गुणांची कर्मे
आता ह्यापुढे शीतोष्णादि जे द्रव्याचे वीस गुण आहेत त्यांची कर्मे सांगतो . कारण नाना प्रकारच्या द्रव्यांच्या ठिकाणी असणारे अनेक गुण त्यांच्या कार्यावरूनच अनुमान करून जाणावयाचे असतात .
शीत (थंड ) हा गुण आनंददायक , व स्तंभक असून मूर्च्छा , तहान , घाम व दाह ह्यांचा नाश करितो . उष्णगुण ह्याच्या उलट (विरूद्ध ) कार्य करणारा असून विशेषतः पाचक आहे . (म्हणजे व्रणादिकाचेही पाचन करणारा आहे .) स्निग्धगुण हा त्वचेला वगैरे स्नेहत्व (तेलकटपणा ) आणणारा , मृदुपणा आणणारा , आणि शक्ति व अंगकांति वाढविणारा आहे . रूक्षगुण हा त्याच्या विरूद्ध म्हणजे उलट गुण करणारा असून विशेषतः स्तंभक व खरखरीतपणा देणारा आहे . पिच्छिलगुण जीवनकारक , बलवर्धक , मोडलेल्या हाडांना साधणारा , कफाला वाढविणारा व जड असा आहे . विशदगुण ह्याच्या उलट (विरूद्ध ) कार्य करणारा असून ओलसरपणाला शोषून टाकणारा (नाहीसा करणारा ) व
व्रणाचे रोपण करणारा आहे . तीक्ष्णगुण दाहकारक , व्रणाला पिकविणारा व स्त्राव करणारा आहे . मृदुगुण ह्याच्या उलट कार्य करणारा आहे . गुरूगुण हा अंगाला जडत्व आणून अंग गलित करणारा , उपलेप (मलाची वाढ ) करणारा , कफ वाढविणारा , तृप्तिकारक व पुष्टि देणारा आहे . आणि लघुगुण त्याच्या उलट कार्य करणारा असून लेखन (पातळ करणारा ) व रोपण (व्रण भरून आणणे ) करणारा आहे . ह्याप्रमाणे हे शीतादि पहले दहा गुण त्यांच्या कार्यासह सांगितले .
आता दुसरे द्रवादि दहा गुण सांगतो ते लक्षात ठेव . द्रव हा गुण ओलेपणा आणणारा आहे . सांद्र हा गुण स्थूल व बंधकारक (सांध्यांना बळकटी आणणे वगैरे ) आहे . श्लक्ष्ण हा गुण पिच्छलगुणाप्रमाणेच कार्य करणारा आहे , म्हणजे जीवनशक्ति आणणारा , कफकारक व मोडलेल्या हाडाला सांधणारा व जड आहे . कर्कशगुणा विशदगुणाप्रमाणे कार्य करणारा म्हणजे जीवनशक्ति न आणणारा , कफ न वाढविणारा , व हाडाचेही संधान न करणारा आहे . सूक्ष्मगुण सुखदायक असून सुगंध हा गुण रुचिकारक व मृदु होतो . दुर्गंधगुण ह्याच्या उलट कार्य करणारा म्हणजे मळमळ व अरुचि उत्पन्न करणारा आहे . सर हा गुण अनुलोमन करणारा आहे . मंद हा गुण यात्राकर म्हणजे देहाला वागविणारा आहे . व्यवायी हा गुण प्रथम पचनापूर्वीच सर्व देहाला व्यापून मग पचन करितो . विकासी हा गुणही व्यवायीगुणाप्रमाणेच पाक होण्यापूर्वीच सर्व शरीरात संचार करून धातूंना शिथिल करितो . अशुकारी हा गुण पाण्यात तेलाचा बिंदु टाकला असता ज्याप्रमाणे त्वरित पसरतो त्याप्रमाणे त्वरित कार्य करितो . सूक्ष्म हा गुण आपल्या सूक्ष्मपणामुळे अतिशय सूक्ष्म अश स्त्रोतसात संचार करण्याचे काय्र करितो . ह्याप्रमाणे हे वीस गुण त्यांच्या कार्यासह क्रमाने सांगितले आहेत ॥५१३ -५२३॥
आता ह्यापुढे आहारागतिविषयी म्हणजे खाल्लेले अन्न पचन झाल्यावर काय गुण करिते व शरीरापैकी कोणकोणत्या धातुंचे वगैरे पोषण करिते ह्याविषयीची माहिती सांगतो .
ह्या पृथिव्यादि पंचभूतात्मक देहामध्ये भक्षण केलेला पंचभूतात्मक आहार शरीरस्थ पंचमहाभूतांच्या अग्निसंयोगाने चांगल्या रीतीने पचन झाला असता आपापल्या महाभूतात्मक गुणाला वाढवितो . म्हणजे पृथ्वितत्त्वात्मक भाग पृथ्वितत्त्वाला वाढवितो . जलतत्त्वात्मक भाग जलतत्त्वाला वाढवितो , ह्याप्रमाणे त्या त्या तत्त्वाचे भाग त्या त्या तत्त्वाला वाढवितात . (कित्येक आचार्य म्हणतात की , आपापल्या गुणाला म्हणजे पृथ्वीव्यादिकांचे गंधसादि जे पाच गुण त्यांना वाढवितो .)
आहार भक्षण केल्यावर तो पचन होण्यापूर्वी कफाला वाढवितो . पचन होत असता अर्धवट परिपाकामुळे उत्पन्न होणार्या आम्लरसाने पित्ताला वाढवितो . आणि चांगला पचन झाल्यावर निःसार राहिलेला भाग रूक्षपणामुळे वाताला वाढवितो .
विष्ठा व मूत्र हे आहाराचे मळ आहेत . आणि त्यातील सार म्हणजे सत्त्वरूप जो भाग त्याला रस म्हणतात . ह्याचे वर्णन मागे ‘‘शोणितवर्णन ’’ नावाच्या चौदाव्या अध्यायात सांगितले आहे . तो रसधातू व्यानवायूने प्रेरित होऊन रसादि सर्व धातूंचे पोषण करितो .
कफ हा रसधातूचा मळ आहे . पित्त हे रक्ताचा मळ आहे . नाक , कान , तोंड ह्या मार्गाने बाहेर पडणारा मळ हा मासाचा मळ आहे . घाम हा मेदधातूचा मळ आहे . नखे व रोम हे हाडाचा मळ आहे . डोळ्य़ाचा मळ व त्वचेचा स्नेह (तेलकट भाग ) हा मज्जाधातूचा मळ आहे . (आणि शुक्रधातु हा निर्मळ आहे .)
दिवसा मनुष्य स्वाभाविकच जागृत अवस्थेमध्ये असल्यामुळे त्याचे हृदय प्रफुल्लित कमळाप्रमाणे विकसित असते . आणि रक्तादि सर्व धातुही क्लेदरहित (ओलसरपणा नसलेले असे ) असतात . त्यामुळे दिवसाच्या जेवणाचे थोडे अजीर्ण असले तरी त्याजवर रात्री जेवणे हितकर असते ; परंतु मनुष्य स्वाभाविकच निजलेला असल्यामुळे झोपेने त्याचे हृदय संकुचित झालेले असते . आणि रक्तादि सर्व धातु क्लेदयुक्त व शिथिल झालेले असतात . त्यामुळे रात्रीच्या जेवणाचे अजीर्ण असता त्याजवर दिवसा जेवणे हितकारक होत नाही .
राजऋषीमध्ये प्रमुख अशा महामुनी धन्वंतरींनी सांगितलेला हा सूत्रस्थानातील सर्व विधि किंवा हा आहारविधि प्रयत्नेकरून पठण करील तो विद्वच्छेष्ठ वैद्य राजाला औषधोपचार करण्यास समर्थ होईल . व विद्वान लोकामध्येही पूज्य होईल .
ह्याप्रमाणे भगवान धन्वंतरींनी सांगितलेल्या व महर्षी सुश्रुतानी ग्रंथित केलेल्या सुश्रुतसंहितेपैकी सूत्रस्थानातील सेहेचाळिसावा अध्याय समाप्त झाला .