ग्रहलाघव - ग्रह युत्यधिकार

ज्योतिषशास्त्राविना हिंदू धर्मियांचे कार्य एक क्षणसुद्धा चालू शकत नाही .


ग्रहबिंबसाधन .

पञ्चर्त्वगाङ्कविशिखाः पृथगीशकर्णायोगाहताः प्रकृतिभान्वरिसिद्धरामैः ।

भक्ताः फलोनसहिताः श्रवणेऽधिकोने ते त्र्युद्धृताः स्युरसृजो वपुरङ्गुलानि ॥१॥

अर्थ -

पंचग्रहांतून ज्याचे बिंब आणणें असेल त्याचा शीघ्र कर्ण आणि ११ अंश यांचें अंतर करून त्यास इष्ट ग्रहाच्या खालीं दिलेल्या बिंबांकानें गुणून त्याच्याच भाज्यांकानें भागावें . मग जर शीघ्रकर्ण ११ अंशांपेक्षां अधिक असेल तर तो भागाकार बिंबांकांतून वजा करावा , आणि जर शीघ्रकर्ण ११ अंशांपेक्षा कमी असेल तर तो भागाकार बिंबांकांत मिळवावा आणि जें येईल त्यांस ३ नीं भागावें म्हणजे त्या ग्रहाचें अंगुलादि बिंब होते .

ग्रहोंकेनाम

मं .

बु .

गु .

शु .

श .

बिम्बांक

भाज्यांक

२१

१२

१६

२४

उदाहरण .

शके १७३५ वैशाख शुद्ध १० रविवार या दिवशीं मंगळ आणि शनि यांच्या युतीचे दिवस आणण्या करितां त्यांचीं बिंबें आणतो . स्पष्ट मंगळ १०रा . ६अं . ३५क . ९वि . स्पष्टगति ४२क . ५०वि . स्पष्ट शनि १० रा . २अं . ५८क . ४४वि . स्पष्टगति ३क . ३वि . दिनमान ३२घ . ३० पलें मंगळाचा शीघ्रकर्ण ८ अं ० . ५२क . शनीचा शीघ्रकर्ण ११अं . १३क .

आता

मंगळाचे स्पष्टीकरण -

११ अंश - वजा शीघ्रकर्ण ८ अंश ५२ कला = २ अंश ८ कला . X ५ = १० अंश ४० कला भागिले भाज्यांक २१ = ० अंश ३० कला + ५ = ५ अंश ३० कला भागिले ३ = १ अंगुलें ५० प्रतिअंगुलें .

शनिचे स्पष्टीकरण -

शीघ्रकर्ण ११ अंश १३ कला - वजा ११ = ० अंश १३ कला X बिम्बांक ५ = १ अंश ५ कला भागिले ३ = ० अंश २१ कला .

हे ० अंश २१ कला बिम्बांक ५ अंशातून वजा केल्यास बाकी ४ अंश ३९ कला राहते , याला ३ ने भाग दिल्यास बाकी राहते १ अंगुलें ३३ प्रतिअंगुलें हेच शनिचे बिम्ब .

ग्रहयुतिगतगम्य ज्ञान .

अधिकजवखगेऽधिकेऽल्पभुक्तेरथ कुटिलेऽल्पतरेऽनुलोमतो वा ।

अनृजुगखगयोस्तु शीघ्रगेऽल्पे युतिरनयोः प्रगताऽन्यथा तु गम्या ॥२॥

अर्थ -

ज्या दोन ग्रहांची युति आणणें आहे त्यांमध्ये जर अधिक गति ग्रह अल्पगतिग्रहापेक्षां अंशाद्यवयांनी अधिक आहे , किंवा मार्गगति ग्रहापेक्षां वक्रीगति ग्रह अंशाद्यवयवांनीं अधिक वक्रगति ग्रहापेक्ष अंशाद्यवयांनी कमी आहे तर युति होऊन गेली असें जाणावें . आणि जर या लक्षणानें वैपरीत्य आलें तर ग्रहयुति होणार आहे असें समजावें .

उदाहरण .

अल्पगति ग्रह शनि (१०रा . २अं . ५८क . ४४वि .) अधिकगति ग्रह मंगळापेक्षां (१० रा . ६अं . ३५क . ९वि .) कमी आहे म्हणून मंगळ आणि शनि यांची युति होऊन गेली .

ग्रहयुति काल ज्ञान .

ऋजुगतिखगयोस्तु वक्रयोर्वा विवरकला गतिजान्तरेण भक्ताः ॥

गतिजयुतित्दृता यदैकवक्री युतिरगता प्रगताऽऽप्तवासरैः स्यात् ॥३॥

अर्थ -

जर दोनीग्रह मार्गी किंवा वक्री असतील तर त्यांच्या अंतराच्या कलांस गतीच्या अंतरानें भागावें ; आणि जर एकग्रह वक्री आहे . व दुसरा मार्गी आहे तर अंतर कलांस गतीच्या बेरजेनें भागावें म्हणजे आलेल्या दिवसांनीं त्या दोन ग्रहांची युति होईल किंवा होऊन गेली असें जाणावें .

उदाहरण

मार्गी ग्र जो मंगळ १० राशि ६ अंश ३५ कला ९ विकला यातून शनि १० राशी २ अंश ५८ कला ४४ विकला वजा केल्यास मिळते ३ अंश ३६ कला २५ विकला याच्या कला झाल्या २१६ कला २५ विकला .

मंगळाची गति ५२ कला ५० विकला - वजा शनिची गति ३ कला ३ विकला = ४९ कला ४७ विकला .

३ अंश ३६ कला २५ विकला याला ४९ कला ४७ विकला ने भाग दिल्यास भागाकार येतो दिनादि लब्धि ५ दिवस ३६ घटि २३ पळें . इतके दिवस युति झाली .

अर्थात् ‍ या दिवशी या वेळेस ५ दिन ३६ घटि २३ पळें ला वैषाख शुद्ध दशमी १० मधून वजा केल्यास बाकी राहते वैशाख शुक्ल ४ चतुर्थी ३३ घटि ३७ पळें

अर्थात् ‍ वैशाख शुक्ल चतुर्थीला सूर्योदयानंतर ३३ घटि ३७ पळांनन्तर म्हणजेच २ घटि ७ पळं रात्री संपल्यानंतर शनि आणि मंगळाची युति होईल .

ग्रहबिंबैक्य ज्ञान .

चाल्यौ खेटौ समौ स्तो ग्रहयुतिदिवसैश्र्चन्द्रबाणः

स्वनत्या संस्कार्य्योऽत्र ग्रहौ स्वेषु दिशि समदिशोस्त्वल्पबाणः परस्याम् ॥

एकान्याशौ यदेषू विरहितसहितौ खेटमध्येऽन्तरं स्याद्भेदो मानैक्यखण्डादिह लघुनि तदाऽल्पं हि किं लम्बनाद्यम् ॥४॥

अर्थ -

ग्रहयुतिगत किंवा एष्य असेल तसें त्या युतीच्या दिवसांचें ऋण किंवा धन चालन ग्रहांस द्यावें म्हणजे ते ग्रह राश्याद्यवयवांनी बराबर होतील . नंतर त्या ग्रहांचे शर आणावे आणि ते शर ज्या दिशेस असतील त्या दिशेस ते ग्रह जाणावे . म्हणजे ज्या ग्रहाच्या शराची दिशा उत्तर आहे तो ग्रह उत्तर दिशेस आणि शराची दिशा दक्षिण असेल तर तो दक्षिण दिशेस असें जाणावें . परंतु जर दोन्ही ग्रहांची दिशा एकच आली तर ज्या ग्रहाचा शर अल्प असेल तो ग्रह अधिक शर ग्रहाच्या अन्य दिशेस जाणावा . मग ग्रहांचे शर एका दिशेस असेल तर त्या शरांचें अंतर करावें आणि ग्रहांचें शर भिन्न दिशेस असले तर त्या शरांची बेरीज घ्यावी म्हणजे तें ग्रहांच्या मध्यें दक्षिणोत्तर अंगुलात्मक अंतर होईल . नंतर जर ग्रहांच्या बिंबाच्या बरजेच्या अर्धापेक्षां दक्षिणोत्तर अंतर कमी असेल तर ग्रहांच्या बिंबाचें ऐक्य होईल . आणि जर दक्षिणोत्तर अंतर अधिक असेल तर ग्रहांच्या बिंबाचें ऐक्य होणार नाहीं असें समजावें . अर्थांतच हें समजण्यास लंबनादि गणिताची काय गरज आहे ?

उदाहरण .

मंगळ १० रा . ६अं . ३५क . ९विक . - गतयुति दिवसांचें चालन . ३अं . ५३क . ०विक . = १०रा . २अं . ४२क . ९ विक . हा मंगळ आणि शनि १० रा . २अं . ४२क . ९ विक . हा मंगळ आणि शनि १० रा . २अं . ५८क . ४४ विक .-गतयुति दिवसांचें चालन ० अं . १६क . ३५विक . = १०रा . २अं . ४२क . ९ विक . हा शनि झाला . आतां , असतो दयाधिकारांत सांगितल्याप्रमाणें आणलेले शर -मंगळाचा शर दक्षिण १६ अंगु . ११ प्रति अंगुलें , आणि शनीचा शर दक्षिण १४ अंगुलें ७ प्रति अंगुलें . आतां या शरांची दिशा एक असून मंगळाचा शर अधिक आहे म्हणून शरांतर २ अंगुलें ४ प्रति अंगुलें ; मंगळाचे बिंब १ अंगुल ५० प्रति अंगुलें +शनीचें बिंब १ अंगुल ३३ प्रति अंगुलें =३ अंगुलें २३ प्रति अंगुलें हें बिंब मानैक्य झालें आणि १ अंगुल ४१ प्रति अंगुलें हें मानैक्य खंड झालें यापेक्षां शरांतर अधिक आहे म्हणून बिंबैक्य होणार नाहीं म्हणजे मंगळ व शनि एकमेकाचे खालून जाणार नाहीत . आजूबाजूनें जातील .

ग्रहयुत्यधिकार समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP