मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
अष्टविध-शस्त्रकर्माविषयी

सूत्रस्थान - अष्टविध-शस्त्रकर्माविषयी

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय पंचविसावा

आता ‘अष्टविध -शस्त्रकर्माविषयी ’ अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरीनी सांगितले आहे त्याप्रमाणे सांगतो ॥१ -२॥

भगंदर , कफजन्य गाठ , तिलकालक (तीळ ), ओल्या व्रणाचे काठ , सर्व प्रकारची आर्बुदे (आवाळु ), वातजन्य व कफजन्य मुळव्याधीचे मोड , चामकीळ , अस्थि व मांस यामध्ये असलेले शल्य , जतुमणी (एक क्षुद्ररोग ), मांस संघात , गलशुंडिका (तालुरोग ), कुजलेले स्नायु , कुजलेले मांस व कुजलेल्या शिरा , वल्मीक (वारूळ ), शतपोनक (शूकदोषासंबंधी पिटिका किंवा भगंदरातील एक प्रकार ), अधु्रव (तालुरोग ), उपदंशजन्य पिटिका वगैरे मांसकंदी (व्रणावर आलेले मांसाचे गोळे ) आणि अधिमांस (व्रणावर , अगर इतरत्र अधिक वाढलेले मांस ) हे सर्व रोग छेदन करून (समूळ ) काढून टाकावयाचे आहेत .

त्रिदोषजन्य करट वगळून बाकीची सर्व करटे , वातजन्य , पित्तजन्य , पित्तजन्य व कफजन्य गाठी वात , पित्त व कफजन्य विसर्प , आंत्रवृद्धी विदारिका (क्षुद्ररोगातील एक पुळी ), प्रमेहासंबंधी पिटिका , व्रणशोथ , स्तनरोग , अवमंथक (शुकदोषापैकी पिटिका ), कुंभिका (शूकदोषापैकी ), अनुशयी क्षुद्रारोगातील (पुळी ), नाडीव्रण , वृंद व एकवृंद (गलरोग ), पुष्करिका व अलजी (शूकदोषजन्य मुळ्या ), गिलायु (कंठरोग ), पूर्वपाकी पिटिका (म्हणजे फोड येऊन पिकून फुटतो व व्रण होतो असे भगंदर वगैरे रोग ) हे रोग भेदन करून (फोडून ) बरे करण्याचे आहेत . त्याचप्रमाणे मुतखडा असेल तर बस्तीचे भेदन करून काढावा , पण एरवी बस्तीचे भेदन करू नये .

वातादि दोषजन्य तीन व त्रिदोषजन्य अशा चार रोहिणी नावाच्या पुळ्या किलास कुष्ठ , उपजिव्हक , कारण धुळीचे वगैरे कण , रोम (केस ) नखे इत्यादि , किंवा एखादे

सुटलेले हाड आत शिल्लक राखून जर व्रण शिवण्यात आला तर ते त्या व्रणाला पिकवितात व त्यामुळे नानातऱ्हेच्या वेदना होतात . म्हणून अशा व्रणाचे आधी शोधन करावे ॥ ३॥

टाके घेण्याचा विधि

व्रणाचे चांगले शोधन झाल्यानंतर शिवण्यासाठी तो आपल्याला पाहिजे असेल तसा वर उचलून घ्यावा आणि त्याचे काठ व्यवस्थितपणाने जुळवावे आणि बारीक सुताने शिवावे किंवा आपट्याच्या सालीच्या बारीक धाग्याने , तागाच्या किंवा रेश्माच्या धाग्याने , जनावरांच्या वगैरे बारीक स्नायूंच्या बारीक तंतूने , केसाने , मूर्वा (याची धनुष्याला दोरी करितात .) म्हणजे मोरवेल किंवा गुळवेल , यांचे ताणे (बारीक लांब धागे ) घेऊन त्याने शिवावे . शिवताना योग्य वाटेल त्याप्रमाणे मुरड घालून किंवा गोफणीप्रमाणे अगर तुणून हळू हळू शिवावे . गाठ देताना ज्या शिवण्यात बंद बांधल्याप्रमाणे साध्या गाठी देतात त्याप्रमाणे गाठ द्यावी . किंवा जसे आपणास सोइस्कर वाटेल तशी गाठ द्यावी . किंवा जसे आपणास सोइस्कर वाटेल तशी गाठ द्यावी .

ज्या ठिकाणी मांस कमी आहे अशा भागी व सांघ्याच्या ठिकाणी चक्राकार (अर्धचंद्राकार ) सुई दोन बोटे लांबीची घ्यावी . मांसल भाग असल्यास तीन अंगुळे लांबीची व तीन कोरीची (त्रिकोणी ) सुई घ्यावी . मर्मस्थान , वृषण व पोट याठिकाणी शिवण्यासाठी धनुष्याप्रमाणे वाकडी सुई घ्यावी . याप्रमाणे या तीन प्रकारच्या सुया अतिशय बारीक अग्राच्या व चांगल्या व्यवस्थित आकाराच्या असाव्यात . त्यांचा आकार जाईच्या फुलाच्या देठाप्रमाणे वाटोळा असावा .

टाके घेताना , व्रणाच्या काठापासून फार लांब किंवा अगदी जवळ असे , घेऊ नयेत . लांब टाके घेतले असता व्रणाच्या कडांना पीडा होते व जवळ घेतले तर व्रणाचे काठ तुटण्याचा संभव असतो .

व्रण चांगला शिवल्यानंतर त्याजवर तागाचे व कापसाचे वस्त्र घालून आच्छादन करावे व (प्रियंगु ) गहुला , सुरमा (किंवा रसांजन ) जेष्ठमध व लोध्र यांचे वस्त्रगाळ केलेले चूर्ण त्याजवर सर्वत्र पसरावे . अथवा (शल्लकी ) साळईच्या झाडाच्या फळांचे चूर्ण अगर तागाच्या वस्त्राची राख पसरावी . नंतर तो व्रण योग्य तऱ्हेने बांधून त्याला मागे ‘‘व्रणितोपासनीय अध्यायात ’’ सांगितल्याप्रमाणे पथ्यकारक आहारविहार कसा ठेवावा हे सांगावे .

याप्रमाणे हे अष्टविधकर्म संक्षेपाने येथे सांगितले . पुढे चिकित्सास्थानात संपूर्ण माहिती विस्ताराने सांगू .

जरूरीपेक्षा कमी कापणे किंवा अधिक कापणे किंवा वाकडे कापणे किंवा आपणास दुखापत करून घेणे ह्या चार गोष्टी ह्या अष्टविधकर्मामध्ये दूषणास्पद आहेत .

ज्यावेळी वैद्य आपल्या अडाणीपणाने , लोभाने रोग्याच्या शत्रूच्या सांगण्यावरून , भीतीने , घाबरून किंवा दुसर्‍या काही कारणानी शस्त्रक्रिया करण्यात बिघाड करतो . त्यावेळी तो वरील अपायकारक गोष्टीशिवाय दुसरेही रोग उत्पन्न करितो .

अशा प्रकारचा अयोग्य तऱ्हेने उपचार करणारा वैद्य पुनः जर क्षार , अग्निकर्म व औषधोपचार करू लागेल तर जगण्याची इच्छा करणार्‍या रोग्याने त्या वैद्याला उग्रविषारी सापाप्रमाणे दूर लोटावा .

त्याचप्रमाणे एकाद्या मूर्ख वैद्याने वाजवीपेक्षा अधिक शस्त्रक्रिया केली तर त्यापासून मर्मस्थान , सांधे , शिरा , स्नायू व हाडे यांपैकी एकाद्याला अपाय होतो व कदाचित् अशा वेळी रोग्याचा प्राणही जातो .

मर्मस्थान मर्मातील सांधे , मर्मशिरा , मर्मस्नायु व हाडे या पाच मर्मांना जर अधिक झालेल्या शस्त्रप्रयोगाने अपाय झाला तर --घेरी येणे , बडबड , पडणे (अंग टाकणे ), अज्ञान , हालचाल करिता न येणे , झोपेत असल्याप्रमाणे मनाची स्थिती (संलयन ), अंग तापणे , अंग गळणे , बेशुद्धपणा , वर श्वास लागणे आणि वातप्रकोपामुळे होणारे दुसरे तीव्र विकार , जखमेतून मांस धुतलेल्या पाण्याप्रमाणे रक्त जाणे आणि सर्व इंद्रियांना आपआपली कामे करण्याचे सामर्थ्य नसणे हे विकार होतात . ही पाच प्रकारच्या मर्मस्थानाला शस्त्राने अपाय झाला तर त्यामुळे होणारी सामान्य लक्षणे सांगितली .

मर्मातील जर शीर (रक्तवाहिनी ) तुटली किंवा फुटली तर तिजमधून इंद्रगोप किड्याप्रमाणे लाल असे पुष्कळ रक्त या जखमेतून जाते आणि वातप्रकोपामुळे होणारे शोणीत वर्णनाध्यात सांगितलेले शिरोरोगादि विकार होतात .

मर्मस्नायूचा च्छेद झाला असता कुबडेपणा , शरीराचे अवयव गलित होणे (काम करण्यास असमर्थ ), कोणाचेही काम करण्यास शक्ती नसणे , अतिशय पीडा होणे , आणि जखम भरून येण्यास फार दिवस लागणे ही लक्षणे होतात .

चल सांधे (हात , पाय , मान व हनुवटी या ठिकाणचे ) व अचल सांधे यांचा वेध झाला असता सूज अतिशय वाढते , पीडा अतिशय होते , अशक्तपणा येतो ,यस हातापायांची पेरी फुटतात व त्यांना सूज येते ; आणि सांध्यांना आपले काम (हालचाल वगैरे ) करता येत नाही .

शस्त्रकर्माने मर्मातील हाडाला इजा तर रात्रंदिवस भयंकर वेदना होतात ; आणि कोणत्याही स्थितीत मनाला सुख वाटत नाही . तहान लागते अंग गळाल्यासारखे होते , सूज येते व अंगाला रुक्षपणा येतो . ही लक्षणे असली म्हणजे त्या मनुष्याच्या हाडाच्या वेध झाला आहे म्हणून समजावे .

ही जी वर मर्मस्थानातील शिरा वगैरे विद्ध झाल्याने होणारी लक्षणे सांगितली ती सर्व लक्षणे त्या त्या शिरा , स्नायु , सांधे व हाडे यातील मर्माच्या ठिकाणी वेध झाला असता होतातच . शिवाय वर ‘भ्रमप्रलापादि ’ जी मर्मभेद झाला असता होणारी लक्षणे ३४ -३५ श्लोकात आहेत तीही होतात .

शस्त्रकर्मात ज्याच्या मांसगत मर्माचा वेध झाला आहे त्याच्या व्रणाच्या जागेचे स्पर्शज्ञान नाहीसे होते आणि शरीराला फिक्कट पांढुरका असा वर्ण येतो .

ज्याला शस्त्रकर्म अगदीच चांगले करिता येत नाही असा जो अडाणी वैद्य शस्त्रकर्म करीत असता त्या शस्त्राने आपल्यालाच जखम करून घेतो , अशा त्या आत्मघातकी अडाणी वैद्याला आयुष्याची इच्छा करणार्‍या विचारी मनुष्याने अजिबात वर्ज करावा .

शस्त्रक्रिया करिताना आडवेतिडवे शस्त्र चालविले असता काय दो घडतात ते मागे ‘‘अग्रोपहरणीय ’’ अध्यायात सांगितले आहेच . यासाठी त्या सर्व दोषांचा त्याग करून

शस्त्रक्रिया करावी .

रोग्याला आई , बाप , मुले , आणि वगैरे इष्टमित्र यांच्याबद्दल देखील शंका वाटते . म्हणजे यांचाही विश्वास वाटत नाही . पण तो वैद्यावर मात्र पूर्ण विश्वासून असतो . म्हणून तो आपला देह वैद्याच्या स्वाधीन करितो . वैद्याबद्दल त्याला शंका वाटत नाही .

यासाठी वैद्याने रोग्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळावे .

उत्तम प्रकारे वैद्यकीय कर्म करणारे जो वैद्य त्याला धर्म , अर्थ (द्रव्य ) व कीर्ति ही विपुल प्राप्त होतात , प्रतिष्ठित लोकांमध्ये सन्मान मिळतो व शेवटी स्वर्गसुखाची प्राप्ती होते .

साध्य जो रोग आहे तो एखादा एक क्रियेने साध्य होतो . त्यापेक्षा कठीण असल्यास तो दोन क्रियांनी बरा होतो . त्याहून कठीण असणारा एखादा तीन किंवा चार

क्रियांनीही बरा होतो . (सारांश , साध्य व्याधि हरप्रयत्नांनी निश्चयाने बरा होतो ॥३ -१९॥

N/A

References : N/A
Last Updated : August 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP