जमविल्याशिवाय वधूवरांचा विवाह करूं नये , असें धर्मशास्त्रकारांनीं लिहिलें आहे . तिचे आठ प्रकार आहेत ते असेः --- १ वर्ण , २ वश्य , ३ तारा , ४ योनि , ५ ग्रहमैत्री , ६ गण , ७ राशिकूट , आणि ८ नाडी . ह्या आठ भेदांचे अनुक्रमेंकरून एक , दोन , तीन इत्यादि पूर्ण गुण धरावे . म्हणजे शुभवर्णाचा गुण १ , वश्याचे गुण २ , शुभताराबलाचे ३ , योनीचे ४ , ग्रहमैत्रीचे ५ . गणाचे ६ , राशिकूटाचे ७ , आणि नाडीचे ८ , ह्याप्रमाणें सर्व शुभ असतां एकंदर छत्तीस गुण येतात . ह्या छत्तीस गुणांपैकीं अठरांपेक्षां अधिक गुण आले म्हणजे ती मैत्री ग्राह्य आहे , असें समजावें . ही मैत्री जन्मपत्रिकेवरूनच जमविली पाहिजे . जन्मपत्रिका नसली म्हणजे कित्येक लोक वधूवरांच्या व्यावहारिक नांवांवरूनच घटित जमतितात , परंतु तो गौण पक्ष आहे .