मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
मिश्रक

सूत्रस्थान - मिश्रक

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय सदतिसावा

आता ‘मिश्रक ’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरीनी सांगितले आहे ॥१ -२॥

महाळुंगाचे मूळ , टाकळीचे मूळ , देवदार , सुंठ , फणीनिवडुंग किवा जटामांसी व रास्ना ह्या औषधाचा लेप वातजन्य (व्रणासंबंधी आरंभीची ) सुजेचा नाश करितो .

दुर्वा , नलमूळ (देवनळाचे मूळ ), जेष्ठमध , तांबडा व पांढरा चंदन आणि काकोल्यादिगण , उत्पलादिगण व न्यग्रोधादिगण ह्या गणातली सर्व औषधे (म्हणजे सर्व शीतळ

औषधे (म्हणजे सर्व शीतळ औषधे ) ह्या औषधाचा लेप पित्तजन्य सुजेचा नाश करितो . ही औषधे सर्व न मिळाली , तर मिळतील तेवढी घेतली तरी चालतील ).

आगंतुक व्रणाच्या सुजेवर व रक्तजन्य सुजेवर हाच लेप करावा . विषजन्य सुजेवर कल्पस्थानात सांगितलेल्या विषघ्न औषधांचा लेप करावा अथवा वरील पित्तजन्य सुजेवरील औषधांचा लेप केला तरी हितकारक आहे .

रान तुळस , अश्वगंधा , पाषाणभेद (किंवा काळे निशोत्तर ), तांबडे निशोत्तर , पांढरे निशोत्तर व मेढशिंगी ह्या औषधांचा लेप कफजन्य सुजचा नाश करितो .

वातजन्य सुजेवर लेप करिताना वरील औषधांच्या (वातशोथावरील ) कल्कात ताक किंवा कांजी वगैरेपैकी एखादा आंबट पदार्थ , स्निग्धपणाकरिता शिरसाचे वगैरे तेल व सैंधव मिश्र करून साधारण कोमट असा लेप करावा तसेच पित्तजन्य सुजेवर लेप करावयाचा तो वरील पित्तशोथावर सांगितलेली औषधे दुधाने वाटून त्याचा थंडगार असा लेप करावा , आणि कफजन्य सुजेवर लेप करिताना कफशोथावर सांगितलेल्या औषधांचा गोमूत्रात कल्प करून त्यात जवखार घालून , त्याचा लेप करावा ; म्हणजे त्या त्या दोषापासून आलेली सूज शांत होते .

तागाचे बी , मुळ्य़ाचे बी , शेवग्याचे बी , तीळ व शिरस , सातु (अथवा सातु , गहु वगैरे धान्यांपैकी एखादे भाजून त्याचे पीठ ), दारू तयार झाल्यावर ती काढून घेऊन खाली राहिलेला चोथा (राब -किण्व ), जवस ही द्रव्ये व कोष्ठ अगर उष्ण वगेरे द्रव्ये ही पाचन (सुजेला पिकविणारी ) आहेत .

मोठ्या करंजाचे मुळ , कळलावी अथवा बिव्वा , दांतीतूळ किंवा जेपाळाचे बी , चित्रकमूळ , कण्हेरीचे मूळ , पारवा , गिधाड किंवा ककपक्षी ह्यांची विष्ठा , क्षारद्रव्ये (मोरवा , कुडा , पळस , राळेचे झाड व पांगारा वगैरे ) किंवा ह्या द्रव्याचे काढलेले क्षार ही औषधे लेपाने व्रणाच्या सुजेचे दारण करितात (फोडतात ) त्यापैकी पारवा वगैरे पक्ष्यांच्या विष्ठा ह्या सौम्य असून क्षार हे तीक्ष्ण आहेत .

शेवरी भोकर व वड वगैरे बुळबुळित वनस्पतीची पाने अगर साली आणि सातु , गहु , उडीद ह्यांचे पीठ ह्यांचा कल्क पीडन करणारा आहे . (पीडन करणारा म्हणजे व्रणाचे तोंड मोकळे ठेऊन वरील औषधांचा लेप सभोवार करावा व तो वाळवावा . वाळला म्हणजे शोथाचे पीडन होते ; म्हणजे त्याच्या छिद्रातून घाण बाहेर पडते .)

सांखवेल (हिची पाने मोठी असून त्यातून दूध निघते ), अंकोलाचे मूळ अगर पाने , जाईचा पाला , सूर्यफुलाचे झाड आणि आरग्वधादि गणातील औषधे ह्यांचे काढे व्रणाचे शोधन करणारे आहेत .

रान तुळस , मेढशिंगी , कडु इंद्रावण , कळलावी , घाणेरा करंज , चित्रक पहाडवेल , वावडिंग , एलवालुक , (एळयाबोळ ), रेणुकवीज , सुंठ , मिरे पिवळी जवखार , सैंधव संचळ , बिडलोण , मीठ , सांबरलोण , मनशीळ , हिराकस , निशोत्तर , दांतीमूळ , हरताळ , तुरटी , ही द्रव्ये नाडीव्रणाच्या शोधनार्थ ज्या वाती घालितात त्यांच्या उपयोगी आहेत .

रानतुळस वगैरे औषधांचे कल्क करून तेही संशोधनार्थ लेपाच्या उपयोगात आणावे .

तसेच ही रानतुळस वगैरे वरील औषधे आणि हिराकस , कुटकी , जाईच्या मुळ्य़ा हळद व दारुहळद ह्या औषधांचा कल्क व कषाय ह्यांच्या संयोगाने तेल किंवा तूप यथाविधि तयार करून त्यांचाही शोधनाच्या कामी उपयोग करावा .

रुईचे मूळ , हिरडा , बेहडा , आवळाकाठी , त्रिधारी निवडुंगाचा चीक , (अभावी शेंडाचा चीक ), चांगल्या क्षाराची मूळद्रव्ये मोरवा , कुडा वगैरे , जाईचे मूळ , हळद , दारुहळद , हिराकस व कुटकी ही औषधे व रान तुळस वगैरे तेराचौदा श्लोकातील औषधे ह्यांचा कल्क व काढा तुपाच्या अनुक्रमे चतुर्थांश व चौपट घालून तूप तयार करावे . हेही व्रणाचे शोधन करणारे आहे .

आघाडा , बाहवा , कडुनिंब , कडु घोसळीचा वेल , तीळ , डोरली , रिंगणी , हरताळ व मनशील्क ही द्रव्ये व रान तुळस वगैरे शोधनद्रव्ये (वर सांगितलेली ) ह्याचा कल्क व काढा ह्यामध्ये वरील तुपाप्रमाणे विधियुक्त तेल सिद्ध करावे . तेही शोधन करणारे आहे .

हिराकस , सैंधव , दारूचा खालचा राब , वेखंड , हळद आणि दारुहळद ह्यांपैकी प्रत्येक जिन्नस व मागे सांगितलेली रानतुळस वगैरे शोधनकारक औषधे ह्यांची निरनिराळी चूर्णे करून ठेवावी , तीही व्रणावर पसरली असता व्रणाचे शोधन करितात . हिराकस वगैरे सर्वही औषधे एकत्र करून चूर्ण एकत्र केले तरी चालेल .

सालसारादि गणातील (सागवान वगैरे ) वृक्षांची खोडे , कडु पडवळ व त्रिफळा (हिरडा , बेहडा , आवळाकाठी ) ह्या औषधांचा सोळापट पाणी घालून अष्टमांश काढा करावा . नंतर तो काढा फडक्याने गाळून घेऊन पळीला चिकटेपर्यंत म्हणजे काकवीसारखा दाट होईपर्यंत आटवावा . ह्या कृतीला रसक्रिया म्हणतात . ही (शोधनकर्मात व्रण शोधनार्थ ) योजावी ॥३ -२१॥

विशेष धूप ही सुरूच्या जातीच्या एका झाडाचा डिंक असून तो लोण्याच्या गोळ्यासारखा मऊ असतो . त्याला गंधाविरोदा म्हणतात . (डल्लणाच्या मताने गुग्गुळ आहे .) राळ , सुरूच्या झाडाची साल , देवदाराचे लाकूड , आणि सालसारादि गणातील झाडाची लाकडे ह्यांच्या चूर्णाची व्रणाला धुरी द्यावी .

वड , उंबर , पिंपळ , पिंपरणी , नांदरुख वगैरे क्षीरवृक्षांच्या सालीचा , फार ऊन नाही असा , काढा करून त्या काढ्याने किंवा तोच काढा थंडगार करून त्याने व्रणरोपण होण्याकरिता (व्रण भरून येण्याकरिता ) व्रण धुवावा .

सोमवल्लीची (रान शेराची साल ) किंवा ब्राह्मी , गुळवेल , अश्वगंध , काकोल्यादि गणातील औषधे आणि वड , उंबर वगैरे क्षीर वृक्षाच्या झाडाच्या पानाचे कोवळे अंकूर ह्या औषधाचा कल्क करून त्यांच्या वाती व्रणरोपणाकरिता योजाव्या .

लाजाळु , सोमवल्ली किंवा ब्राह्मी अगर कापूर , सरळ देवदार किंवा निशोत्तर , कायफळ , रक्तचंदन , आणि काकोल्यादि गणातील औषधे ह्यांचा कल्क (मलम ) व्रण भरून आणणारा आहे .

पिठवणीचे मूळ , कुहिलीचे मूळ , हळद , दारुहळद , जाईचे मूळ , खडीसाखर किंवा श्वेतदूर्वा आणि काकोल्यादि गणातील औषधे ह्यांचा कल्क व काषाय (काढा ) ह्यांच्या संयोगाने तूप सिद्ध करावे ; ते व्रण भरून आणते .

तगरमूळ , कृष्णागर , हळद , दारुहळद , देवदार , गहुला , लोध्र , ह्या औषधांचा कल्क व काढा ह्यांमध्ये तेल सिद्ध करावे व ते व्रणरोपणार्थ योजावे किंवा त्या औषधाचे चूर्ण करून तेलात मलम करून ते योजावे तेही व्रणाला भरून आणिते .

गहुला , त्रिफळा , लोध्र , हिराकस , मुंडी (गोरखमुंडी ) धावडा व राळेचे झाड ह्यांची साल , ह्या औषधांचे चूर्ण व्रणाचे रोपण करणारे आहे .

गहुला , पांढरी राळ , हिराकस , आणि धावड्याची साल , ह्यांचे चूर्णही व्रण भरून आणण्याच्या कामी प्रशस्त आहे .

न्यग्रोधादि (वड वगैरे ) गणातील झाडांच्या साली व त्रिफळा ह्यांचा काढा करून तो आटवून मागे सांगितल्याप्रमाणे रसक्रिया (काकवीसारखा दाट काढा ) करावी व तीही क्रमाने व्रणरोपणार्थ योजावी .

आघाड्याचे मूळ , अश्वगंध , मुसळीचे मूळ , सूर्यफुलाच्या झाडाचे मूळ आणि काकोल्यादि गणातील औषधे ह्यांचे चूर्ण करून ते अगर त्याचा कल्क व्रणावर लावावा , ते उत्पादन करण्याच्या कामी (व्रणात मांस भरून आणून त्याला त्वचेवर उचलून आणण्याच्या कामी ) उपयोगी आहे .

हिराकस , सैंधव , मद्याचा राब , कुरुंदाचा दगड , मनशीळ , कोंबड्याच्या , अंड्यांची कवचे , जाईच्या कळ्य़ा , शिरसवृक्षाची फळे , करंज्याची फळे (दोघांच्याही बिया ), हरताळ , मनशीळ , हिराकस , सुवर्णमक्षिक वगैरे धातूंची चूर्ण , ह्या औषधांचे चूर्ण व्रणामधील वर आलेले दोघी मांस काढून टाकण्याच्या कामी व्रणावर टाकण्यास उपयोगी आहे .

व्रणासंबंधी अष्टविधकर्माकरिता ह्या मिश्रकाध्यायात जे निरनिराळे वर्ग सांगितले आहेत , त्यातील औषधे मिळाल्यास सर्व घ्यावी हे उत्तम , सर्व न मिळाल्यास प्रसंग -विशेषी त्यातील अर्धी किंवा तीन , चार , पाच , सहा अशी जेवढी मिळतील तेवढी घेऊन चाणाक्ष वैद्याने आपल्या योजलेल्या कार्यात उपयोगात आणावी आणि हाच नियम ह्या पुढील द्रव्यांचे गुण , द्रव्यांचा संग्रह व संशोधन , संशमन ह्या तीन अध्यायाला आहे . त्यापुढील अध्यायांना मात्र नाही असे समजावे ॥२२ -३७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP