अध्याय अठ्ठाविसावा
आता ‘‘विपरीताविपरतिव्रणविज्ञानीय ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥
फळे , अग्नी व पाऊस ह्या तिहीचे भविष्य जसे त्यांच्या पूर्वी येणारी फुले , धूर व ढग हे अनुक्रमाने प्रगट करितात , त्याप्रमाणे रिष्टे (आरिष्टे ) - अशुभ चिन्हे -मरण सन्निध आल्याचे सांगतात .
मरणसूचक चिन्हे ज्याचा मृत्यू सन्निध आला आहे त्याला संभवत नाहीत , अशा हेतूने तिकडे दुर्लक्ष करण्यात येते असे नसून ती चिन्हे झाली तरी त्यांती काही फार सूक्ष्म असल्यामुळे ती सामान्य लोकांना किंवा अज्ञ वैद्याला कळून येत नाहीत . काही बेफिकिरपणाने झाली असूनही कळत नाहीत . आणि काही चिन्हे होताच त्यांचा परिणाम जो मृत्यु तो होत असल्यामुळे अज्ञ लोकांना त्याचे ज्ञान होत नाही . रिष्टे (मरण सूचक चिन्हे ) दिसली की मृत्यु निश्चित असतोच . तथापि जर एकाद्याचे दैवच त्यावेळी त्याला अनुकूल झाले , तर निष्पाप व जितेंद्रिय अशा वेदचित् ब्राह्मणाच्या आशिर्वादाने किंवा एकाद्या दिव्य रसायनाची प्राप्ती झाल्याने , अथवा एकादा महान् तपस्वी किंवा एकादा सिद्धमांत्रिक ह्यांच्या कृपेने मात्र मृत्यु टाळता येतो .
नक्षत्रपीडा (ग्रहदशा ) ही बहुतेक तिचा काल आला म्हणजे फलदायक होते . त्याप्रमाणे ह्या अरिष्टाचे फलही तात्कालिक नसून तेही काही नियमित कालानेच मिळते , असे कित्येक लोक म्हणतात .
ज्याचे आयुष्य संपले आहे अशा रोग्याच्या रोगाचा प्रतिकार करण्याविषयी प्रयत्न करणार्या वैद्याला यशप्राप्ती होत नाही . म्हणून रोग्याच्या अरिष्ट चिन्हाचे कुशल वैद्याने प्रयत्नाने सूक्ष्मावलोकन करीत असावे .
व्रणी मनुष्याच्या गंध , वर्ण व रस इत्यादि विषयात स्वाभाविक (आपोआप ) जर विपरीतपणा उत्पन्न होईल , तसेच शब्द व स्पर्शज्ञानातही असाच प्रकार घडून येईल , तर तो व्रणी मनुष्य ‘‘गतायु ’’ आहे असे समजावे ॥३ -८॥
वातदोषाने व्रणाचा गंध तिखट असतो . पित्तामुळे तीक्ष्ण असतो . कफामुळे मांसाच्या गंधासारखा . रक्तदोषामुळे लोखंडाच्या वासासारखा व त्रिदोषामुळे सर्व दोषांचा मिश्र असा गंध (वास ) असतो . लाह्याच्या वासासारखा वास वातपित्तदोषाने येतो . वातकफदोषाने जवसाच्या तेलाप्रमाणे येतो . आणि पित्तकफाने तिळाच्या तेलाप्रमाणे येतो व ह्या तीनही द्वंद्वज प्रकारात किंचित् कच्च्या मांसाचाही गंध येतो . हे व्रणाचे दोषानुसार स्वाभाविक गंध आहेत . ह्या व्यतिरिक्त दुसरा वास येत असेल तर तो विकृत (विपरीत ) गंध समजावा जसेः -
मद्य , अगरु , तूप , जाईची फुले , कमळ , चंदन , सोनचाफ्याची फुले यापैकी कोणत्याही एका पदार्थासारखा वास व्रणाला असेल किंवा कोणताही उत्तम सुवास त्या व्रणाला असेल , तर तो व्रणाचा रोगी मरणार असे समजावे . त्याचप्रमाणे ज्या व्रणाला कुत्रा , घोडा , उंदीर किंवा कावळा ह्यांच्या अंगासारखी घाण येते , पूमिश्र वाळलेल्या मांसासारखी घाण येते , ढेकणासारखी घाण येते , चिखलासारखी घाण येते किंवा माती सारखी घाण किंवा वास येतो , असे व्रण असाध्य समजावे .
पित्तदोशात्मक व्रणाचा रंग किंचित काळा , केशरी किंवा मुरदाडशिंगीसारखा पिवळा रंग असून त्याचा दाह होत नाही , किंवा चूषण (चोखल्याप्रमाणे ) पीडा होत नाही , असे असेल तर तो व्रण असाध्य समजून वैद्याने सोडावा . (कंकुष्ठ ह्याचा अर्थ ‘‘मुरदाडशिंगी ’’) केला आहे , काहींच्या मताने पिवळ्या काटे धोतर्याचा चीक असा अर्थ आहे , तथापि दोहींचा रंग पिवळाच असल्याने अर्थात फारसा भेद नाही .
कंडुयुक्त , कठीण , पांढरे , स्निग्ध ह्या लक्षणांनी युक्त असे कफजन्य व्रण जर वेदनायुक्त असतील व त्यांचा दाह होत असेल , तर ते असाध्य म्हणून वैद्याने सोडावे .
वातजन्य व्रण काळा व ज्यांतून पातळ स्राव होत आहे असा असून , मर्मस्थानाला पीडादायक असूनही जर थोडी देखील पीडा त्यापासून होत नसेल , तर अशा वातजन्य व्रणाला वैद्याने उपचार करू नयेत .
( आठव्या श्लोकात ‘‘ गंधवर्ण रसादीनां ’’ असे म्हटले आहे त्याप्रमाणे गंध व वर्ण ह्यांची लक्षणे सांगितली . रसाची सांगितली नाहीत , तथापि तुरट , तिखट व मधुर असे रस वातादिदोषानुरूप क्रमाने जाणावे ॥९ - १५॥
त्वचा व मांस ह्यांच्या आश्रयाने असणारे व्रण पेटल्यासारखे दिसणे , त्यांतून आवाज युक्त वायु निघणे किंवा त्यातून खटखट असा किंवा घुर घुर असा आवाज निघणे ह्या लक्षणांनी युक्त असले तर ते असाध्य सम जावे . पण तेच व्रण कोठ्याच्या आश्रयाने असतील तर त्यांतून आवाजयुक्त वायु निघणे हे विपरीत लक्षण नसून त्याचे ते प्रकृतच लक्षण समजावे . तसेच जे व्रण मर्मस्थानी नसून अतिशय वेदनायुक्त आहेत तेही असाध्यच समजावे .
जे व्रण आतून अत्यंत दाहयुक्त असून बाहेरून शीत (थंड ) असतात , तसेच ज्या व्रणांचा बाहेर अत्यंत दाह होत असून अंतर्गत शीत (थंड ) असतात , असे व्रण असाध्य समजावे .
शक्ति , पताक , रथ (गाडी ). कुंत (दड ) घोडा , हत्ती गाय , बैल , किंवा वाडा ह्यांच्या आकारासारखा भास ज्या व्रणांच्या ठिकाणी होतो , किंवा ज्या व्रणावर एखादे चूर्ण वगैरे पसरले नसताना ते पसरल्यासारखे वाटते ते व्रण असाध्य म्हणून सोडून द्यावे .
ज्यांचे व्रण मर्मस्थानी असून त्यातून पू व रक्त पुष्कळ येते आणि ते व्रणाचे रोगी शक्तिक्षीण झालेले , मांस क्षीण (रोडके ) झालेले असून श्वास , खोकला व अरुचि ह्यांनी
पीडित असले तर ते असाध्य म्हणून सोडून द्यावे .
यथायोग्य असे सर्व प्रकारचे उपचार चालू असूनही जे व्रण भरून येत नाहीत , ते असाध्य समजून यशेच्छु वैद्याने सोडून द्यावे ॥१६ -२८॥