वधू वराचे लक्षण

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


वधूलक्षणपरीक्षा .

कुलमग्रे परीक्षेत ये मातृतः पितृतश्चेति यथोक्तं

पुरस्तात् बुद्धिमते कन्यां प्रयच्छेत् । बुद्धिरूपशील -

लक्षणसंपन्नामरोगामुपयच्छेत ॥ आश्व० गृह्यसूत्र .

उद्वहेत्तु द्विजो भार्यां सवर्णां लक्षणैर्युताम् ।

अव्यंगांगीं सौम्यनाम्नीं मृद्वंगीं च मनोहराम् ॥३४॥

अनन्यपूर्विकां कान्तामसपिडां यवीयसीम् ।

अरोगिणीं भ्रातृमतीमसमानार्षगोत्रजाम् ॥३५॥

वधूवरांचा विवाह निश्चित करण्यापूर्वीं , एक गोत्र , सप्रवर , सापिंडय यांचा तर विचार अवश्यच आहे , आणि त्याविषयीं पूर्वीं लिहिलेंच आहे . परंतु याशिवाय मातापितरांचीं कुळें शुद्ध आहेत कीं नाहींत याचा शोध करावा . शुद्ध म्हणजे क्षय , अपस्मार , कुष्ठ , अशा आनुवंशिक व अपरिहार्य व्याधि ज्यांच्या कुलामध्यें पूर्वीं कोणाही स्त्रीपुरुषाला झालेल्या नाहींत अशा कुलाशीं संबंध जोडावा . तशींच उभय कुळें सदाचारसंपन्न असावीं . बुद्धिमान् , विद्वान् , धर्मशील , सुशील , व निरोगी असा वर असावा . तशीच वधू देखील बुद्धिमती , रूपवती , सुशील , आणि लक्षणसंपन्न ( म्हणजे वंध्यत्व , पतिघातित्व इत्यादि दुर्लक्षणरहित ) असावी . अशी स्वजातीची , जिच्या देहाच्या अवयवांत कांहीं न्यूनता नाहीं , दिसण्यांत मनोहर व कोमलांगी वधू असावी . सारांश , कन्येच्या मातृवंशाची व पितृवंशाची परीक्षा करून नंतर त्या कन्येशीं विवाह करावा , म्हणजे सुकुलांतील कन्या वरावी . तसेंच , दान किंवा उपभोग यासंबंधीं जिचें ग्रहण दुसर्‍यानें केलें नाहीं , आपल्याशीं जिचें सापिंढय नाहीं , आपल्यापेक्षां वयानें व शरीरानें कमी , निरोगी , सोदर भ्राते असलेली , आपल्या गोत्राहून भिन्न गोत्रांत उत्पन्न झालेली आणि आपल्याशीं सप्रवर नाहीं अशा कुलांतील कन्येशीं विवाह करावा . त्याचप्रमाणें ‘ जनपदधर्मा ग्रामधर्माश्च तान् विवाहे प्रतीयात् ’ या आश्वलायनसूत्रोक्तीप्रमाणें देशाचार , ग्रामाचार व कुलाचार यांचाही विवाहकालीं अवश्य विचार करावा .

वराचें लक्षण .

कुलं च शीलं च वयश्च रूपं विद्यां च वित्तं च सनाथतां च ।

एतान् गुणान् सप्त परीक्ष्य देया कन्या बुधै : शेषमचिंतनीयम् ॥३६॥

सत्कुलांत जन्म , सुशीलता , वयानें व रूपानें कन्येला योग्य , सुविद्य , सधन ( म्हणजे हुंडयाच्या द्रव्याची अपेक्षा व याचना न करणारा ) आणि सनाथ म्हणजे कुटुंबवत्सल अशा सात गुणांनीं युक्त असलेल्या वराला कन्या द्यावी . सुविद्य म्हणजे विद्याविनयसंपन्न , सदाचरणी , धर्मशील व सुविचारी असें समजावें .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP