ग्रहांचे अस्तोदय आणि बाल्यवृद्धत्व

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


रविणा सक्तिरन्येषां ग्रहाणामस्त उच्यते ।

ततोर्वाग्वार्धकं प्रोक्तमूर्ध्वं बाल्यं प्रकीर्तितम् ॥७॥

प्रथम दिसत असलेला कोणताही ग्रह सूर्यासन्निध येऊन सूर्याच्या तेजोमय किरणांत लुप्त होऊन दिसेनासा झाला , म्हणजे त्या ग्रहाचा अस्त झाला असें म्हणतात . आणि सूर्यापासून फार अंतरावर गेल्यामुळें पुन : दिसूं लागला म्हणजे त्याचा उदय झाला असें म्हणतात . तसेंच , कोणत्याही ग्रहाच्या अस्तापूर्वींच्या कांहीं नियमित दिवसांना त्या ग्रहाचे वार्धक्याचे दिवस म्हणतात , आणि उदयानंतरच्या कांहीं दिवसांना शिशुत्वाचे किंवा बालत्वाचे दिवस असें म्हणतात . सर्व ग्रहनक्षत्रादिकांना उदयास्त आहेतच ; परंतु गुरु - शुक्रांच्या अस्तोदयांचा मात्र आपल्या विवाहादि संस्कारांशीं व इतर धर्मकृत्यांशीं संबंध आहे . म्हणून त्याविषयीं येथें माहिती आहे . मंगळ , बुध आणि शनि यांचे अस्त कोणत्याही कृत्याला प्रतिकूल मानिलेले नाहींत .

गुरुशुक्रांच्या अस्तोदयाचा काल .

मासमेकं गुरोरस्तं प्रायशो न भवेत् पुनः ।

खाद्यग्निदिनपर्यंतमुदयात् कथ्यते बुधै : ॥८॥

प्राच्यामस्तंगतः शुक्र : प्रतीच्यां द्विस्वरैदिनै : ।

दृश्यते नोदयाच्चास्तं खेषुद्वौ दिवसान् खलु ॥९॥

पश्चिमस्यां यदाऽस्तं चेत् प्राच्यामुदयते भृगु : ।

प्रायो दशदिनादूर्ध्वमेवं ज्ञेयो विचक्षणै : ॥१०॥

गुरूचा अस्त २५ पासून ३० - ३३ दिवसांपर्यंत असतो , आणि एकदां उदय झाला म्हणजे पुन : सुमारें ३६६ ते ३७५ दिवसांपर्यंत अस्त होत नाहीं . गुरूचा अस्त नेहमीं पश्चिमेस होतो , आणि उदय पूर्वेला होतो . शुक्राचा पूर्वेस अस्त झाला म्हणजे ७२ दिवसांनीं पश्चिमेस उदय होतो . पण कधीं कधीं हा अस्त ५८ पासून ७५ दिवसांपर्यंतही असतो . आणि शुक्राचा एकदां उदय झाला म्हणजे पुन : २४८ ते २५२ दिवसांपर्यंत अस्त होत नाहीं . तसेंच , शुक्राचा पश्चिमेस अस्त झाला म्हणजे सुमारें ८ पासून १२ दिवसांनी पूर्वेस उदय होतो . तात्पर्य , शुक्राचे अस्तोदय असे दोन प्रकारचे आहेत . शुक्राचा पश्चिमेस अस्त असतो तेव्हां शुक्र वक्री असतो व शुक्राचा पूर्वेस अस्त असतो तेव्हां शुक्र मार्गी असतो . पूर्वेस उदय किंवा पूर्वेस अस्त होतो म्हणजे तो ग्रह पूर्वदिशेकडे दिसतो किंवा दिसेनासा होतो . याचप्रमाणें पश्चिमेच्या उदयास्तांविषयीं जाणावें .

शुक्र वक्री झाल्या दिवसापासून पुन : त्याला मार्गी होण्यास ४० पासून ४५ दिवस लागतात आणि एकदां मार्गी झाला म्हणजे पुनः ५४० ते ५४५ दिवस प्राय : तो वक्री होत नाहीं . शुक्र सर्व ग्रहांत अत्यंत तेजस्वी असूनही , तो मंगळ खेरीजकरून इतर सर्व ग्रहांहून आकारानें लहान आहे . मंगळ मात्र शुक्रापेक्षांही लहान आहे . गुरु वक्री झाला म्हणजे पुनः मार्गी होण्यास त्याला सुमारें ११६ ते १२५ दिवस लागतात . ५८४ दिवसांत शुक्राचा २ वेळां उदय व २ वेळां अस्त होतो ; तसेंच ३९९ दिवसांत गुरूचा एकदां उदय व एकदां अस्त होतो .

बाल्यवृद्धत्वाचे त्याज्य दिवस .

त्ययेद्दशाहं शिशुवृद्धयोश्च सितेज्ययोश्चेति वदंति गर्गा :

कालांशतुल्यानि दिनानि चैके सप्ताहमन्ये त्वपरे त्रिरात्रम् ॥११॥

ग्रुरुशुक्रांच्या अस्तांत चौलादि संस्कार करणें जसें वर्ज्य आहे , तसेंच अस्तापूर्वीं कांहीं दिवस म्हणजे त्या ग्रहांच्या वृद्धावस्थेंत , आणि उदयानंतर कांहीं दिवस म्हणजे त्या ग्रहांच्या बाल्यावस्थेंत , तीं कृत्यें करूं नयेत असा नियम केलेला आहे . या नियमाविषयीं बराच मतमेद आढळतो . गुरुशुक्रांच्या उदयास्तसमयीं बाल्याचे आणि वृद्धत्वाचे उभयपक्षीं दहा दहा दिवस सोडावे असें गर्गपुत्रांचें मत आहे . कित्येकांच्या मतें कालांशतुल्य दिवस म्हणजे गुरूचे अकरा आणि शुक्राचे नऊ दिवस सोडावे असें आहे . कित्येकांच्या मतें बाल्यवृद्धत्वाचे सात सात दिवस सोडावे असें आहे ; आणि तीन तीन दिवस सोडावे असेंही पुष्कळांचें मत आहे . तेव्हां संकटकालीं गुरुशुक्रांच्या उदयास्तसमयीं पूर्वपश्चात् निदान तीन दिवस तरी सोडून शुभकृत्य करावें ; परंतु सात दिवस सोडावे असा सर्वसाधारण नियम आहे .

गुरुशुक्रांच्या अस्तांत वर्ज्य कृत्यें .

वापीकूपतडागयज्ञगमनं चौलं प्रतिष्ठाव्रतं

विद्यामंदिरकर्णवेधनमहादानं गुरो : सेवनम् ।

तीर्थस्नानविवाहकाम्यहवनं मंत्रोपदेशं शुभं

दूरेणैव जिजीविषु : परिहरेदस्तं गुरोर्वै भृगो : ॥१२॥

विहीर - तलाव इत्यादि खणणें , यज्ञ करणें , यात्रेला जाणें , चौल करणें , देवप्रतिष्ठा , विद्यारंभ , नवें घर बांधणें किंवा नव्या घरांत रहावयास जाणें , मुलांचा कान टोंचणें , प्रथम गुरूपदेश घेणें , तीर्थस्नान , विवाह , कामनिक हवन , मंत्रतंत्र शिकणें , इत्यादि कृत्यें गुरुशुक्रांच्या अस्तांत करूं नयेत , असें सांगितलें आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP