अध्याय सव्विसावा
आता ‘‘प्रनष्टशल्यविज्ञानीय ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे त्याप्रमाणे सांगतो ॥१ -२॥
‘ शल ’ आणि ‘ श्वल ’ हे दोन धातु त्वरिगतिवाचक आहेत . त्यापैकी पहिल्या ‘ शल ’ या धातूपासून ‘ शल्य ’ असे रूप झाले आहे . कित्येक ‘ शल ’ धातूचा अर्थ हिंसा करितात व कित्येक ‘ शल ’ धातूचा अर्थ पीडा करणे असा करितात .
ते शल्य शारीरिक व आगंतुक असे दोन प्रकारचे आहे ,
सर्वांगाला बाधा (पीडा ) करणारे जे शल्य त्या संबंधाने माहिती ह्या तंत्रात सांगितली आहे , म्हणून याला शल्यशास्त्र (शल्यतंत्र ) असे म्हटले आहे .
केस , नखे वगैरे पदार्थ त्याचप्रमाणे दूषित झालेले रसादि धातू , अन्नादिकांचा मल व दूषित झालेले वातादि दोष या सर्वांना शारीरिक शल्यं म्हणतात . या शारीरिक शल्याव्यतिरिक्त जे जे म्हणून पदार्थ शरीराला पीडाकारक होतात त्या सर्वांना आगंतुक शल्य असे म्हणतात .
तथापि लोखंड , वेळु , गवत , शिंगे व हाडे यांच्या पदार्थांना आगंतुक शल्य म्हणणे अधिक योग्य दिसते . आणि त्यांतहि विशेषतः लोखंडाला शल्य म्हणणे विशेष योग्य आहे . कारण युद्धामध्ये वगैरे शत्रूला मारण्याकरिता जी हत्यारे करितात ती लोखंडाचीच करितात म्हणून , त्या लोखंडाच्या पदार्थांमध्ये देखील बाण हा मुख्य शल्य आहे कारण बाण हा निवारण करण्यास फार कठीण , अत्यंत अणकुचीदार अग्राचा व लांबून मारता येणारा असा असतो . त्याचे दोन प्रकार आहेत . एक कर्णी (ज्याला कान आहे तो ) व श्लक्ष्ण (ज्याला कान नाही तो ) या बाणांच्या नाना तऱ्हेच्या आकृति असतात , त्यात काही बाण अनेक प्रकारच्या झाडाच्या , पानांच्या , फुलाच्या किंवा फळांच्या आकाराच्या तोंडाचे असतात . आणि काही वाघ , सिंह , हिंसक पक्षी यांच्या तोंडाच्या आकाराचे असतात .
शल्य मोठे असो अगर बारीक असो त्याच्या पांच प्रकारच्या गति संभवतात . १ ऊर्ध्वगति (खालून वर जाणार्या बाणाप्रमाणे ), २ अधोगति (वरून येणार्या बाणाप्रमाणे ) ३ अर्वाचिन गति (पाठीमागून पुढे येणार्या बाणाप्रमाणे ), ४ तिर्यक्गति (बाजूने येणार्या बाणाप्रमाणे ) आणि जुगति (समोरून येणार्या बाणाप्रमाणे ,) अशा पांच गति आहेत .
ही शल्ये शरीरात घुसताना त्याचा वेग कमी झाल्यामुळे किंवा त्यांचे निवारण करण्याकरिता त्यांच्यावर प्रतिघात केल्यामुळे त्वचा वगैरे (मांस , शिरा , स्नायु , सांधे , कोठा , अस्थि व मर्मस्थाने ) व्रणस्थानी घुसून बसतात . किंवा धमनी , स्त्रोतसे (मलाचा मार्ग ), हाडाची पोकळी व मांसपेशी वगैरे शरिराच्या भागात शिरून राहतात ॥३ -९॥
आता त्या त्वचादि व्रणस्थानी शल्य जाऊन बसले असता त्याची क्रमाने लक्षणे सांगतो ती ऐक . ही शल्याची लक्षणे सामान्य व विशेष अशी दोन प्रकारची आहेत . त्यांपैकी लक्षणे -जो व्रण निळसर रंगाचा बारीक पुटकुळ्यांनी व्याप्त , सूज व वेदनानी युक्त , वरचेवर रक्त वाहात असलेला , आणि ज्याच्यावर बुडबुड्यांप्रमाणे उंच व मृदु मांस आले आहे असा व्रण असला म्हणजे तो शल्ययुक्त आहे (त्यामध्ये शल्य आहे ) असे समजावे . आता विशेष लक्षणे सांगतो . शल्य त्वचेत असले तर त्वचेचा वर्ण बदलतो आणि त्वचेला लांबट व कठीण अशी सूज येते . मांसगत झाले असता बरीच सूज येते , शल्य शिरलेले छिद्र भरून येत नाही , आसपास दाबले असता सहन होत नाही , ओढ लागल्यासारखी पीडा व व्रण पिकणे ही लक्षणे होतात . पेशीमध्ये (मांसावरणामध्ये ) शल्य राहिले असताही अशीच लक्षणे होतात पण त्यापैकी ओढ लागणे व सूज ही दोन लक्षणे नसतात . शिरेमध्ये शल्य असता शिरा फुगतात , दुखतात व त्या सुजतात . स्नायुमध्ये शल्य असता स्नायुचा पुंजका वर येतो व त्या ठिकाणी सूज व तीव्र वेदना असतात . स्रोतसांमध्ये शल्य असता त्या त्या रसादि वाहक स्रोतसांची कामे (ज्यात शल्य असेल त्याची ) बंद पडतात व वातादिवह स्रोतसांची कामे (ज्यात शल्य असेल त्याची ) बंद पाडतात व वातादिवह स्रोतसांचे ते तांबुस , पिवळे , पांढरे व तांबडे रंग ते बदलतात . धमनीमध्ये शल्य घुसले तर जखमेतून फेसाळ रक्त येते आणि वायु शब्दयुक्त बाहेर येतो ह्या शिवाय अंग दुखणे , तहान व मळमळ हे विकार होतात . हाडात शिरले असता नाना प्रकारच्या वेदना व सूज असते . हाडाच्या पोकळीत शल्य असता हाडे भरल्या सारखीच वाटणे , हाडात टोचल्यासारखी पीडा , अंगावर अतिशय काटा येणे , व सांध्याच्या ठिकाणी शल्य असता अस्थिगत शल्याची लक्षणे होतात व सांध्याची हालचाल बंद होते . कोष्ठगत शल्य असता वाताच्या क्षोभाने पोटात शल्य पोटात शूल , गुडगुड , स्तब्ध होणे , मलमूत्रदिकांचा अवरोध व जखमेतून अन्न व मलमूत्र ही बाहेर आलेली दिसतात . मर्मस्थानी शल्य असता (मागील अध्यायात ) मर्माचा वेध झाला असता जो (भ्रमप्रलापादि ) लक्षणे होतात म्हणून सांगितले आहे ती लक्षणे होतात . शल्य जर अगदी लहान असेल तर ही लक्षणे त्या मानाने अल्प किंवा फारच थोड्या प्रमाणात होतात .
जर एकाद्याची प्रकृति निकोप असेल (वातादि दोघांनी दूषित नसेल )तर त्याच्या देहापैकी गळा स्रोतसे , शिरा , त्वचा , पेशी व हाडाची पोकळी ह्या भागामध्ये रोमरंध्राच्या मार्गाने एकादे लहान किंवा मोठे शल्य सरळच घुसुन राहिले असेल तर ते आत असूनही बाहेरून व्रण भरून येऊन बरा होतो . असे निरुपद्रवी शल्य आत असले तरी काय दोष ? ह्यावर उत्तर सांगतात की , पुढे केव्हा तरी शरीरात दोषप्रकोप झाला किंवा व्यायाम , अभिघात (धक्का लागणे ) अजीर्ण वगैरे कारणाने ती शल्ये जर ठिकाणाहून हालली तर पुनः पीडा करितात ॥१० -११॥
त्वचेमध्ये शल्य अदृश्य होऊन राहिले असल्यास माती , उडदाचे पीठ , सातूचे पीठ , गव्हाचे पीठ व शेण हे जिन्नस एकत्र तयार करून प्रथमतः त्या त्वचेवर तेल लावून
वाफारा द्यावा ; आणि मग ह्या औषधाचे वर सांगितल्याप्रमाणे तयार केलेले चूर्ण त्या ठिकाणी घासावे म्हणजे त्वचेवर ज्या ठिकाणी तांबुस सूत्र अगर वेदना झाल्याचे आढळेल त्या ठिकाणी शल्य आहे म्हणून समजावे .
अथवा अतिशय घट्ट तूप , माती व चंदनाचे चूर्ण ह्यांचा कल्क त्वचेवर लावावा . जर त्वचेत शल्य असेल तर त्याच्या उष्णतेने तूप पातळ होऊन निघेल अगर लेप सुकेल . असे ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी शल्य आहे असे समजावे . मांसामध्ये शल्य अदृश्य असता रोग्याला आपाय होणार नाही अशा बेताने त्या ठिकाणी विशेष रीतीने तेल लावून वाफारा वगैरे द्यावा , म्हणजे त्या स्नेहस्वेदनाने तो मनुष्य थोडा कृश होईल व मांसातील शल्य सैल होऊन ठिकाणाहून हालेल . ते आत हालल्यामुळे क्षुब्ध होऊन वरच्या भागी तांबुस सूज व वेदना करू लागले म्हणजे त्या ठिकाणी शल्य आहे म्हणून समजावे . कोठा , हाडे , सांधे , पेशी (मांसावरण ) व हाडांची वगैरे पोकळी ह्या ठिकाणी गुप्त असलेले शल्य ह्याच रीतीने ओळखावे . शिरा मज्जारज्जू , स्रोतसे व स्नायू ह्यामध्ये शल्य गुप्त असेल तर अर्धवट मोडक्या चाकाच्या गाडीत त्या रोग्याला बसवून खाचखळगे व चढउतार असलेल्या रस्त्याने गाडी पळवावी , म्हणजे ज्या ठिकाणी तांबूस सूज व वेदना होतील त्या ठिकाणी शल्य आहे असे समजावे . हाडामध्ये शल्य गुप्त असल्यास त्या ठिकाणी तेल लावून वाफारा वगैरे देऊन ज्या ठिकाणी शल्याचा संशय असेल तेथील हाडे घट्ट बांधून व जोराने दाबून चेपावी व ज्या ठिकाणी तांबूस सूज व वेदना होतील तेथे शल्य आहे असे समजावे . सांध्यामध्ये शल्य गुप्त असेल तर त्या सांध्याच्या ठिकाणी लेपन व वाफारा देऊन नंतर सांधा आखडणे , लांबविणे ह्या क्रिया बराच वेळ सारख्या कराव्या व पुनः सांधा घट्ट बांधून जोराने दडपून चेपावा ; ज्या ठिकाणी वेदना व तांबुस सूज दिसेल त्या ठिकाणी शल्य आहे असे समजावे . मर्मस्थानी शल्य गुप्त असल्यास मर्मेही त्वचा वगैरे जी व्रणाची आठ स्थाने सांगितली आहेत त्यांना सोडून नाहीत , म्हणून त्वचा वगैरे स्थानातील गुप्त शल्यसंबंधाने आता जे जाणण्याचे उपाय सांगितले आहेत तेच उपाय त्या त्या स्थानासंबंधी शल्य जाणण्यास सांगितल्यासारखेच आहेत . त्या उपयांनी त्यांची परीक्षा करावी ॥१२॥
शल्य जाणण्याची सामान्य लक्षणे
त्वचादि आठही व्रणस्थानी गुप्त शल्य असता त्याचे सामान्य लक्षणः -हत्तीच्या गंडस्थळावर बसून किंवा घोड्यावर बसून फिरणे , डोंगर चढणे , झाडावर चढणे , धनुष्य ओढण्याचा व्यायाम करणे , जलद जाणार्या वाहनात बसणे , कुस्ती करणे , मागे चालणे , उडी मारून ओलांडून जाणे , नदी वगैरे पोहून पलिकडे जाणे , उंचावरून उडी मारणे , श्रम करणे , तसेच जांभई ढेकर , खोकला , शिंका ह्यांचे वेग , थुंकणे , हसणे , श्वासाचा अवरोध करणे , मलमूत्र व शुक्र वेगाने सुटणे इत्यादि शरीराच्या ज्या भागी सूज येऊन ती जागा थोडी लाल होईल किंवा त्या ठिकाणी वेदना होतील तर त्या ठिकाणी शल्य आहे असे समजावे ॥१३॥
गुप्त ज्ञानासंबंधी आणखी उपाय
शरीराच्या ज्या भागी आतमध्ये टोचल्यासारखे होते , वरील त्वचा बधीर असते (स्पर्श कळत नाही ), तो भाग जड वाटतो , रोगी त्या भागी वरचेवर चोळतो किंवा हालवितो , जखमेतून केव्हा स्रावही होतो ठणका लागतोव रोगी चालताना त्या भागाला धक्का वगैरे लागू नये म्हणून सारखे जपत असतो . त्या भागात शल्य आहे असे समजावे ॥१४ -१५॥
शल्य नसल्याची लक्षणे
व्रण फारसा दुखत नाही , सूज नसते , वेदना , ठणका वगैरे नसतो , दुसरेही काही उपद्रव नसतात , शुद्ध व स्वच्छ दिसतो . भोवतालच्या कडा मऊ असतात , त्यांत उंचसखल भाग नसतो , तो फार कठीण किंवा आकसलेला नसतो . (निराघट्ट ), एषणी (शलाका ) घालून पाहिले असता तिला कोठे अडखळा नसतो (तिचा मार्ग मोकळा असतो ) आणि सांधे मागेपुढे करताना जर थोडी देखील पीडा होत नसेल तर त्या व्रणात वैद्याने शल्य नाही म्हणून सांगावे .
व्रणात जर हाडाचे शल्य असेल तर काही हाडांची शल्ये फुटून त्यांचे तुकडे होतात , आणि काही हाडांचा चूर होऊन ती विरून जातात . शिंगाचे किंवा लोखंडाचे शल्य असल्यास ते वाकते .
झाडासंबंधी , वेळूचे व गवताचे शरीरात असलेले शल्य जर काढले नाही तर ते रक्ताचा व मांसाचा त्वरित पाक (पू ) करिते . (आणि त्या पुवामधून ते आपोआप निघूनही जाते . ह्यासाठी अशी शल्ये काढली असता रोग्यांच्या जीवाला अपाय होईल अशा ‘‘शल्य प्राणहर ’’ मर्माच्या ठिकाणी ती असतील तर ती काढण्याचा प्रयत्न करू नये .)
सोने , रूपे , तांबे , पितळ किंवा कासे , कथील व शिसे ह्यांची शल्ये शरीरात जर फार दिवस राहिली तर ती शरीरातील पित्तरूप अग्नीच्या उष्णतेने आपोआप विरघळून जातात . म्हणून अशी शल्येही ‘‘विशल्यप्राणहर ’’ मर्माचे ठिकाणी तशीच राहिली तरी तो दोष होत नाही . (श्लोकात ‘‘रौतिक ’’ ह्या ठिकाणी ‘‘कृष्णायः ’’ पद आहे त्याचा अर्थ पोलाद असा आहे .)
तसेच स्वभावतःच शीत व मृदु अशी जी (निरुपद्रवी ) द्रव्ये त्यांचे शल्य , किंवा वरील सुवर्णादि धातुसारखे (निरुपद्रवी ) दुसरे जे पदार्थ त्यांचीही शल्ये शरीरात राहिली असता , वरीलप्रमाणेच पित्ताच्या उष्णतेने वितळून शरीरातील रसादि धातूंशी मिसळून तद्रूप होऊन जातात .
शिंगे , दात , केस , हाडे , वेळु , लाकूड , धोंडा ह्यांची व मातीची शल्ये शरीरामध्ये विरत नाहीत .
ह्याच अध्यायात आरंभी सांगितलेले शल्याचे मुख्य दोन प्रकार (शारीरिक व आगंतुक तसेच कर्णी व श्लक्ष्ण ) आणि त्यांच्या (वर खाली वगैरे प्रकारच्या ) पाचगति आणि त्वचादि व्रणस्थानामध्ये गुप्त असणारे शल्याचे ज्ञान ही ज्याला बिनचूक कळतात तो वैद्य राजाला देखील औषधोपचार करण्यास योग्य होतो ॥१६ -२६॥