अध्याय १५ वा
आता " दोष - धातु - मल - क्षय - वृद्धि - विज्ञान ’ नावाचा अध्याय भगवान धन्वंतरींनी जसा सांगितला आहे त्याप्रमाणे सांगतो ॥१॥२॥
वातादि दोष , रसादि धातु , व मूत्रादिमल हेच पदार्थ शरीर धारणेला मूलाधार आहेत . म्हणून त्यांचे लक्षण आता मी सांगतो ते ऐक .
हालचाल करणे , इंद्रियांना त्यांच्या विषयाचे ज्ञान करुन देणे , पूरण ( आहाराचे योगाने देहाचे पोषण ), अन्नरस व मूत्रादिमल हे पृथक करणे , आणि मूत्रादिमल आणि शुक्रार्तव ह्यांना त्यांच्या वेगकाळी बाहेर सोडणे व वेग नसताना धारण करणे अशी ही वायूची पाच कर्मरुप ( लक्षणे ) आहेत व ती तो अनुक्रमे व्यान , उदान , प्राण , समान व अपान अशा आपल्या पाच स्वरुपांनी करितो ; म्हणजे हे त्याचे पाच प्रकार असून ह्यांच्या योगाने तो शरीराचे धारण करितो .
रंग , पचनक्रिया , ओज , तेज . ( शरीरस्थ रसादि पदार्थांना योग्य पोहचविण्याचे जे धोरण ती मेधा , ) उष्णता ही पाच लक्षणे पित्ताची आहेत . ती ते पित्त आपल्या अनुक्रमे - रंजक , पाचक , साधक , आलोचक व भ्राजक अशा पाच स्वरुपांनी करिते . म्हणजे हे रंजकादि पाच त्याचे प्रकार आहेत . असे हे पित्त जठराग्नीचे कार्य करुन देहाचे पोषण करिते . धोरण उत्पन्न करण्याचे कार्य साधक पित्तच करते . सांधे बळकट राखणे , सर्व देहाला स्नेहन ( वंगण ) करणे , रोपण ( व्रणादि भरुन आणणे ), देहाचे पोषण करणे आणि त्यात बळ व स्थिरपणा ठेवणे ही कार्ये ( लक्षणे ) कफाची आहेत . व तो आपल्या श्लेष्मक , क्लेदक , तर्पक , बोधक व अवलंबक अशा चार प्रकारांनी ती ती कार्ये करुन उदक कर्माने शरीराचे पोषण करितो .
रसधातु हा तृप्ती व आनंद देतो व रक्तपुष्टी करितो . रक्त हे शरीराला चर्ण चांगला आणून मासाचे पोषण व देहाला जिवंत राहणे ही कामे करिते . मांस हे शरीर व मेद ह्यांची वाढ करिते . मेदधातु शरीरात स्नेह ( चरबी ) वाढविणे , घाम आणणे , शरीराला बळकटी व हाडांचे पोषण ही कामे करितो अस्थि देहाचे धारण व मज्जेचे पोषण करितात . स्निग्धता , बळ व शुक्राचे पोषण ही कामे मज्जा करितो शिवाय हाडांची वाढही करितो . शुक्रधातु हा धैर्य , रतिप्रसंगी स्खलन , प्रेम , शरीरसामर्थ्य हर्ष व गर्भोत्पत्ति ही कामे करितो .
मल शरीराचे धारण तसेच वायु व जठराग्नि ही धारण करितो . मूत्र हे बस्ती पूर्ण करिते व शरीराला ओलावा देते .
स्वेद ( घाम ) हा ओलसरपणा देतो व त्वचेला मृदु करितो . रक्ताची जी लक्षणे तीच आर्तवाची असून ते गर्भधारणा करणारे आहे . गर्भधारण झाली असता त्या गर्भासंबंधी डोहाळे वगैरे लक्षणे करितो .
स्तन्य ( दूध ) हे स्तनाला पुष्ट करणे व जीवन ही कार्ये करिते .
ह्यासाठी ह्या सर्वांचे व्यवस्थित रक्षण करावे ॥३॥८॥
आता ह्या सर्वांची क्षीणत्वाची लक्षणे सांगतो .
वात क्षीण झाला असता हालचाल चांगली करिता येत नाही , फार बोलवत नाही , उत्साह वाटत नाही , इंद्रियांना विषय ग्रहण करवत नाही ही लक्षणे होतात .
पित्त क्षीण झाले असता अंगातील उष्णता व जठराग्नि मंद होतो , शरीर निस्तेज दिसते कफ क्षीण झाला असता अंगाला रुक्षपणा , अंतर्दाह , आमाशय व इतर कफाची स्थाने मोकळी पडल्यासारखी वाटतात . सांधे ढिले पडतात , तहान लागते , अशक्तपणा येतो व झोप लागत नाही .
असा दोषांचा क्षय झाला तर त्याची पुनः योग्य वाढ होण्याकरिता ते ते दोष वृद्धि करणारे पदार्थ उपयोगात आणावे .
रसाचा क्षय झाला असता त्वचेला रुक्षपणा , आंबट व थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा व वाहिन्याचा ढिलेपणा ही लक्षणे होतात .
मांसाचा क्षय झाला असता नितंबभाग , गाल , ओठ उपस्थ , मांड्या , छाती , काख , पिंढर्या पोट व मान ह्यांना शुष्कपणा ( कृशत्व ) येतो . शरीराला रुक्षपणा , अंगात टोचल्यासारख्या पीडा , शरीर गळल्यासारखे वाटणे , व धमन्यांना शिथिलपणा ही लक्षणे होतात .
मेद क्षीण झाला असता पांथरी वाढते , सांधे पोकळ वाटतात , त्वचेला रुक्षपणा , अति स्निग्धमांस ( चरबीसहमास ) खाण्याची इच्छा ही लक्षणे होतात .
हाडांचा क्षय झाला असता हाडे दुखणे , दात व नखे गळणे व रुक्षपणा ही लक्षणे होतात .
मज्जेचा क्षय झाला असता शुक्राची वाढ होत नाही . बोटांची पेरी दुखणे , हाडांमध्ये ठणका व हाडे पोकळ वाटणे ही लक्षणे होतात . शुक्राचा क्षय झाला असता लिंग व वृषण ह्यात ठणका , मैथुनाचे ठिकाणी दुर्बलता , किंव फार वेळाने ( अल्प ) वीर्यपात ; पात झाला असता त्यांत रक्तमिश्र शुक्र दिसणे ही लक्षणे होतात .
हा धातुंचा क्षय झाला असता तो धातु वृद्धि करणारे पदार्थ उपयोगात आणावे . हाच त्यांचा प्रतिकार होय .
मलाचा क्षय होणे ( म्हणजे मल कमी प्रमाणांत बाहेर पडणे ) असे झाले असता हृदय व कुशी यांमध्ये पीडा होते , आणि वायु गुड गुड शब्द करीत वर येतो आणि पोटात पक्वाशयात वगैरे फिरतो . मूत्राचा क्षय झाला असता बस्तीमध्ये टोचल्याप्रमाणे पीडा होते व लघवी थोडी होते . ह्याजवर देखील त्या त्या मलाना वाढविणारे पदार्थ खावे . मलक्षयावर उडदाची उसळ वगैरे पदार्थ खावे . मूत्रक्षयावर ऊस , काकडी , तवसे , वगैरे खावे .
स्वेदाचा ( घामाचा ) क्षय झाला असता रोमरंध्रे बंद होतात , त्वचा शुष्क होते , त्वचेला स्पर्श कळत नाही व घाम येत नाही . घामाच्या क्षयावर अंगाला तेल लावावे व पाण्याचा वाफारा घ्यावा . खाण्यात कोंबड्याचे व रानडुकरांचे मास उपयोगात आणावे .
आर्तवाचा क्षय झाला असता वेळच्यावेळी ( प्रतिमासी तीन तीन दिवस ) रजोदर्शन होत नाही . झाले तर अल्प होते ; व त्यावेळी खालील ओटी पोटांत वगैरे दुखते . ह्याजवर अग्निय व संशोधक अशा द्रव्यांचा विधियुक्त उपयोग करावा . म्हणजे तीळ , गुळ , उडीद , खोबरे , मध वगैरे पदार्थ खाण्यात ठेवावे .
स्तन्याचा ( दुधाचा ) क्षय झाला असता स्तन म्लान होतात ; दूध येत नाही व आले तर थोडे येते . त्यावर कफवर्धक पदार्थ खावे .
गर्भाचा क्षय झाला असता ( सल राहिले असता ) गर्भाचे चलनवलन बंद होते व पोटाची वाढ होत नाही . त्याजवर बस्ति देता येण्यासारखा असल्यास गर्भाशयात दुधाचा बस्ती द्यावा . ( डल्लण म्हणजे आठव्या बस्ति द्यावा . ) पौष्टिक व स्निग्ध अन्न खावे . ( काहींच्या मताने पौष्टिक अशी अंडी , गर्भ खावी ॥९॥१४॥
आता दोष , धातु व मल अति वाढले असता त्यांची लक्षणे सांगतो . ह्या दोषादिकांची वाढ ते ते दोष , धातु , मल वाढविणारे पदार्थ अतिशय खाण्यांत आले असता होते . त्यापैकी वाताची वाढ झाली असता कर्कश बोलणे , कृशन्व , काळीमा , अंग फुरफुरणे , उष्ण पदार्थ खाण्याची इच्छा , निद्रानाश , अनुत्साह , मळ अतिशय घट्ट होणे ही लक्षणे होतात .
पित्ताची वाढ झाली असता सर्व पदार्थ वगैरे पिवळट दिसणे , अंगाचा दाह , थंड पदार्थ खाण्याची इच्छा , अल्पनिद्रा , मूर्च्छा , ओजाचा क्षय , इंद्रियांना आपापली कामे करण्याचे सामर्थ्य राहात नाही आणि मल , मूत्र , डोळे व त्वचा ह्यांना पिवळेपणा ही लक्षणे होतात .
कफाची वाढ झाली असता डोळे त्वचा इत्यादिकांना पांढरेपणा , अंग गार लागणे , अंग ताठणे , जडत्व , मनाला उत्सुकता नसणे , ग्लानि , तंद्रा ( गुंगी ), झोप अधिक येणे आणि हाडांचे सांधे शिथिल होणे ही लक्षणे होतात .
रसधातुची वाढ झाली असता छातीत कळमळणे , तोंडाला थुंकी अधिक येणे , ही लक्षणे होतात . रक्ताची वाढ झाली असता अंग व डोके ह्यांनी लाली , वाहिन्या ( शिरा ) रक्ताने फुगणे , ( मांस वृद्धीच्या योगाने ) नितंबभाग , गाल , ओठ . गुह्यभाग , मांड्या दंड व पिंढर्या हे अवयव पुष्ट होणे व अंगाला जडपणा , मेद वाढला असता अंगाला स्निग्धपणा , पोट व कुशी मोठ्या होणे , खोकला , श्वास व अंगाला दुर्गंधी ; हाडांची वाढ झाली असता हाडे अधिक होतात ; दात अधिक होतात ; मज्जा वाढली असता सर्व अंगाला व डोळ्याला जडपणा ; शुक्राची वाढ झाली असता शुक्राश्मरी होतो व शुक्रपात अधिक होतो . मलाची वाढ झाली असता पोट फुगणे , कुशीमध्ये शूळ ही लक्षणे होतात . मूत्रवृद्धीने लघवी पुष्कळ होते , आणि ती वरचेवर होते . खालील ( ओटी ) पोटात टोचल्याप्रमाणे दुखते व ते फुगते . घामाच्या वाढीने त्वचेला दुर्गंधी व कंडू उत्पन्न होतो .
आर्तवाची वाढ झाली असता अंग दुखते , आर्तवस्त्राव पुष्कळ होतो व त्याला दुर्गंधी येते .
दुधांची वाढ झाली असता स्तन पुष्ट होतात , वरचेवर दुध गळते व स्तनात ठणका लागतो . गर्भाच्या वाढीने पोट मोठे होते . व घाम येतो .
ह्या दोषादिकांची अतिशय वाढ झाली असता त्या त्या दोषाधात्वादिकांना अनुरुप असे संशोधन ( रेचनादि उपाय ) व ते कमी होतील असे संशमन उपाय योजावे . पण त्यांचा क्षय होणार नाही अशा विशेष सावधगिरीने चिकित्सा करावी ॥१५॥१९॥
रसादि सप्तधातूपैकी पूर्वीचा म्हणजे आधीचा एक धातु जर अतिशय वाढला तर तो आपल्या पुढील धातूला वाढवितो . म्हणजे रसाची वाढ झाली की , तो त्याच्या पुढील जो रक्तधातु त्याला वाढवितो . म्हणून अत्यंत वाढलेल्या धातूला तो योग्य प्रमाणांत येईपर्यंत कमी करणे हितकारक आहे ॥२०॥
बलाचे लक्षण - आता बलक्षयाचे लक्षण सांगतो . त्यात रसापासून तो शुक्रापर्यंत जे धातु आणि त्याचे जे अत्युतमसार त्याला ’ ओज ’ असे म्हणतात . आणि तेच मनुष्याचे बळ होय असा आमच्या शास्त्राचा सिद्धांत आहे .
ह्या बलाच्या योगाने सर्व अंगातील मांस वाढून स्थिर होते . शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली करण्यास हुरुप असतो . शब्द व अंगकांति सतेज असते . हात , पाय वगैरे कान , नाक वगैरे बाह्य कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये आणि मान , बुद्धि वगैरे अंतरगत इंद्रिये ही आपआपली कामे करण्यास समर्थ असतात ॥२१॥२२॥
ओज हे सोमतत्त्वात्मक असून स्निग्ध , शुक्लवर्ण , शांत , स्थिर व सरणारे ( चलन पावणारे ) आहे . तसे ते श्रेष्ठ अशा गुणाचे , मृदु , बुळबुळीत व प्राणाचे मुख्य स्थान आहे . त्याने मनुष्याचा सर्व अवयवांसह हा देह व्यापलेला आहे . म्हणून ओज जर शरीरातून नाहीसे झाले तर प्राण्यांची शरीरे नाश पावतात .
कशाचा तरी जबरदस्त धक्का बसल्याने , अति क्षीणपणाने , अति रागाने , अति शोकामुळे , अति श्रमाने फार भूक लागल्याने , अशा कारणानी धातुवह स्त्रोतसापासून बाहेर पडलेले ओज त्याला वाताने प्रेरित असे जे तेज ( पित्त ) ते क्षीण करिते आणि हृदयापासुन बाहेर काढते .
त्या ओजाच्या क्षयाचे तीन प्रकार आहेत . एक विस्त्रंस ( स्थानापासून भ्रष्ट होणे ), व्यापत ( बिघडणे ), आणि क्षय पावणे ही लक्षणे ओज बिघडल्याने होतात . त्यात विस्त्रंस झाल्याने सांधे गळणे , शरीर ग्लानी , वातादि दोष स्वस्थानापासून सुटणे आणि इंद्रियांच्या कार्यांना विरोध ( ती चांगली होत नाहीत ) ही लक्षणे होतात . व्यापन्नतेमुळे शरीर स्तब्ध व जड होणे , वातजन्य सूज , कांती बदलणे , ग्लानी , तंद्रा , निद्रा ही लक्षणे होतात . आणि ओजाचा क्षय झाला असता मूर्च्छा , मासक्षय , मोह , बडबड व अखेर मृत्यु ही होतात ॥२३॥२७॥
ओजाचे व्यापत , विस्त्रंस व क्षय असे तीन दोष सांगितले . त्यापैकी सांधे गळणे , अंग गळल्यासारखे वाटणे , वातादि दोषस्थान भ्रष्ट होणे , श्रम , कामे करण्याविषयी अनुत्साह ही लक्षणे ओज हे स्थानापासून सुटल्याने होतात . अंग ताठणे , जडत्व , ग्लानी , अंगकांति बदलणे , मळ पातळ होणे , तंद्री , झोप व वातजन्य सूज ही लक्षणे होतात व मरणही येते . ही लक्षणे ओजक्षयाची आहेत .
त्यापैकी ओज स्थानभ्रष्ट किंवा दूषीत झाले तर प्रकृति मानाला विरोध न येईल अशा बेताने रसायन व वाजीकरण प्रयोगापैकी योग्य ते उपाय करुन ओजाची वाढ करावी . आणि तिसरी जी ओजक्षयावस्था तिजमध्ये जो मूढसंज्ञ ( म्हणजे ज्याचे माणूस वगैरे कोण ह्याचे ज्ञान नष्ट झाले आहे ) त्याजवर उपाय करु नयेत . ( कारण तो असाध्य समजावा . )
वातादि दोष , रसादिधातु व मल हे ज्याचे क्षीण झाले आहेत अथवा ज्यांचे ओज क्षीण झाले आहे असा रोगी त्याचा जो दोष , धातु , मल किंवा ओज क्षीण झाले आहे तो धातु वगैरे वर्धन होईल अशाच प्रकारच्या अन्नपानाची इच्छा करितो तो तो पदार्थ त्याला मिळाला असता त्या त्या पदार्थाच्या योगाने ज्या ज्या दोषधात्वादिकांचे वर्धन होते त्या त्या दोष धात्वादिकांचा क्षय ( नाश ) थांबतो .
ज्या मनुष्याला धातुक्षय झाल्यामुळे त्यांचे ज्ञानशक्ति व शारीरिक कर्मे ही वाताच्या प्रकोपामुळे नष्ट झाली आहेत व ओजही क्षीण झाले आहे त्यावर औषधोपचार करणे शक्य नाही ॥२८॥३४॥
शरीर स्थूल किंवा कृश असणे हे " रसधातूवर " अवलंबून आहे . जो नेहमी कफकारक पदार्थ खातो , जेवण झाल्यावर ते पचनापूर्वी पुनः जेवण करितो , व्यायाम करीत नाही , नेहमी दिवसा झोप घेतो , त्याचा आमस्वरुपात असलेला अत्यंत मधुर असा अन्नरस शरीरातून संचार करीत अति स्निग्धपणामुळे मेद शरीराला स्थूल करतो . त्या योगाने अति स्थूल झालेल्या मनुष्याला क्षुद्र श्वास , तहान , भूक लागणे , झोप , घाम येणे , अंगाला दुर्गंधी , घसा घुरघुरणे , अंग ढिले पडणे , स्पष्ट बोलता न येणे हे विकार त्या मेदाच्या नाजुकपणामुळे व्यापतात . तो कामे करण्यास असमर्थ होतो , कफ व मेद ह्यांनी स्त्रोतसे रुद्ध केल्यमुळे त्याला मैथुनेच्छा फार नसते . आणि कफ मेदांनी मार्ग बंद केल्यामुळे बाकीचे धातु चांगलीशे वृद्धि पावत नाहीत . त्यामुळे त्याचे जीवनसामर्थ्य कमी होते . प्रमेहाच्या पुळ्या , ज्वर , भगंदर , विद्रधि व धातुसंबंधी विकार ह्यांपैकी कोणताही एक त्याला होतो व त्यातच त्याचा शेवट होतो . त्याची स्त्रोतसे मोकळी नसल्यामुळे त्याला कोणताही रोग झाला तरी तो बलवान होतो . म्हणून मेदाची वृद्धिच झाली असेल तर शिलाजित , गुग्गुळ , गोमूत्र , त्रिफळा , लोहभस्म , रसांजन , मध , सातू , मूग , हारीक , सावे , उद्दालक ( हरिकाचा एक भेद ) हे पदार्थ इतर रुक्ष पदार्थ मेदाला छेदम ( स्त्रोतसे खुली करणारे पदार्थ ) व्यायाम , लेखन पदार्थ ह्याचे सेवन व बस्तिकर्म ह्यांचा उपयोग करावा .
तसेच वातुल आहार करणारा , अति व्यायाम करणारा , अति मैथुन करणारा , अति अध्ययन करणारा , भय , शोक , काळजी , रात्री जागरण , तहान व भूक ह्यांना विरोध करणे , तुरट पदार्थ फार खाणे , थोडे खाणे , ह्या करणांनी रसधातूचे शोषण झाल्यामुळे तो सर्व शरीरातून संचार करु शकत नाही व अल्पत्वामुळे शरीराचे पोषण करु शकत नाही . त्यामुळे शरीर अति कृश होते . भूक , तहान , शीत , उष्ण , वारा , पाऊस , ओझे ही त्या अति कृश मनुष्याला थोडेसुद्धा सहन होत नाहीत . त्याला वातविकार होतात व अशक्तपणामुळे काम करण्यास असमर्थ होतो . श्वास , खोकला , क्षय , पांथरी , उदर , अग्निमास , गुल्म , रक्त , पित्त ह्यापैकी कोणता तरी एक रोग त्याला होऊन त्याचा अंत होतो . त्याला सामर्थ्य नसल्यामुळे त्याल कोणताही रोग झाला तरी तो बलवानच होतो . म्हणून दुर्बलत्व होण्याला कारण असे जे आहार ते वर्ज्य करावे . आणि हाल्लकपणा , कृशत्व उत्पन्न झालेच तर क्षीरकाकोली , आस्कंद , भुई - कोहाळा , शतावरी , चिकणामूळ , पेटारी व तुपकडी ह्या औषधी व मधुरादि गणातील औषधे ह्यांचा उपयोग करावा . दूध , दही , तूप , मांस , साठ्यासाळीचे तांदूळ , सातू व गहू ह्यांचे खाण्याचे पदार्थ करुन उपयोगात आणावे . दिवसा झोप घ्यावी . ब्रह्मचर्य पाळावे . व्यायाम फार करु नये आणि पौष्टिक पदार्थ खावे .
आता जो दोन्ही प्रकारचे ( म्हणजे कफकारक व वातुळ ) पदार्थ एकदेशीय न खाता फार स्निग्ध नाहीत व फार रुक्षही नाहीत . असे मध्यम प्रकारचे पदार्थ सेवन करितो . त्यामुळे त्याचा अन्नरस सर्व शरीरात संचार करीत सर्व धातुंचे सारखे पोषण करितो . त्यामुळे त्या मनुष्याचे शरीरात सर्व धातू समप्रमाणात असल्यामुळे तो फार स्थूल नाही व फार कृश नाही अशा मध्यम शरिराचा असतो . व तो कोणतेही काम करण्यास समर्थ असतो . भूक , तहान , थंडी , उष्ण , पाऊस , ऊन ही सहन करण्याचे त्याला सामर्थ्य असते आणि तो बलवान असतो म्हणून अशा प्रकारचा आहार विहार वगैरे विधि ( स्वस्थवृतानुवर्तन ) नित्य आचरणांत ठेवावा ॥३५॥३७॥
स्थूल व कृश अशी दोनीही प्रकारची माणसे नेहमी निंद्यच समजावी . आणि मध्यम बांद्याचा जो मनुष्य तो श्रेष्ठ ( उत्तम ) समजावा . आणि कृश मनुष्य मात्र त्यातल्या त्यात स्थूलापेक्षा बरा म्हणावा .
वातादि दोष हे प्रकुपित झाले असता ते आपल्या सामर्थ्याने रसादि धातूंचा क्षय करितात . जसा प्रदीप्त असलेला अग्नि चुलीवर असलेल्या स्थालीतील ( पाकपात्रातील ) पाणी आटवून टाकतो त्याप्रमाणे वातादि दोघेही धातूंचे शोषण करितात .
सर्वांची शरीरे एकच लक्षणात्मक नाहीत . प्रत्येकात काही तरी फरक आहेतच . अशा विलक्षण स्थितीमुळे व त्याचप्रमाणे नित्य बदलणारे कालमान व वयोवस्था ह्याजवर दोषधात्वादिकांचे प्रमाण कमी जास्त होत असल्यामुळे , शरीराला दोष , धातु व मल ह्यांचे परिणाम निश्चित असत नाही .
दोषधातु व मल इत्यादिकांचे साम्य म्हणून वैद्य जे ठरवितात ते मनुष्याच्या प्रकृतीच्या स्वास्थावाचून दुसर्या कोणत्याही कारणावरुन एकच नियमाने सांगता येणे शक्य नाही . ( म्हणजे प्रकृति निकोप असली म्हणजे साम्य आहे . नसली तर नाही ॥३८॥४४॥
म्हणून ह्या वातादि दोषांची असमता ( म्हणजे न्यूनाधिक भाव ) वैद्याने केवळ अनुमानानेच अवलोकन करावी . चेहरा सुप्रसन्न नसला की कुशल वैद्याने ह्याच्या प्रकृतीत दोषादिकांचे साम्य नाही असे समजावे .
ज्याच्या प्रकृतीला स्वास्थ्य ( आरोग्य ) आहे त्याचे ते आरोग्य कायम राहील असा प्रयत्न करावा . आणि ज्याची प्रकृती बिघडली असेल त्याच्या रोगाची परिक्षा करुन , त्याचे दोषधातु व मल ह्यांच्या स्थितीप्रमाणे ( न्यूनाधिक्याप्रमाणे ), बृहण ( पौष्टिक ) किंवा कर्षण ( त्यांना कमी करणारी ), योग्य ती चिकित्सा करावयाची ती त्याचा रोग नाहीसा होईपर्यंत करावी . हेच दोषादिकांच्या साम्यचे लक्षण समजावे .
ज्याचे वातादिदोष समान स्थितीत आहेत , जठराग्नी प्रखर किंवा मंद नसून मध्यम प्रमाणात आहे , तसेच रसादिधातु व मल ह्यांच्या क्रिया समान स्थितीत सारख्या चालाव्या तशा चालू आहेत , ज्याचा चेहरा , नेत्र विकार वगैरे इंद्रिये व मन ही सुप्रसन्न आहेत अशा मनुष्याला " स्वस्थ " म्हणजे निरोगी असे म्हणतात ॥४५॥
अध्याय पंधरावा समाप्त