मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
विशिखानुप्रवेशीय

सूत्रस्थान - विशिखानुप्रवेशीय

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय दहावा

आता " विशिखानुप्रवेशीय " नांवाचा अध्याय जसे भगवान धन्वंतरीनी सांगितले आहे त्याप्रमाणे सांगतो ॥१॥२॥

आता ज्याने वैद्यकशास्त्राचे उत्तम अध्ययन केले आहे , शास्त्रासंबंधी व शस्त्रकर्मासंबंधी गुह्यज्ञान गुरुपासून करुन घेतले आहे , स्वतः आपल्या हाताने क्रिया करण्याचा चांगला अभ्यास केला आहे व ज्याला शास्त्रासंबंधी चांगला वादविवाद करता येतो किंवा दुसर्‍याला कळेल असे सांगता येते , ज्याने राजापाशी आपल्या विद्येची परीक्षा देऊन त्याची अनुज्ञा ( प्रमाण पत्र ) मिळविली आहे , अशा वैद्याने नेहमी नखे व केस फार वाढू देऊ नयेत . शुचिर्भूत असावे , शुभ्र पोषाख करावा . बाहेर जाताना छत्री व काठी हातांत असावी . पायांत जोडा घालावा , एकंदर पेहराव सभ्यपणाचा व नम्रतेचा असावा . मनाने सुप्रसन्न असावे . सर्वकाळ मंगलकारक व शुभ भाषण करावे . दांभिकपणा करु नये . सर्व प्राणिमात्रांशी बंधुभावाने वागावे . दुसर्‍यास सहाय्य करण्यास तत्पर असावे , अशा रितीने आचरण ठेऊन वैद्याने प्रत्यक्ष वैद्यकीय क्रिया करण्याचा मार्ग स्वीकारावा . ( हरणचंद्राच्या मताने " विशिखा " म्हणजे रुग्णालय त्या रुग्णालयात - हॉस्पिटलात प्रवेश करावा . " विशिखा " या शब्दाचा अर्थ प्राचीन कोशातून " रोग्याची खोली " असा आहे . म्हणून दोन्ही अर्थ संभवतात . )

ह्याप्रमाणे सर्व तयारी असल्यावर रोग्याकडून घरी नेण्याकरीता किंवा हकीकत सांगण्याकरिता आलेला मनुष्य शुभ लक्षणांनी युक्त आहे की नाही हे पहावे . त्या वेळेस होणारी चिन्हे अनुकूल - प्रतिकूल कशी होतात इकडे लक्ष ठेवावे . ह्या सर्व गोष्टी शक्य तोपर्यंत मंगलसूचक व प्रशस्त अशा पाहून रोग्याच्या घरी जावे . घरी गेल्यावर तेथे बसून रोग्याचे सूक्ष्मपणाने अवलोकन करावे . त्याला स्पर्श करुन काय काय भावना होतात त्या विचारुन घ्याव्या . रोग जाणण्याच्या अशा तिन्ही प्रकारांनी प्रायः रोगाचे ज्ञान करुन घ्यावे असे काही वैद्य म्हणतात पण ते योग्य नाही . रोगज्ञानाचे ज्ञान करुन घेण्याचे सहा उपाय आहेत ते असे - कान , नाक , जीभ वगैरे स्थाने तपासणे ही परीक्षा आपल्या डोळ्यांनी , कानांनी करणे हे पाच प्रकार व रोग्याला काय होते त्याची चौकशी अशा सहा साधनांनी रोगपरीक्षा करावी ॥३॥४॥

त्यापैकी कानाने ऐकून जी रोगाची विशेष लक्षणे जाणावयाची ती - जसे व्रणांतून येणार्‍या फेसयुक्त रक्ताला वायू प्रेरणा करुन आवाज करीत बाहेर येतो , वगैरे माहिती " व्रणस्त्रावविज्ञानीय " अध्यायात सांगण्यात येईल . स्पर्शेंद्रियाने जाणावयाची लक्षणे म्हणजे ज्वर किंवा सूज ह्यासारख्या रोगात रोग्याचे शरीर शीत आहे , उष्ण आहे , तुळतुळीत आहे , खरखरीत आहे . मृदु आहे अगर कठीण आहे हे समजून घ्यावयाचे . शरीराची स्थूलता , कृशपणा , आयुष्यासंबंधाची लक्षणे , हुषारी , अंगकांति व त्वचेचे खरुज वगैरे विकार हे डोळ्यांनी पाहून समजून घ्यावे . प्रमेहादिरोगात मूत्रादिकात माधुर्य वगैरे आहे की कसे ह्या गोष्टी रसनेंद्रियांच्या आहेत त्या इतर रीतीने म्हणजे रोग्याच्या आसपास किंवा मूत्रास वगैरे मुंग्या , माशा येतात किंवा कसे हे पाहून रसनेंद्रियांच्या सहाय्याने पहावे व्रणरोग किंवा व्रणाशिवाय इतर रोग ह्यामध्ये गंधसंबंधी - वासासंबंधी - काय फरक आहे हे नाकाच्या सहाय्याने समजावे . देश ( जन्मभूमी ), काल ( रोग कधी झाला वगैरे ) जात ( ब्राह्मणादि ), सात्म्य ( कोणकोणत्या आहारांची व निजण्याबसण्यादिकांची संवय आहे इत्यादि ), रोगाच्या उत्पत्तीसंबंधाने माहिती , वेदना कितपत होतात , अपानवायु व मलमूत्र इत्यादिकांची योग्य प्रवृत्ती होते की नाही , रोग कोणच्या काळात वाढतो वगैरे माहिती ह्या गोष्टी प्रत्यक्ष विचारुन समजून घ्याव्या . ह्याखेरीज इतर दोषासंबंधी जी लक्षणे ती देखील त्या त्या दोषाच्या चिन्हानुरुप जाणावी . ( हरणचंद्र " आत्मासदृशेषु " असा पाठ घेऊन म्हणतात की पंचेद्रियांनी परीक्षा करणे काही कारणाने जर आपणास अशक्य झाले , तर त्या ठिकाणी असणारी ( रोग्याच्या घरात असणारी ) जी माणसे असतील त्यांच्या सहाय्याने वरीलप्रमाणे पचनेंद्रियादि परीक्षा करावी . ( त्याच्या मताने " आत्मासदृशेषु " हा पाठ चुकीचा आहे ॥५॥

रोग्याची परीक्षा करताना त्याला जर काही विकार भलतेच आहेत असे वाटू लागले तर , त्याचप्रमाणे वैद्याने विचारलेली हकीकत रोग्याने इत्थंभूत सांगितली नाही तर काही गोष्टी कळण्याच्या संदिग्ध राहातात व त्यामुळे वैद्याला उपचार करताना मोह पाडतात . नक्की उपचार कोणता करावा हे सुचत नाही . अशा वेळी सर्वसामान्य दृष्टीने चिकित्सा करुन प्रकृतिमान नियमित पहात जावे ॥६॥

ह्याप्रमाणे सर्व गोष्टींचा विचार करुन जो साध्य रोग असेल तो बरा करावा . जो केवळ औषध आहे तोपर्यंत बरा असतो अशा याप्य रोगाला सतत औषधाने दाबून ठेवावा . असाध्य असेल तो मी बरा करीन अशा प्रतिज्ञेने चिकित्सा करु नये . तसेच जे रोग एक वर्षापेक्षा अधिक मुदतीचे असतील तेही प्रायः ( प्रतिज्ञेने ) हातात घेऊ नये .

आता कोणते रोगी साध्य असूनहि बरे करण्यास फार कष्ट पडतात ते सांगतो . ते असे - श्रोत्रीय ( वेदविहित आचरण करणारा ) राजा , स्त्रिया लहान मुले , वृद्ध , घाबरट , मोठेमोठे अधिकारी , राजाचे आवडते सेवक कितव ( व्यसनी , जुगारी ), दुर्बळ , मी वैद्य आहे असा अभिमान बाळगणारा , झालेला व्याधी चोरुन ठेवणारा व अनाथ इतक्या मनुष्यांना रोग झाला तर तो त्यांच्या त्यांच्या स्थितिमुळे बरा करण्यास फार कठीण पडते .

ह्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा विचार करुन चिकित्सा केल्यास तो वैद्य धर्म , अर्थ , काम , व यश ( कीर्ती ) मिळवितो . ( हे त्याला प्राप्त होतात ॥७॥८॥

स्त्रियांसह एके ठिकाणी बसणे , एके ठिकाणी राहणे , त्यांच्याशी हसणे , ह्या गोष्टी मुख्यतः वर्ज कराव्या . फळे वगैरे शिवाय त्यांनी जर दुसरे काही दिले तर वैद्यांनी ते घेऊ नये ॥९॥१०॥

अध्याय दहावा समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : August 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP