अध्याय तिसावा
आता ‘‘पंचेन्द्रियार्थ विप्रतिपत्ति ’’ नावाचा अध्याय जसा भगवान धन्वंतरींनी सांगितला आहे तसा सांगतो ॥१ -२॥
मनुष्याच्या शारीरिक व मानसिक प्रकृतिस्वभावजन्य धर्मामध्ये बिघाड किंवा विपरीतपणा दिसून आला असता त्याला थोडक्यात अरिष्ट (मृत्युसूचक चिन्हे ) असे म्हणतात . त्याचे आता सविस्तर वर्णन सांगतो ते लक्षात ठेवा ॥३॥
स्वर्गीय सिद्ध , किन्नर , गंधर्व , अप्सरा इत्यादी देवगण सन्निध नसताना त्यांचे नृत्यगीतादि नाना प्रकारचे शब्द जो ऐकतो , त्याचप्रमाणे समुद्रांच्या लाटांची गर्जना , ग्रामवासी पशुपक्ष्यादिकांचे शब्द व मेघांचा गडगडाट हे ध्वनी देखील आसपास कोठे नसताना ज्याला ऐकू येतात , अथवा हे समुद्रमेघादिकांचक ध्वनी सन्निध होत असूनही ते ऐकू न येता भलतेच आवाज कानावर येत आहेतसे वाटते , ग्राम्य पशुपक्ष्यांचे शब्द होत असता ते आरण्यवासी पशुपक्ष्यांच्या आवाजासारखे ज्याला वाटतात , शत्रूने जर काही गोष्टी सांगितल्या तर त्या त्याला बर्या वाटतात आणि जिवलग मित्राने जर काही सांगितले तर त्यावर तो रागावतो आणि अकस्मात ज्याला ऐकू येईनासे होते तो ‘‘गतायु ’’ समजावा .
ज्याला थंड पदार्थ उष्ण भासतात किंवा उष्ण पदार्थ थंड भासतात , तसेच कफदोषामुळे थंड अशा पुटकुळ्य़ा अंगावर उठल्या असूनही ज्याच्या अंगाचा दाह होतो , तसेच अंग अतिशय कढत लागत असूनही जो थंडी वाजते म्हणून थर थर कापतो , काठीचा वगैरे आघात शरीरावर झाला असता तो ज्याला कळत नाही , अथवा एकादा अवयव छेदन केला असताही ज्याला तो समजत नाही . तोही ‘‘गतायु ’’ समजावा .
ज्याला आपली सर्व गोत्रे धुळीने माखल्यासारखी वाटतात अथवा ज्याच्या शरीराचा वर्ण पालटतो किंवा अंगावर निळ्या पिवळ्या रेषा दिसतात तोही गतायु समजावा .
स्नान करून सुवासिक गंध अंगास लेपन केला असताही ज्याच्या अंगावर निळ्य़ा रंगाच्या माशा सारख्या बसत असतात , त्याचे आयुष्य संपले आहे असे समजावे . (हे चिन्ह त्वचेच्या माधुर्याने आहे . ह्याची मुदत एक वर्षपर्यंत असते . हे चिन्ह बहुतेक मधुमेही मनुष्याला संभवनीय दिसते .)
सुवासिक अत्तर वगैरे न लावताही ज्याच्या अंगास अकस्मात् अत्यंत सुवास येतो त्याचे आयुष्य संपले आहे असे वैद्य म्हणतात .
ज्याला पदार्थाची चव विपरीत वाटते म्हणजे आंबट पदार्थ गोड अगर खारट भासतो , तसेच दोषाच्या अनुरोधाने जर त्याला गोड , आंबट वगैरे रसांची योजना केली तर त्यापासून त्याच्या दोषांची वाढच होते . म्हणजे पित्तविकार आहे म्हणून गोड (मधुर ) रस जर त्याला खाण्यास दिला तर त्याने पित्त कमी न होता उलट वाढतेच , त्याचप्रमाणे दोषाविरूद्ध रसाची योजना केली असता त्याने दोषसाम्य राहते , किंवा ज्याला पदार्थाची रुचीच समजत नाही त्याचे आयुष्य संपले म्हणून समजावे .
ज्याला सुगंधी पदार्थांची घाण येते व दुर्गंधयुक्त पदार्थ सुवासिक आहे तसे वाटतात , किंवा काहीतरी भलताच वास आहेसा वाटतो , तसेच दिवा शांत केला असता त्याची घाण ज्याला येत नाही अगर निरोगी असून (पीनस वगैरे नसून ) ज्याला कसलाच वास समजत नाही , त्याचे आयुष्य संपले आहे असे समजावे .
थंड व ऊन , वगैरे विरूद्ध गुणांच्या दोन दोन पदार्थांच्या जोड्या , उन्हाळा , पावसाळा , किंवा सकाळ , संध्याकाळ वगैरे , कालाच्या अवस्था आणि दिशा हे जो विरूद्ध (उलट रीतीने ) मानतो , म्हणजे थंडपदार्थ ऊन भासतो , उन्हाळा असला तर पावसाळा भासतो , प्रातःकाळ असल्यास सायंकाळ वाटते , पूर्वदिशा असताना पश्चिम वाटते व याचप्रमाणे इतरही द्रव्ये त्यांचे गुण व कार्ये जी असतात त्याच्या जो मानतो त्याचे आयुष्य संपले आहे असे समजावे ॥४ -१४॥
जो दिवस आकाशात प्रज्वलित झालेला दिवा पाहतो ; त्याला रात्रीच्या वेळी सूर्य उगवला आहे असे वाटते किंवा दिवसा सूर्यचंद्राप्रमाणे उजेड दिसतो . आकाशात मेघ नसताना ज्याला इंद्रधनुष्य व वीज चमकतेशी वाटते ; स्वच्छ आकाशात ज्याला काळे ढग व त्यात वीज चमकलेली दिसते ,य (ह्या चिन्हाची मुदत तीन महिने असते .) विमाने व इतर याने (मेणी , पालख्या वगैरे ) व मोठमोठे राजवाडे ह्यांनी आकाश व्याप्त झाले आहे असे जो पहातो ; जो आकाशात वायूचे मूर्त स्वरूप पहातो ; ज्याला जमीन किंवा प्रदेश धुराने किंवा धुक्याने व्याप्त आहे असे वाटते अथवा तिजवर वस्त्राचे आच्छादन आहे असे वाटते ; ज्याला सर्व जग पेटल्याप्रमाणे किंवा पाण्यात बुडल्याप्रमाणे वाटते , ज्याला पृथ्वी अष्टदलाकृती व रेषांनी व्याप्त दिसते ; ज्याला आकाशातील नक्षत्रे , अरुंधतीचा तारा , ध्रुवनक्षत्र व आकाशगंगा ही रात्री आकाशात दिसत नाहीत त्याचे आयुष्य संपले आहे . म्हणून समजावे .
चांदण्यात अथवा उन्हात ज्याला आपली छाया दिसत नाही , तसेच ज्याला आरशात अगर पाण्यात आपले प्रतिबिंब दिसत नाही ; तसेच ती उन्हातील छाया अगर पाण्यातील वगैरे प्रतिबिंब दिसलेच तर त्यात एकादा अवयव अजिबात दिसत नाही अथवा विद्रूप दिसतो अगर दुसर्याच एकाद्या प्राण्याची छाया किंवा प्रतिबिंब असलेले दिसते , तसेच
कुत्रा , कावळा , कंकपक्षी , गिधाड , पिशाच्च , यक्ष , राक्षस ह्यांच्या आकारासारखी छाया किंवा प्रतिबिंब दिसते ; त्याचप्रमाणे पिशाच्च , सर्प , हत्ती व भूत ह्यांच्यासारखे काहीतरी विद्रूप दिसते तो गतायु समजावा .
तसेच ज्याला अग्नी मोराच्या कंठाप्रमाणे नीलवर्ण व निर्धूम दिसतो , तो आजारी असेल तर त्याला मृत्यु व निरोगी असल्यास तो आजारी होतो ॥१५ -२३॥