अध्याय १३ वा
आता " जलौकावचारणीय " नावाचा अध्याय जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे त्याप्रमाणे सांगतो ॥१॥२॥
राजे , धनिक , लहान मुले , वृद्ध माणसे , भित्रे लोक , दुर्बळ स्त्रिया व नाजुक माणसे ह्यांच्यावर उपकार करण्याच्या हेतूने जळवांच्या सहाय्याने रक्त काढण्याचा हा अतिशय नाजुक ( मुळीच त्रास न देणारा ) उपाय सांगितला आहे .
वातदूषित रक्त असेल तर ते शिंगाच्या योगाने काढावे , पित्तदूषित असेल तर जळवांनी काढावे आणि कफदूषित असेल तर ते तुमडी लावून काढावे . कारण शिंग स्निग्ध असल्यामुळे वात दोषात योग्य , जळू शीत म्हणून पित्तास व तुमडी रुक्ष म्हणून कफदोषात योग्य आहे . अथवा वेळ पडल्यास कोणत्याही दोषाचे रक्त ह्या तिहीपैकी वेळेला जे अनूकूल साधन असेल त्याने काढावे ॥३॥४॥
गव्याचे शिंग उष्ण , मधूर व स्निग्ध आहे , म्हणून वाताने दूषित रक्त काढण्याला ते योग्य व हितकारक आहे .
जळू ही गारठ्यात राहणारी , पाण्यात उत्पन्न होणारी व मधुररसप्रिय आहे , म्हणून ती पित्तदूषित रक्त काढण्यास हितकर आहे . अलाबु ( तुमडी ) तिखट , रुक्ष व तीक्ष्ण असते . म्हणून कफदूषित रक्त काढण्यास ती योग्य आहे ॥५॥६॥७॥
ज्या ठिकाणचे रक्त काढावयाचे त्या ठिकाणी फासणी टाकून किंचित तोंड करुन घ्यावे . नंतर शिंगाच्या तोंडाला पातळ असे जनावराच्या मूत्राशयाचे चामडे बांधून , त्या शिंगास त्या जागेवर ठेवून तोंडाने रक्त आकर्षण करुन ( चोखून ) काढावे . ( भालुकी म्हणतो शिंगात कापसाचा बोळा घालावा म्हणजे झाले . हे सिंग सात आंगुळे लांब असावे . तुमडीने रक्त काढणे झाल्यास वरच्याप्रमाणेच पण तुमडीच्या आत दिवा ठेवावा . तुमडी खाली अंगठ्याप्रमाणे जाड असून तिला मुगाइतके छिद्र असावे . अलाबु ही घेराने आठ अंगुळे असून तिची वरची नळी चार अंगुळे असावी ॥८॥
पाणी हेच ज्यांचे जगण्याचे साधन त्या जलायुका किंवा पाणी हेच ज्याचे वसतिस्थान जलौकस म्हणजे जळवा होत .
जलौका बारा जातीच्या आहेत . त्यांत सहा विषारी आहेत व सहा जाती बिनविषारी आहेत .
त्यांत सविष जळवा कृष्णा , कर्बुरा , अलगर्दा , इंद्रायुधा , सामुद्रिका व गोचंदना ह्याप्रमाणे सहा जातीच्या आहेत .
त्यापैकी ( १ ) काजळाप्रमाणे काळी व मोठे डोके असलेली ; ती कृष्णा ; ( २ ) बर्मी माशाप्रमाणे लांब व काहींच्या कुशी म्हणजे बाजू तुटल्यासारख्या व काहींच्या उंच दिसणार्या त्या कर्बुरा ; ( ३ ) जिच्या अंगावर केस असल्याप्रमाणे दिसते , कुशी म्हणजे बाजू मोठी असते व जी काळ्या तोंडाची ती अलगर्दा ; ( ४ ) जिच्या अंगावर इंद्रधनुष्याप्रमाणे चित्रविचित्र उभ्या रेषा असतात ती इंद्रायुधा ; ( ५ ) किंचित काळसर पिवळी व चित्रविचित्र ठिपके असलेली व अतिशय लहान तोंडाची ती सामुद्रिका ; ( ६ ) बैलाच्या अंडाप्रमाणे खालच्या भागी द्विभागलेली व अतिशय लहान तोंडाची गोचंदना . ह्यापैकी एकादी जळू चावली तर त्या मनुष्याला त्या दंशाच्या ठिकाणी अतिशय सूज , ( खाज , ) ( कंडू , ) मूर्च्छा , ताप , ज्वर , दाह , ओकारी , उन्माद व अंग गळल्याप्रमाणे ग्लानी , ही लक्षणे होतात . त्याजवर कल्पस्थानात पुढे सांगण्यात येणारा ’ महाअगद ’ पिण्यात , लेप करण्यात व नाकात घालण्यात वगैरे योजावा . इंद्रायुधा जळू चावली तर तो दंश असाध्य आहे . ह्याप्रमाणे ह्या विषारी जळवा त्यांच्यावरील उपचारासह सांगितल्या .
आता निर्विष जळवा - कपिला , पिंगला , शंकुमुखी , मूषिका , पुंडरिकमुखी व सावरिका अशा सहा जातीच्या आहेत . त्यापैकी ( १ ) मनशिळेने रंगविल्याप्रमाणे दोन्ही कुशी व पाठीवर स्निग्ध असा मुगाचा वर्ण व ती कपिला ; ( २ ) किंचित तांबुस व वाटोळी ; पिंगट वर्ण व जलद जाणारी ती पिंगला ; ( ३ ) जी निळसर तांबुस रंगाची त्वरित रक्त पिणारी , तोंड लांबट व तीक्ष्ण असलेली ती शंकमुखी ; ( ४ ) जी आकाराने व रंगाने उंदरासारखी असून जिच्या अंगाला दुर्गंधी येते ती मूषिका . ( ५ ) मुगाच्या रंगाची व पांढर्या कमळाच्या आकाराच्या तोंडाची ती पुंडरीकमुखी ; ( ६ ) स्निग्ध कमळाच्या पानासारख्या रंगाची अठरा अंगुळे लांब ती सावरिका ; ही जळू पशूंचे रक्त काढण्यास घेतात . ह्याप्रमाणे ह्या निर्विष जळवा सांगितल्या आहेत .
निर्विष जळवा बहुधा पांड्यदेश ( म्हैसूर भाग ), सह्याद्रीपर्वत व मथुराप्रांत ह्या भागांतून असतात . ह्या आकाराने मोठ्या , बलवान , जलद व पुष्कळ रक्त पिणार्या व विषारी नसतात .
विषारी मासे , किडे , बेडुक ह्यांच्या मलमूत्रादिकांतून ज्यांची उत्पत्ती होते , तसेच ज्या गलिच्छ पाण्यात उत्पन्न होतात , त्या बहुतेक विषारी असतात . तसेच किंचित पांढरी , निळी , किंचित तांबडी व कुमुद ( लहान ) कमळे वगैरे ज्या कमळाच्या जाती , सौगंधिक कमळ , पांढरे कमळ व शेवाळ ह्या वनस्पती कुजल्या म्हणजे त्यामधून ज्यांची उत्पत्ती होते व ज्या स्वच्छ पाण्यात उत्पन्न होतात त्या निर्विष असतात .
निर्विष जळवा ज्या ठिकाणी सुगंधीजल आहे अशा जलमय प्रदेशात असतात . त्या विषारी वगैरे अपायकारक पदार्थ खात नाहीत . त्या शेवाळ खातात . त्या चिखलातही राहात नाहीत , अशा जळवा रक्त काढण्यास सुखावह असतात ॥९॥१४॥
ह्या ओल्या चामड्यात अगर दुसर्या अशाच काही युक्तीने धरुन आणाव्या .
आणि नव्या मातीच्या घागरीत किंवा डेर्यात सरोवर किंवा तळ्याच्या पाण्यातील गाळ भरुन त्यात ठेवाव्या . त्याना खाण्यासाठी शेवाळ , शुष्कमास व पाण्यात होणारे शिंगाडे वगैरे कंद ह्याचे पीठ करुन घालावे . त्याना निजण्याकरिता पाण्यांत होणारे गवत व कमळाची पाने ठेवावी . तीन तीन दिवसांनी त्यांना वरीलप्रमाणे दुसरे ताजे पाणी व खाण्याचे पदार्थ घालावे आणि सात सात दिवसांनी ती घागर अगर डेरा बदलून दुसरी घागर किंवा डेर्यात त्यांना ठेवावे . ( काचेच्या बरणीत ठेवता येतात ॥१५॥१६॥
ज्यांचा मध्य भाग स्थूल आहे , ज्या दमल्या आहेत , ज्या फार लांब आहेत , ज्या हळु चालतात , ज्या दूषित रक्त घेत नाहीत , थोडे रक्त पिणार्या व विशारी अशा जळवा उपयोगात आणण्यास चांगल्या नाहीत ॥१७॥
जळवांच्या प्रयोगाने साध्य असा रोगी बसवून अगर निजवून ज्या ठिकाणी जळवा लावावयाच्या त्या ठिकाणी व्रण वगैरे नसल्यास माती व शेणाचा गोबर ह्यांनी घासावे . नंतर जळवावर शिरस व हळद ह्यांच्या कल्काचे ( चटणीचे ) पाणी ओतावे . आणि त्या दुसर्या स्वच्छ भांड्यात दोन घटका ठेवाव्या . मग त्या चांगल्या हुशार झाल्यावर रोगाच्या ठिकाणी लावाव्या . आणि त्यांना पातळ पांढरे व ओले अशा कापसाच्या वस्त्राने आच्छादून तोंड मात्र मोकळे ठेवावे . ती जळू जर रक्त घेत नसेल तर त्या ठिकाणी थोडा दुधाचा अगर रक्ताचा थेंब टाकावा . किंवा वस्त्राने वगैरे फासणी टाकावी . इतके करुन जर ती रक्त ओढीत नसेल तर दुसरी जळू लावावी .
जळू लावल्यावर ती जर घोड्याच्या खुराप्रमाणे वाकडी मान करील व मान उचलल्यासारखी करेल तर रक्त घेत आहे असे समजावे . ती रक्त घेऊं लागली म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे ओल्या फडक्याने आच्छादून धरावी व वरचेवर तिच्यावर पाणी शिंपडावे . ज्या ठिकाणी ती लागली असेल त्या ठिकाणी टोंचणी व खाज उत्पन्न झाली म्हणजे तिला तेथून सोडवून घ्यावी . रक्ताच्या वासाने ती जर तेथून तोंड न काढील तर त्या ठिकाणी थोडे सैंधवाचे चूर्ण टाकावे . जळू सुटून पडली म्हणजे तिच्या अंगावर तांदुळाचा कोंडा टाकावा व तोडास सैंधव मिश्र तेल लावावे . आणि डाव्या हाताचा अंगठा व तर्जनी ह्यांनी शेपटाला धरुन उजव्या हाताचा अंगठा व तर्जनीने हळू हळू तोंडापर्यंत दाबीत न्यावी . ह्याप्रमाणे तिच्यातील सगळे रक्त निघेपर्यंत करावे . सर्व रक्त ओकल्याचे लक्षण म्हणजे ती पाण्याच्या भांड्यात टाकली असता खाण्याच्या इच्छेने पाण्यात इकडे तिकडे पोहू लागते . आणि पाण्यात हालचाल करीत नाही , बुडते ती सगळे रक्त ओकली नाही असे समजावे . तिला पुनः दाबावी . जिला चांगली ओकविली नाही ती दुर्धान्ता . तिला इंद्रमद ( रक्तमद ) नावाचा असाध्य व्याधी होतो , म्हणून तिला पुनः ओकसावी . आणि जी दूषित रक्त विरहित असेल ती पूर्वी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवावी .
रक्त योग्य प्रमाणात निघाले आहे की नाही हे पाहून जर योग्य प्रमाणात निघाले असेल तर त्याजवर शतधौत घृत लावावे , किंवा त्या तुपात भिजविलेला कापसाचा बोळा त्यावर ठेवावा . आणि योग्य प्रमाणात रक्त निघाले नसेल तर त्या छिद्रात मध घालून हालवावे . आणि अधिक रक्त निघाले तर त्याजवर थंड पाणी शिंपावे अगर ओल्या फडक्याची पट्टी बांधावी . आणि रक्त निघण्याच्या कार्यात काही निराळाच उपद्रव झाला असेल तर तुरट , मधुर , स्निग्ध व शीत अशा औषधांच्या कल्काने थंडगार असे लेप करावे .
ह्या अध्यायात सांगितलेली जळवांची वसतिस्थाने त्या आणण्याचा विधि . त्याच्या सविष , निर्विष जाती , त्यांचे पोषणाचे प्रकार व लावण्याचा विधि ह्या सर्व गोष्टी ज्याला पूर्ण माहित आहेत , तो जळवाच्या योगाने रक्त काढल्याने बरे होणारे रोग बरे करतो ॥१८॥२२॥
अध्याय तेरावा समाप्त