कन्याविवाहकाल

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


कन्येच्या विवाहकालाविषयीं दोन प्रकारचीं मतें आढळतात . धर्मसिंधुकर्ते , मरीचि , दक्ष , इत्यादि ग्रंथकारांचें मत आठ वर्षांपुढें आणि दहा वर्षांचे आंत कन्येचा विवाह करावा असें आहे . आणि त्यावरुन कित्येकांची अशी दृढ समजूत झालेली दिसते कीं , दहा वर्षांपुढें कन्येचा विवाह करणें ही गोष्ट अगदीं शास्त्रविरुद्ध आहे ; पण ती यथार्थ नाहीं . दहा वर्षानंतर आणि ऋतुकालापूर्वीं किंवा त्या सुमारास कन्येचा विवाह केला असतां सर्वथैव धर्मशास्त्रसंमत आहे , हें खालीं दिलेल्या निरनिराळ्या श्रुति , सूत्र , स्मृति व पुराण ग्रंथांतील वचनांवरून ध्यानीं येईल . जर उत्कृष्ट ( वय , विद्या , वैभव वगैरे गुणांनीं युक्त असा ) वर मिळत असेल तर मात्र आठव्या वर्षींही मुलीचें लग्न उरकून घ्यावें , असा मन्वादि स्मृतिकारांचा अभिप्राय आहे . तथापि सांप्रत पुरुषांचे विवाह वीसपासून पंचवीस वर्षें वयाच्या पुढें होऊं लागल्यामुळें , साहजिकच त्यांना प्रौढ वधूची अपेक्षा असते , आणि त्यामुळें आसन्नार्तवा किंवा ऋतुमती कन्यांचे विवाह ब्राह्मण समाजांत सुरू झाले आहेत . ही गोष्ट अभिनंदनीय असली तरी कित्येक लोक त्याचा अतिरेक करून समाजांत अनर्थ उत्पन्न करीत आहेत . ही फारच खेदाची गोष्ट आहे . कारण , सांप्रत २५ वर्षे वयाच्या देखील प्रौढ कुमारिका ब्राह्मण समाजांत दृष्टीस पडूं लागल्या आहेत , ही स्थिति फारच भयावह आहे . असो ; आतां प्रौढविवाहाच्या समर्थनार्थ प्रथम एक - दोन श्रुतिवचनें देतों . कोणतीही गोष्ट करण्याविषयीं किंवा न करण्याविषयीं वेदांमध्यें स्पष्ट आज्ञा कोठेंच आढळत नाहीं . तथापि अमक्यानें अमुक प्रसंगीं अमुक केलें . अशा अर्थाचीं वचनें मात्र पुष्कळ आढळतात . त्यांवरून वेदकालीन रीतीभातींचा निर्णय ठरविणे अयुक्त होणार नाहीं . खालीं दिलेला वैदिक मंत्र ऋग्वेदसंहितेंतील आठव्या अष्टकाच्या तिसर्‍या अध्यायांतील " सत्येनोत्तभिता " नामक सूक्तांतील आहे . हें पंचवर्गात्मक सूक्त विवाहविधीच्या प्रसंगीं वधू गौरीहराची पूजा करीत असतां ब्राह्मणांनीं पठन करावें व नंतर वधूवरांमध्यें अंतःपट धरून मंगलाष्टकें म्हणावीं , असा प्रयोग आहे .

सोमो वधूयुरभवदश्विनास्तामुभा वरा ।

सूर्यां यत्पत्ये शंसंतीं मनसा सविताऽददात् ॥

अ० ३ व० २१

या मंत्रावरील सायणाचार्यांचें भाष्य आहे तें असें :---

सोम : वधूयु : वधूकाम : वर : अभवत् । तस्मिन् समये अश्विनाऽश्विनौ उभा उभौ वरा वरौ आस्ताम् । यत् यदा सूर्यां पत्ये शंसंतीं पतिं कामयमानां पर्याप्तयौवनामित्यर्थ : । मनसा सहिताय सोमाय वराय सविता तत्पिता अददात् दित्सांचकार ॥

अर्थः --- आपणाला स्त्री असावी अशी इच्छा सोमाच्या मनांत उत्पन्न झाली . त्या समयीं अश्विनीकुमारही लग्नासाठीं वर तयार होते ; परंतु आपल्या सूर्यानामक कन्येवर सोमाचें मन बसलें आणि असें पाहून , पतीविषयीं वासना उत्पन्न झाली आहे जिला अशी जी पर्याप्तयौवना म्हणजे यौवनपूर्ण झालेली कन्या सूर्या , तिला तिच्या बापानें सोमास देण्याचें ठरविलें . यावरून सूर्या विवाहापूर्वीं ऋतुमती असली पाहिजे , हें स्पष्ट दिसतें . याच अर्थाचा दुसराही मंत्र आहे .

कमद्युवं विमदायोहथुर्युवम् । ऋग्वे० अष्ट० ८ अ० २ व० ११

भाष्य --- कमद्युवं कामस्य दीपनीं वेनपुत्रीं विमदायर्षये युवं ऊहथुः प्रापयथ ।

अर्थ --- कामजागृति करणारी वेनराजाची कन्या तुम्हीं विमदऋषीला दिली . येथें कामस्य दीपनीं या पदानें वेनकन्या विवाहसमयीं ऋतुमती असली पाहिजे हेंच सिद्ध होतें . ब्राह्मविवाहविधि करितांना सप्तपदीच्या प्रसंगीं जे मंत्र म्हटले जातात , ते देखील प्रौढ वधूलाच उद्देशून आहेत . त्यांपैकीं एकच मुख्य येथें देतों .

अमोहमस्मि सा त्वं सा त्वमस्यमोहम् ।

सामाहमस्मि ऋक्त्वं द्यौरहं पृथिवी त्वम् ।

तावेह विवहावहै सह रेतो दधावहै ।

प्रजां प्रजनयावहै पुत्रान् ‍ विंदावहै बहून् ॥

या मंत्रांत " प्रजां प्रजनयावहै " म्हणजे आपण प्रजा निर्माण करूं वगैरे जें आहे तें आठदहा वर्षांच्या मुलीला समजणें खास कठीण आहे . तसेंच , जवळजवळ त्याच अर्थाचे " प्रजाभ्य : पंचपदी भव " वगैरे मंत्र आहेत , त्या मंत्रांवरून प्राप्तयौवना वधूचाच विवाह करावा , असें ध्वनित होतें . याशिवाय आणखी एक महत्त्वाचा वैदिक मंत्र प्रौढविवाहाच्या पुष्टयर्थ देतों ; त्यावरून पाहातां ऋतुकालोत्तरविवाह जरी वैदिक काळीं मान्य होता तरी ऋतुकालानंतर फार दिवस वधू अविवाहित ठेवूं नये , असाही त्यांत सध्यां येणारा अनिष्ट अनुभव व्यक्त होतो . तो मंत्र असा ---

सोमः प्रथमो विविदे गंधर्वो विविद उत्तर : ।

तृतीयो अग्निष्टे पतिः तुरीयस्ते मनुष्यजा : ॥

या मंत्रामध्यें विवाहनीय वधूचा पहिला पति सोम , दुसरा गंधर्व , तिसरा अग्नि व चवथा पति मनुष्य , असें म्हटलें आहे . आतां मनुष्य पति होण्यापूर्वीं या तीन पतींचा स्त्रीदेहभोक्तृत्वावर कसा अधिकार पोंचतो , आणि ह्या तीन मूर्ति कोण असा साहजिकच प्रश्न उद्भवतो . त्याचें स्पष्टीकरण असें आहे कीं , प्राचीन वैदिक ऋषींनीं देहाच्या प्रत्येक अवयवाच्या क्रियेची एक एक देवता मानिलेली आहे . जसें बाहुच्या क्रियेची देवता इंद्र , उपस्थक्रियेची देवता प्रजापति , इत्यादि प्रत्येक अवयवाची अधिष्ठात्री देवता जशी वेगळी कल्पिली आहे , त्याचप्रमाणें स्त्रीदेहांतील अवयवांच्या ठिकाणीं , जशी जशी तिच्या देहाची अवस्था बदलेल , तसतशा भिन्न देवता प्रत्येक अवस्थेला योजिलेल्या आहेत . त्या देवता म्हणजे सोम , गंधर्व आणि अग्नि ह्या होत . या तीन देवतांनीं स्त्रीदेहावर आपला अधिकार चालविल्याशिवाय म्हणजे तिच्या अवयवांना पूर्णता आणून दिल्याशिवाय मनुष्याला स्त्रीदेहाचा उपभोग घेणें शक्यच नसतें . याला गृह्यसंग्रहांत असा आधार आहे कीं

व्यंजनैस्तु समुत्पन्नैः सोमो भुंजीत कन्यकाम् ।

पयोधरैस्तु गंधर्वः रजसाग्निः प्रकीर्तित : ॥२०॥

स्त्रीच्या ठिकाणीं अगदीं प्रथमावस्थेपासून कुचदर्शन होईपर्यंत सोमाचा भुक्तिकाळ असतो . कुचोत्पत्तीपासून रजोदर्शनापर्यंत गंधर्वाचा भुक्तिकाळ व रजोदर्शन झाल्यानंतर पुढें विवाहकालापर्यंत अग्नीचा भुक्तिकाळ असतो . आयुर्वेदही हेंच सांगतो . अग्नीषोमात्मकमिदं शरीरं ’ येथें अग्नि शब्द हा रजाच्या अर्थीं व सोम शब्द हा वीर्याच्या अर्थीं आहे . आतां सोमादिकांचा भुक्तिकाळ इत्यादि जें लिहिलें आहे , ‘ त्याचा अर्थ त्या त्या देवता प्रत्येक अवस्थेमध्यें त्या त्या अवयवांना ( अवयवांमध्यें राहून ) पूर्णता आणतात . अशी पूर्णता आणण्याची जी क्रिया , तिचाच अर्थ स्त्रीजाति तिन्ही देवतांनीं पूर्ण भुक्त असली पाहिजे . म्हणजे तिच्या अवयवांत पूर्णता आली पाहिजे . कन्यादानाला वधू त्रिभुक्ता पाहिजे असें विवाहप्रयोगांत आहे . त्याचा अर्थ ‘ तीन वेळां जेवूं घातलेली ’ नव्हे , तर सोम , अग्नि व गंधर्व या तीन देवतांनीं उपभोगिलेली असावी . असा आहे . सारांश , लग्नाचे वेळीं वधूचे अवयव पूर्णत्वाला पोंचल्याशिवाय ती मनुष्य पति करण्याला पात्र नाहीं . पण कन्या ऋतुमती झाल्यानंतरचा जो काळ , तो अग्नीचा भुक्तिकाळ आहे आणि अग्नि ही जाळणारी वस्तु आहे , हें ध्यानांत ठेवून प्रतिमासीं रजस्वला होणार्‍या वधूला फार दिवस अविवाहित ठेवणें अनेक दृष्टींनीं भयावह आहे . असो . आतां सूत्रकार लग्नसमयीं कन्येच्या वयाची काय इयत्ता ठरवितात तें पाहूं , आश्वलायनगृह्यसूत्रांत वधू अमुक वयाची असावी . असें जरी विधिरूप वचन नाहीं , तरी पुढील वाक्यांवरून ती प्रौढच असली पाहिजे , असा गर्भितार्थ निघतो .

अत ऊर्ध्वमक्षारालवणाशिनौ ब्रह्मचारिणावलंकुर्वाणावध : शायिनौ स्यातां त्रिरात्रं द्वादशरात्रं संवत्सरं वैकऋपिर्जायत इति ।

विवाहविधि झाल्यानंतर वधूवरांनीं त्रिरात्र किंवा द्वादशरात्रपर्यंत ब्रह्मचर्य राखावें ; तथापि दृढ मनोनिग्रह असेल तर एक वर्षपर्यंतही ब्रह्मचर्यवृत्तीनें त्यांनीं रहावें ; म्हणजे ऋषीप्रमाणें तेजस्वी पुत्र होईल . येथें विवाह झाल्यावर तीन रात्रींनंतर स्त्रीसमागम करण्याविषयीं सूत्रकारांनीं मोकळीक ठेविली आहे . ह्यावरून विवाहसमयीं वधू उपभोगार्ह म्हणजे ऋतुमतीच असली पाहिजे , असें सिद्ध होतें . ती आठ किंवा दहा वर्षांची असून युक्त होणार नाहीं . आणि तशी असेल तर मग निदान चार पांच वर्षें तरी वधूवरांना ब्रह्मचर्य पाळावें लागेल . ऋग्वेदाच्या सांख्यायनसूत्रांत देखील अशाच अर्थाचा उल्लेख आहे , तो असा :---

त्रिरात्रं ब्रह्मचर्यं चरेयाताम् । अथ चतुर्थीकर्मत्रिरात्रे निवृत्ते स्थालीपाकस्य जुहोति । ( त्रिरात्र ब्रह्मचर्य पाळून होम करून चतुर्थींकर्म करावें .) चतुर्थीकर्म

म्हणजे पतिपत्नीसमागम होय . ऋतुकालापूर्वीं पतिपत्नीसमागम शास्त्रांत निषिद्ध सांगितला आहे ; व ज्या अर्थीं चतुर्थीकर्म करावें असें सांख्यायनमत आहे , आणि विवाहानंतर चवथ्याच रात्रीं चतुर्थीकर्म करावयाचें असतें , त्या अर्थीं विवाहकालीं वधू ऋतुमती असल्याशिवाय गत्यंतरच नाहीं . हिरण्यकेशी सूत्रांतही असेंच आहे .

सजातानग्निकां ब्रह्मचारिणीं भार्यामुपयच्छेत ।

येथें अनग्निका म्हणजे ऋतुमती भार्येशीं संभोग करावा असें म्हटलें आहे . हिरण्यकेशीयांनाही त्यांच्या सूत्रांत चतुर्थीकर्म सांगितलें असल्यामुळें तो विधि विवाहोत्तर चवथ्या रात्रींच होणार हें उघड आहे . पाराशरसूत्रांतही हेंच सांगितलें आहे .

संवत्सरं न मिथुनमुपयाताम् । द्वादशरात्रं षड्रात्रं , त्रिरात्रमन्ततः ।

पाराशराच्या मताप्रमाणें विवाहानंतर निदान एक संवत्सरपर्यंत तरी वधूवरांनीं अवश्य ब्रह्मचर्य राखावें असें आहे . पण हें शक्य नसेल तर बारा , सहा किंवा निदान तीन रात्रींपर्यंत तरी ब्रह्मचर्यवृत्तीनें रहावें , असेंही तो स्पष्ट म्हणतो . पण येथें तीन रात्रींचा नियम हा गौणपक्ष आहे , अशी जरी कोणी शंका घेतली , तरीही वधू विवाहसमयीं आसन्नार्तवा असावी , आठ किंवा दहा वर्षांची असूं नये , असेंच ठरतें . आतां या विषयासंबंधीं स्मृतिवचनें काय आहेत हें पाहूं .

उत्कृष्टायाभिरूपाय वराय सदृशाय च ।

अप्राप्तामपि तां तस्मै कन्यां दद्याद्यथाविधि ॥२१॥

मनु० अ० ९ श्लो० ८८ .

सर्व प्रकारें उत्कृष्ट व रूपवान् असा वर मिळत असेल तर अप्राप्ता म्हणजे लग्नाला योग्य न झालेल्या अशा १० वर्षांच्या कन्येचें देखील दान करावें . येथें " अपि " म्हणजे देखील या पदानें बालविवाहाचें गौणत्व दिसतें . मेधातिथीनें ‘ अप्राप्ता ’ या पदाचा अर्थ ‘ कामस्पृहा यस्या नोत्पन्ना ’ म्हणजे जिला कामेच्छा उत्पन्न झाली नाहीं , असा केला आहे , यावरून प्रौढ कन्येचा विवाह करावा असा अर्थ ध्वनित होतो .

त्रिंशद्वर्षोद्वहेत्कन्यां हृद्यां द्वाशवार्षिकीम् ।

तीस वर्षांच्या मनुप्यानें स्वतःला योग्य अशी निदान बारा वर्षांची कन्या वरावी . म्हणजे याहून कमी वयाची असूं नये व पुरुषानेंही तीस वर्षांपुढें विवाह करूं नये असा अर्थ ध्वनित होतो .

अतो रजोदर्शनं विवाहात्पूर्व यथा न भवति तथा कुर्यादित्युक्तं भवति ॥ संस्कारमयूखकार .

विवाहापूर्वीं रजोदर्शन होणार नाहीं अशी तजवीज ( पित्यानें किंवा पालकानें ) ठेवावी म्हणजे रजोदर्शनापूर्वीं लग्न होईल अशी व्यवस्था ठेवावी .

एवं च यावद्रजोदर्शनं न भवति तावत्कन्योद्वाहो न विरुद्ध इत्युक्तं भवति ॥ स्मृतिचंद्रिकाकार .

कोणीकडून तरी रजोदर्शनापूर्वीं कन्येचा विवाह केला असतां शास्त्रविरुद्ध होत नाहीं . म्हणजे विवाहापूर्वीं रजोदर्शन न होईल अशी काळजी घ्यावी .

प्रयच्छेन्नग्निकां कन्यामृतुकालभयाप्तिता ।

ऋतुमत्यां हि तिष्ठन्त्यां दोष : पितरमृच्छति ॥२२॥ वसिष्ठ .

कन्येला ऋतुप्राप्ति होईल ह्या भीतीनें रजोदर्शनापूर्वीं तिचें दान करावें , कारण ऋतुमती कन्या अविवाहित ठेविली असतां तिच्या बापाला दोष लागतो .

नग्निकां तु वदेत् कन्यां यावन्नर्तुमती भवेत् ---

जोंपर्यंत कन्येला ऋतु प्राप्त झाला नाहीं तोंपर्यंत तिला नग्निका म्हणतात .

तस्मादुद्वाहयेत्कन्यां यावन्नर्तुमती भवेत् --- यम .

म्हणून कन्येला ऋतुप्राप्ति होण्यापूर्वीं तिचा विवाह करावा .

ऊर्ध्वं दशाब्दाद्या कन्या प्राग्रजोदर्शनात्तु सा ।

गांधारी सा समुद्वाह्या चिरंजीवितुमिच्छता ॥२३॥ प्रयोगपारिजात .

दहा वर्षांनंतर व रजोदर्शन होण्यापूर्वीं कन्येला गांधारी अशी संज्ञा आहे , ज्याला चिरंजीव व्हावें अशी इच्छा असेल , त्यानें अशा कन्येशींच विवाह करावा .

वर दिलेल्या वचनांवर कदाचित् एक शंका निघण्यासारखी आहे ती अशी कीं ,

‘ दशवर्षा भवेत्कन्या अत ऊर्ध्वं रजस्वला ’ या पराशरवचनाप्रमाणें दहा वर्षांनंतर कन्येला रजस्वला अशी संज्ञा प्राप्त होते , आणि म्हणूनच दहा वर्षांपुढें कन्येचा विवाह अयुक्त मानिला आहे . परंतु या वाक्याचा अर्थ स्मृतिचंद्रिका व संस्कारमयूख या ग्रंथांत असा दिला आहे कीं , दहा वर्षांपासून कन्येला रजस्वला ही संज्ञा प्राप्त न होतां दहा वर्षांनंतर कांहीं कालानें प्राप्त होते . कारण ‘ अत ऊर्ध्वं रजस्वला ’ असें म्हणून नंतर लागलेंच ‘ प्राप्ते तु द्वादशे वर्षे य : कन्यां न प्रयच्छति ’ असें वचन पराशरानें ग्रथित केलें आहे , व अकराव्या वर्षांचा कांहींच उल्लेख त्यानें केला नाहीं , त्यावरून अकाराव्या वर्षीं रजस्वलात्वदोष नाहीं हें सहज ध्वनित होतें , आणि तेंच प्राय : सर्वत्र अनुभवाशीं जुळतें .

विवाहे वितते तंत्रे होमकाल उपस्थिते ।

कन्यामृतुमतीं दृष्ट्वा कथं कुर्वंति याज्ञिका : ॥२४॥

स्नापयित्वा तु तां कन्यामर्चंयित्वा यथाविधि ।

युंजानामाहुतिं द्त्वा ततस्तन्त्रं प्रवर्तयेत् ॥२५॥ यज्ञपार्श्व . नि० सिं०

विवाहविधि चालला असतां कन्या ऋतुमती होईल तर तिला हविष्मतीनें स्नान घालून व दुसरे वस्त्रालंकार देऊन ‘ युंजानानेति ’ मंत्रानें होमांत आहुति देऊन नंतर पुढील विवाहविधि करावा . यावरून लग्नांत आसन्नार्तवा किंवा नहाण आलेली वधू असली तरी चालेल असा अर्थ निघतो . येथें कन्येच्या पित्याला प्रायश्चित्त वगैरे कांहीं सांगितलेलें नाहीं . वरील दोन श्लोक किंचित् पाठभेदानें आपस्तंबस्मृतींत पठन केले आहेत , त्यावरून आपस्तंबाचेंही मत , लग्नांत आसन्नार्तवा वधू असली तरी चालेल , असें दिसतें . रजोदर्शनानंतर कन्येचा विवाह केला असतां पित्यानें प्रायश्चित्त घ्यावें असें आश्वलायनस्मृतींत सांगितलें आहे ; तथापि कांहीं ग्रंथांतून प्रायश्चित्त न सांगतां संकटकालीं ऋतुदर्शन झाल्यावर देखील कन्येचा विवाह केला तरी चालेल , अशीं वचनें आढळतात , ती खालीं दिलीं आहेत .

काममामरणात्तिष्ठेग्दृहे कन्यर्तुमत्यपि ।

न चैवैनां प्रयच्छेत्तु गुणहीनाय कर्हिचित् ॥२६॥ मनु० अ० ९ श्लो० ८९

ऋतु प्राप्त झाल्यावर देखील कन्या पित्याच्या घरीं अविवाहित राहिली तरी चिंता नाहीं ; परंतु गुणहीन म्हणजे वय , विद्या , वपु , वैभव इत्यादि गोष्टींमध्यें वधूच्या तुलनेला अयोग्य अशा वराला ती कधींही देऊं नये .

ऋतुदर्शनेपि न दद्याद्यावद्गुणवान्वरो न प्राप्त । मेघातिथि .

वर दिलेल्या मनुवचनावर मेधातिथीची ही टीका आहे . त्याचा अर्थ वरच्याचप्रमाणें आहे . स्मृतिकारांचा यासंबंधानें असा स्पष्ट आशय दिसतो कीं , सुस्थळ न मिळाल्यामुळें कन्या ऋतुमती झाली तरी चालेल ; परंतु रजस्वलात्वदोषाच्या भयानें भलत्याच अयोग्य वराला ती देऊन टाकूं नये . तथापि उद्दामपणानें मात्र ऋतुदर्शनानंतर कन्या अविवाहित ठेवणें दोषास्पद आहे .

दद्याद्गुणवते कन्यां नग्निकां ब्रह्मचारिणे ।

अपि वा गुणहीनाय नोपरुंध्याद्रजस्वलाम् ॥२७॥ बोधायन .

नग्निका म्हणजे जिला ऋतुदर्शन झालें नाहीं अशी कन्या सद्नुणी वराला द्यावी . तसा वर न मिळाल्यामुळें तिला ऋतुदर्शन झालें तरी हरकत नाहीं . परंतु मूर्ख वराला ती कदापि देऊं नये .

दशवर्षादूर्ध्वं विवाहो निषिद्ध : । तथापि दातुरभावे द्वादशषोडशाब्दे ज्ञेये रजोभावे इदम् ॥ निर्णयसिंधु .

कन्येचा विवाह दहा वर्षानंतर निषिद्ध होय ; तथापि योग्य दात्याचा अभाव असेल तर रजोदर्शन झालें तरीही बाराव्या किंवा सोळाव्या वर्षीं कन्येचा विवाह करावा . तथापि , ही १६ वर्षांची सवड शास्त्रकारांनीं अडचणीपुरतीच ठेविली आहे , हें विसरूं नये . याशिवाय ऋतुप्राप्ति झाल्यानंतर तीन वर्षेंपर्यंत पित्राज्ञेची वाट पाहून चवथ्या वर्षीं कन्येनें स्वतः योग्य वर वरावा , अशाविषयीं मनु , बौधायन इत्यादिकांचीं वचनें आहेत , त्यांतून कांहीं येथें देतों .

त्रीणि वर्षाण्युदीक्षेत कुमार्यृतुमती सती ।

ऊर्ध्वं तु काला देतस्माद्विन्देत सदृशं पतिम् ॥२८॥

ऋतु प्राप्त झाल्यानंतर बाप आपलें दान करतो किंवा नाहीं याची तीन वर्षें वाट पाहून , नंतर कन्येनें आपल्याला योग्य पति शोधून त्याच्याशीं विवाह करावा .

त्रीणि वर्षाण्यृतुमतीं यः कन्यां न प्रयच्छति ।

स तुल्यं भ्रूणहत्यायै दोषमृच्छत्यसंशयम् ॥२९॥

न याचते चेदेवं स्याद्याच्यते च पृथक् पृथक् ।

ततश्चतुर्थे वर्षे तु विन्देत सदृशं पतिम् ॥३०॥ बौधायन .

कन्या ऋतुमती झाल्यानंतर तीन वर्षांचे आंत मुलगी मागण्याकरितां कोणी आला असून जर बाप तिचें दान करणार नाहीं , तर प्रत्येक ऋतूला त्याला भ्रूणहत्येचें पातक लागतें . परंतु कोणी याचमानच नसेल तर मात्र पित्याला मुळींच दोष नाहीं . कन्येच्या घरीं जाऊन वरानें किंवा त्याच्या पित्यानें मुलगी मागावी , असा प्रघात शास्त्राला अनुसरून पूर्वीं असे . मुलीनें ऋतुदर्शनानंतर तीन वर्षेंपर्यंत बाप आपलें दान करितो कीं नाहीं हें पाहून नंतर स्वतः वर शोधावा . असो . याप्रमाणें अनेक स्मृतिकारांचीं प्रौढ विवाहाविषयीं अनुकूल मतें आहेत . आतां प्राचीन कालीं प्रौढ वधूंचेच विवाह होत असत , अशाविषयीं पुराणांतील कांहीं आधार देतों :---

मथुरायां यदुश्रेष्ठो दाशार्ह इति विश्रुतः ।

कृतोद्वाह : स राजेन्द्र : संप्राप्य निजमंदिरम् ।

रात्रौ तां शयनारूढ : संगमाय समाह्वयत् ॥३१॥ स्कंदपु० ब्रह्मो०

आसीदियं पूर्वभवे काचिद्वाह्मणकन्यका ।

सा भर्तारमनुप्राप्य नवयौवनशालिनी ।

कंचित्कालं शुभाचारा रेमे बंधुभिरावृता ॥३२॥ स्कंदपु० ब्रह्मो०

स शीलयन् देवयानीं कन्यां संप्राप्तयौवनाम् ।

पुष्पैः फलै : प्रेषणैश्च तोषयामास भारत ॥३३॥ महाभारत .

अशीं हीं तीन पौराणिक उदाहरणें दिलीं आहेत . त्यांत पहिल्या उदाहरणांत विवाहकाळीं वधू प्रौढ असून पतिसमागमाला योग्य होती . दुसर्‍यांत नवयौवनशालिनी म्हणजे नुकतीच यौवनदशेनें युक्त झालेली होती . तिसर्‍या उदाहरणांत शुक्राची कन्या देवयानी ही प्राप्तयौवनाच होती . याशिवाय पुराणकालीं प्रौढ वधूंचेच विवाह होत असत , अशीं वर्णनें पुराणांत सर्वत्र आहेत . सारांश , प्रौढ वधूंचे विवाह शास्त्रविरुद्ध नाहींत , हें वर दिलेल्या श्रुतिस्मृतिपुराणोक्त वचनांवरून सिद्ध होतें . आतां ज्या स्मृतिकारांनीं आठव्या वर्षापासून दहाव्या वर्षापर्यंत कन्येचा विवाह करावा असें लिहिलें आहे , त्यांचा आशय इतकाच असला पाहिजे कीं , कांहीं झालें तरी कन्येला विवाहापूर्वीं ऋतुदर्शनाचा दोष लागूं नये . म्हणून ऋतुदर्शनाचा जो सामान्य काल पंधरावें किंवा सोळावें वर्ष त्यापूर्वीं निदान चार पांच वर्षें तरी मुलीचें लग्न करावें , असें त्यांनीं ठरविलें असावें . आणि त्यामुळें कन्याविवाहाच्या वयाची इयत्ता आंत आंत येत जाऊन शेवटीं दहावें वर्ष हा लग्नाचा अतीत काळ त्यांनीं ठरविला असावा . पण ही बालविवाहाची रूढी अस्तित्वांत येत गेली , त्याच्याबरोबर आपत्तीही उत्पन्न झाल्य़ा आहेत . असा सध्यां अनुभव आहे . असेंच स्त्री पुष्पवती झाल्यानंतर तिला अविवाहित ठेवल्यामुळेंही भलतेच अनर्थ उत्पन्न झाल्याचीं उदाहरणें वाढत आहेत . यासाठीं समंजस आईबापांनी ऋतुदर्शनकालाचे सुमारास निदान १६ व्या वर्षीं तरी कन्येचा विवाह करावा हेंच युक्त आहे . सूत्रकारांच्या किंवा बौधायनाच्या अनुशासनाप्रमाणें संकटकाळीं आसन्नार्तवा किंवा ऋतुमती वधूंचे विवाह केले असतां , निदान आठपासून चवदा वर्षांचे आंतील बालविधवा आपल्या समाजांत दृष्टीस पडणार नाहींत . धर्मशास्त्र म्हणजे धार्मिक कायदे , हे विद्वान् , तेजस्वी व नीतिमान् पुरुषांनीं पण मनुष्यांनींच केलेले असल्यामुळें ते ईश्वरी कृतीप्रमाणें सर्वथैव निर्दोष व सर्वकालीं अबाधित असणें शक्य नाहीं , व या कारणामुळेंच समकालीन नसणार्‍या स्मृतिकारांची या विषयासंबंधीं एकवाक्यताही नाहीं . तस्मात् कालानुरोधाप्रमाणें समाजाच्या सोयीकरितां धार्मिक नियमांतही अत्यंत विचारपूर्वक फेरफार होणें अगत्याचें असतें . परंतु अतिरेक न होऊं देण्याविषयीं जपलें पाहिजे . ‘ पूर्णषोडशवर्षा स्त्री पंचविंशेन संयुता ’ म्हणजे पत्नी सोळा वर्षांची व पति पंचवीस वर्षांचा असावा . कारण . अशा दंपत्यापासून होणारी प्रजा सतेज व सुदृढ होते , असें आयुर्वेदाचें मत आहे . पण सोळा व पंचवीस वर्षांची इयत्ता ही परमावधीची आहे , म्हणून सोळाव्या वर्षांपूर्वींच कन्येचा विवाह करावा .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP