मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|सुश्रुत संहिता|सूत्रस्थान|
वेदोत्पत्ति

सूत्रस्थान - वेदोत्पत्ति

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


अध्याय १

ब्रह्मदेव , प्रजापति , अश्विनीकुमार , इंद्र , धन्वंतरि व सुषृत आदि आयुर्वेदप्रवर्तक , देव व ऋषि यांना नमस्कार करतो .

भगवान दिवोदास धन्वंतरीने सुश्रुताला " वेदोत्पत्ति " नांवाचा अध्याय जसा सांगितला तसा आता सांगतो ॥१॥२॥

सर्व देवांत श्रेष्ठ अशा धन्वंतरीचा अवतार म्हणजे काशीचा दिवोदास , तो वानप्रस्थाश्रमी झाला . ऋषिसमुदायासह आपल्या आश्रमांत बसला असता त्या ठिकाणी औषधेवन , वैतरण , औरभ्र , पौष्कालावन , करवीर्य , गोपूररक्षित व सुश्रुत इत्यादि आयुर्वेदाच्या अध्ययनाविषयी कुतुहल असलेले विद्यार्थी होते . त्यांनी त्या भगवान दिवोदास धन्वंतरीना विचारले

हे भगवन , शारीर , मानस , आगंतुक व्याधींनी , ( रोगांनी ) नाना प्रकारच्या वेदनांचा ( अभिघात ) त्रास यामुळे पिडलेले , सनाथ असूनही अनाथाप्रमाणे विरुद्ध आचरण करणारे , आक्रोश करणारे असे लोक पाहून आमच्या अंतःकरणात पीडा होते . सुखाची इच्छा करणार्‍या लोकांच्या रोगनाशाकरता आणि स्वतःचे जीवित सुखाने जाण्याकरता आणि प्रजेचे हित व्हावे म्हणून आयुर्वेद श्रवण करण्याची इच्छा आहे . ह्या आयुर्वेदावर ऐहिक व पारलौकिक सुखे अवलंबून आहेत . म्हणून आपणांकडे आम्ही शिष्य म्हणून आलो आहो . तरी आम्हांस जसे सांगाल तसे आम्ही ऐकू .

ह्यातच ऐहिक व पारलौकिक ( श्रेय ) कल्याण आहे असे समजून आम्ही शिष्य म्हणून आपणाकडे आलो आहो .

त्याना भगवान धन्वंतरी म्हणाले तुमचे स्वागत असो . ( बाळांनो ) विद्यार्थ्यांनो , तुमच्या पात्रापात्रतेविषयी चर्चा करण्याचे कारण नाही . आयुर्वेदाचे शिक्षण देण्यास तुम्ही योग्य आहात ॥३॥५॥

हा आयुर्वेद म्हणजे अथर्ववेदाचे एक उपांग म्हणजे उपवेद आहे . हा सृष्टी निर्माण करण्यापूर्वीच ब्रह्मदेवाने उत्पन्न केला आहे . त्याचे एक हजार अध्याय असून श्लोकसंख्या एक लाख आहे . परंतु त्यानंतर लोकांचे आयुष्य कमी व बुद्धि अल्प पाहून पुनः त्यांनी त्याचे निरनिराळे आठ विभाग करुन सांगितले आहे ॥६॥

ते आठ विभाग - शल्यतंत्र , शालाक्यतंत्र , कायचिकित्सा , भूतविद्या , कौमारभृत्य , अगदतंत्र , रसायनतंत्र , व वाजीकरणविद्यातंत्र असे आहेत ॥७॥

आता ह्यांची थोडक्यांत लक्षणे सांगतो .

१ त्यांत शल्यतंत्र ज्याला म्हणतात त्या भागामध्ये नानाप्रकारची गवत , लाकूडे , दगड , धूळ , लोखंडाचे तुकडे , ढेकळे , हाडे , केस , नखे इत्यादिकांपासून होणार्‍‍या जखमा , व्रणांमधून वाहणारा पू , मूढगर्भ ( अडलेला गर्भ ) बाहेर काढणे व अंगात घुसलेली बाणांची टोके वगैरे शल्ये काढणे ह्या गोष्टीची माहिती , तसेच यंत्रे , शस्त्रे , क्षारकर्म , अग्निकर्म , ( डाग देणे ) ही कशी करावी व व्रणाची परीक्षा कशी करावी इत्यादि माहिती सांगितली आहे .

२ दुसरे शालाक्यतंत्र ह्यामध्ये मानेच्या वरच्या भागात होणारे रोग म्हणजे कान , डोळे , तोंड , नाक वगैरे अवयवांचे ठिकाणी होणार्‍या रोगांची शांती कशी करावी ह्यासंबंधी माहिती सांगितली आहे . ( ह्या प्रकरणात शलाका म्हणजे सळईच्या योगाने औषधोपचार करावयाचे असतात . म्हणून ह्याला शालाक्यतंत्र अशी संज्ञा आहे . )

काय - चिकित्सा नांवाचा जो भाग आहे तो सर्व अंगामध्ये होणारे ज्वर , अतिसार , रक्तपित्त , शोष ( क्षय ), उन्माद , अपस्मार , कुष्ठ व प्रमेह इत्यादि जे रोग त्यांच्या उपशमनासाठी सांगितला आहे .

भूतविद्या नांवाचे जे तंत्र आहे ते देव , असुर , गंधर्व , यक्ष , राक्षस , पितर , पिशाच्च व नाग वगैरेची ग्रहांच्या बाधेमुळे मने बिघडली आहेत ( म्हणजे ज्यांची डोकी ताळ्यावर नाहीत ) त्यांच्या त्या विकाराची शांती करण्याकरिता व बालग्रहादिकांचे बली वगैरे कसे दिले असता त्यांची शांती होईल हे सांगण्याकरिता केले आहे .

कौमारभृत्य हे तंत्र लहान बालकांचे पोषण कसे करावे , मूल पाजणार्‍या दाईच्या अगर मातेच्या दुधाचे दोष कसे काढून टाकावे , दुषीत दुधाची परीक्षा कशी करावी व बालग्रहामुळे होणार्‍या व्याधीचे उपशमन कसे करावे हे सांगण्यासाठी केले आहे .

अगदतंत्र हे साप , विषारी किडे , लूता ( नानातर्‍हेचे कोळी , मुंग्या वगैरे अल्पविष प्राणी ) विंचू , उंदीर वगैरे प्राण्यांच्या विषाचे शमन करण्याकरिता सांगितले आहे .

रसायनतंत्र हे वृद्धावस्था न यावी म्हणून व आयुष्य , बुद्धी व सामर्थ्य वाढविण्याकरिता सांगितले आहे . ( ह्यातील प्रयोग रोगांचा नाश करण्यासही समर्थ असतात . )

वाजीकरणतंत्र हे अल्पवीर्य , दूषीत वीर्य , शुष्क व क्षीण वीर्य अशा लोकांच्या वीर्याचे सर्व दोष नाहीसे करुन त्यांच्या वीर्याची वृद्धी व्हावी व त्याचप्रमाणे संभोगसमयी उभयताना प्रसन्नता उत्पन्न होऊन उत्तम प्रकारची गर्भधारणा व्हावी आणि अत्यंत हर्ष उत्पन्न व्हावा अशा प्रकारची औषधी योजना करण्याकरिता सांगितले आहे . ह्याप्रमाणे आयुर्वेदाचे वेगवेगळे आठ विभाग सांगितले आहेत .

आता ह्या आयुर्वेदाच्या आठ अंगांपैकी कोणाला कोणत्या अंगाचे ( शाखेचे ) अध्ययन करण्याची इच्छा आहे ते सांगा . विद्यार्थी म्हणाले , हे भगवन आपण आम्हाला मुख्यतः शल्यतंत्राचेच अध्ययन सांगा . भगवान धन्वंतरी म्हणाले " ठीक आहे " ते शिष्य पुन्हा भगवान धन्वंतरीला म्हणाले " आम्ही बुद्धीमध्ये सारखे आहोत . आमच्या सर्वांच्या वतीने सुश्रुत हा आपणास विचारील . तेव्हा आपण त्यास जे जे सांगाल ते ते आम्ही लक्षपूर्वक श्रवण करुन त्याचे अध्ययन करुं . " त्यावर भगवान धन्वंतरी " ठीक आहे " असे म्हणाले .

नंतर ते सुश्रुताला म्हणाले , बाळा सुश्रुता , हा आयुर्वेद शिकण्याचे कारण म्हणजे जे रोगग्रस्त आहेत , त्यांच्या रोगांचा परिहार करणे हे आहे .

ह्या शास्त्रांत आयुर्वेदाच्या संरक्षणाविषयी व त्याच्या वृद्धीविषयी ह्या शास्त्रांतील नियमाप्रमाणे वागणाराला आयुष्य प्राप्त होते किंवा वाढते म्हणून ह्याला " आयुर्वेद " असे म्हटले आहे .

ह्या आयुर्वेदाचे मुख्यतः पहिले जे शल्यतंत्र ते शास्त्राचे अथवा वेदाचे नियम , प्रत्यक्ष प्रमाण ( अनुभव ), अनुमान व उपमा ही जी शास्त्राच्या सिद्धांतासंबंधी चार प्रमाणे ह्यांच्या विरोध होणार नाही अशा रितीने मी सांगतो ऐक .

हे शल्यतंत्र आयुर्वेदाचे पहिले अंग ( भाग ) आहे . कारण पूर्वी युद्धांमधून शस्त्रादिकांच्या अभिघाताने होणार्‍या जखमा बर्‍या करण्याकरिता प्रथमतः ह्याच शल्यतंत्राचा ( शस्त्र प्रयोगाचा ) उपयोग झाला . ( तसेच पूर्वी वीरभद्राने तोडलेले यक्षाचे ( दक्षप्रजापतीचे ) शीर ह्याच शस्त्रविद्येने अश्विनीकुमारानी पुन्हा पूर्ववत जोडले .

ह्याविषयी अशी एक आक्यायिका ऐकण्यात आहे की , पूर्वी दक्षप्रजापतीच्या यज्ञात रुद्राने दक्षाचे शिर तोडते तेव्हा देव अश्विनीकुमारापाशी जाऊन त्यांना म्हणाले , ( कारण अश्विनीकुमार हे देवांचे वैद्य होत . ) आपण आम्हापेक्षा फार श्रेष्ठ आहात ; तेव्हा आपण दक्षप्रजापतीचे शीर सांधावे . त्यांना ’ ठीक आहे ’ असे म्हणून ते शीर जोडून दक्षास जिवंत केले . तेव्हां देव इंद्राची प्रार्थना करुन त्याला म्हणाले की , ज्याअर्थी ह्यांनी दक्षाचे शीर जोडले आहे त्याअर्थी ह्यांना यज्ञासंबंधी हविर्भाग द्यावा . ( तेव्हापासून यज्ञांत अश्विनीकुमारांना आहुती देतात . )

आयुर्वेदाच्या आठही तंत्रामध्ये हेच शल्यतंत्र ( शस्त्रप्रयोग - चिकित्सा ) अधिक श्रेष्ठ म्हणून सांगितले आहे ; कारण ह्या तंत्रातील प्रयोगाने त्वरित कार्यसिद्धी होते . तसेच यंत्रे , शस्त्रे क्षारकर्म ( डागणे ) वगैरे सामुग्रीही ह्यात विपुल असते . आणि इतर वैद्यकाच्या सर्व तंत्राना सामान्यतः ह्याचा आश्रय करावा लागतो . म्हणून ही शल्यचिकित्सा ( शस्त्रविद्या ) किंवा हा आयुर्वेद शाश्वत ( नित्योपयोगी म्हणून निरंतर टिकणारा ), पुण्यकारक , स्वर्गाची प्राप्ती करुन देणारा , यशप्रद ( कीर्तिदायक ), आयुष्यदायक व निर्वाहाचे साधन असा आहे ।१८॥१९॥

आयुर्वेदपरंपरा

हा आयुर्वेद प्रथम देवाने प्रजापतीला सांगितला . पुढे प्रजापतीने तो शिकून अश्विनीकुमारांना शिकविला . त्यांनी इंद्राला सांगितला व इंद्राने तो मला शिकविला . आता लोकांचे हित व्हावे ह्या हेतूने मी जो कोणी शिकण्याकरिता मजकडे येईल त्याला सांगणार आहे .

ह्यासाठी असे म्हटले आहे कीः - सर्व देवांचे म्हातारपण रोगपीडा व मृत्यु नाहीसा करणारा , आदिदेव महाविष्णुचा अवतार जो धन्वंतरी तो मी असून आयुर्वेदाचे जे शल्यतंत्र म्हणजे शस्त्रचिकित्सेचे अंग ते दुसर्‍या सातही अंगासह शिकविण्याकरिता पुनः ह्या भूतलावर काशीराज दिवोदास ह्या नावाने आलो आहे ॥२०॥२२॥

या शास्त्रामध्ये पृथिव्यादि पंचमहाभूते व आत्मा ह्यांचा जो समन्वय ( विशिष्ट प्रकारचा एकत्र संयोग ) त्याला पुरुष असे म्हटले आहे . त्याच्यासाठी क्रिया ( चिकित्सा ) सांगावयाची कारण व्याधीचे स्थान तो पुरुष आहे . का म्हणशील तर सृष्टीच्या द्विविधपणामुळे सृष्टीतही दोन भेद आहेत . ( स्थावर व जंगम ) त्यातही अग्नितत्व व सोमतत्व म्हणजे उष्णता व थंडी यांच्या अधिक्यामुळे त्या प्रत्येकातही दोन दोन भेद आहेतच . अथवा पृथिव्यादि पंचभूतांच्या पृथक आधिक्याने पांच प्रकार आहेत असे म्हटले तरी चालेल . त्यामुळे या सृष्टीमध्ये प्राणीमात्रांचे चार वर्ग आहेत . ते असे - स्वेदज , अंडज , उद्भिज्ज , जारज ( जरायुज ). या चारी वर्गातील प्राण्यात पुरुष ( मनुष्य ) हा श्रेष्ठ आहे . आणि बाकीचे प्राणी हे त्याचे उपकरण ( साधन सामग्री ) आहे . या सृष्टीमध्ये मनुष्याचेच अधिष्ठान ( वास्तव्य ) प्रमुख आहे .

त्या मनुष्यदेहाला काही दुःखे झाले असता त्याला व्याधी ( रोग ) असे म्हणतात . ते आगंतुक , शारीरिक , मानसिक व स्वाभाविक असे चार प्रकारचे आहेत .

त्यांत आगंतुक व्याधी हे अकस्मात कोठूनतरी पडल्यामुळे किंवा काही लागल्यामुळे उत्पन्न होतात .

शारीरिक व्याधीला खाण्याचे व पिण्याचे पदार्थ हे मूळ कारण आहे . त्यांच्या अनियमितपणामुळे वात , पित्त , कफ व रक्त प्रकुपित झाल्यामुळे किंवा तीनही दोषांत वैषम्य होऊन हे उत्पन्न होतात .

मानसिक व्याधि - क्रोध , शोक , भय , हर्ष , विषाद , ईर्षा , परोत्कर्ष सहन न होणे , ( अभ्यसूया ) दीनपणा ( दारिद्र्य किंवा मनोदौर्बल्य ), मत्सर , काम व लोभ आदिकरुन इच्छा आणि द्वेष यांचे योगाने होतात .

स्वाभाविक व्याधि म्हणजे क्षुधा ( भूक ), तहान , वार्धक्य , मृत्यु , निद्रा इत्यादि . हे मन व शरीर या दोहोंच्या आश्रयाने असतात .

संशोधन ( वमन , विरेचन , बस्ति , वगैरे उपाय ) संशमन ( तैलघृतादि स्नेहन व मध वगैरे शामक औषध देणे ), आहार ( खाणे पिणे ), आचार ( विहार , हिंडणे , फिरणे , स्नान वगैरे ), यांचा योग्य प्रमाणाने उपयोग केला असता हे त्या व्याधीचा निग्रह ( प्रतिबंधव्याधी होऊ न देणे ) करण्यास कारणीभूत होतात .

प्राणीमात्रांचे बळ , शरीरवर्ण किंवा कांति आणि ओज ( तेज ) यांची वाढ होण्यास मूळ आहारच कारण आहे . तो आहार मधुरादि सहा रसांनी युक्त आहे . आणि ते रस द्रव्याच्या आश्रयाने आहेत . द्रव्ये म्हणजे औषधी . त्या स्थावर व जंगम अशा दोन प्रकारच्या आहेत .

त्यापैकी स्थावर औषधी चार प्रकारच्या आहेत . वनस्पति , वृक्ष , वीरुध ( वेली ) व औषधी असे त्यांचे चार प्रकार आहेत .

त्यापैकी ज्यांना फुले न येता फळे येतात त्यांना वनस्पति म्हणतात . ( उ . गुळवेल )

( फुले न येता फळे येणे हा सिद्धांत आधुनिक वनस्पतिशास्त्राला न पटणारा असा आहे ; तथापि तो या ठिकाणी केवळ स्थूलदृष्टीच्या विचाराने सांगितला आहे . सात्वीकदृष्टीने सांगितला नाही हे लक्षात ठेवावे . )

ज्यांना फुले येऊन फळे येतात त्यांना वृक्ष म्हणतात .

ज्यांना लांब लांब पागोरे फुटतात व ज्या खांब किंवा एकादा वृक्ष यांच्या आश्रयाने त्याजवर चढून पसरतात अशा ज्या वेली त्यांना " वीरुध " असे म्हणतात .

ज्या झाडाना फळे येऊन ती पिकली म्हणजे ती झाडे सुकतात त्याना औषधी म्हणतात .

जंगम औषधीचेही जरायुज , अंडज , स्वेदज व उद्भिज्ज असे चार प्रकार आहेत . त्यात पशू , माणूस , वाघ वगैरे हिंस्त्र प्राणी हे जरायुज म्हणजे गर्भाशयांतून जन्मास येणारे आहेत . पक्षी , साप व मासे इत्यादि प्राणी अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण होणारे आहेत . बारीकसारीक किडे , मुंग्या वगैरे सूक्ष्म प्राणी स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे आहेत . आणि इंद्रगोप ( मखमली किडे ) व बेडूक वगैरे प्राणी हे उद्भिज्ज म्हणजे जमिनीतून निर्माण होणारे आहेत .

त्यापैकी स्थावर औषधी ( वनस्पति ) पासून त्यांची साल , पाने , फुले , फळे , मुळे , कंद , डिंक व त्यांच्यापासून निघणारा रस हे पदार्थ उपयोगी आहेत .

सोने , चांदी वगैरे धातु , माणिकमोती वगैरे रत्ने , मनशीळ , सर्व प्रकारची माती व शंख , शिंपा वगैरे पदार्थ पार्थिव ( भू - भागासंबंधी ) आहेत .

कालजन्य द्रव्ये म्हणजे मोठा वारा , निर्वात ( वारा नसणे ), ऊन , सावली , चांदणे , अंधकार , शीत , वृष्टी , दिवस , रात्र , पक्ष , मांस , ऋतु , आयन इत्यादि संवत्सराचे विशिष्ट भाग हे कालजन्य आहेत . हे स्वभावतःच वातादि दोषांचा संचय , ( साठणे ) प्रकोप , ( वाढविणे ) प्रशम ( शांति ) व प्रतिकार ह्यांना कारणीभूत असल्यामुळे उपयोगाचेच आहेत ॥२३॥३४॥

स्थावर , जंगम , पार्थिव व कालकृत हे जे द्रव्यांचे चार वर्ग सांगितले ते सर्व शरीरासंबंधी जे दोष आहेत त्यांचा चय ( संचय - साठा ) कोप ( वाढ ), शम ( शमन - कमी होणे ) ह्या गोष्टीला कारण आहेत असे वैद्यकशास्त्रवेत्त्यांनी सांगितले आहे .

आगंतुक रोगांचे दोन प्रकार आहेत . त्यात जे मानसिक आहेत ते मनावर एकदम अनिष्ट परिणाम झाल्यामुळे होतात व दुसरे शारीरिक रोग आकस्मित अपघाताने होतात . त्यांच्या उपचाराचेहि दोन प्रकार आहेत . त्यांपैकी शारिरीक रोग असले तर त्यावर योग्य ते औषधोपचार करावे आणि मानसिक विकार असता त्याला रुचणारे असे भाषण वगैरे करुन त्याला आवडणारी वस्तू मिळवून देणे , ह्या उपायांनी बरे वाटते ॥३५॥३७॥

ह्याप्रमाणे पुरुष , व्याधि , औषध व क्रियाकाल ( दोषांचा चय , प्रकोप , शमनादिकांचा काळ ) किंवा उपचार करण्याचा काल असे हे चतुष्ट्य थोड्क्यांत सांगितले ॥३८॥

ह्या चतुष्ट्यांतील पुरुष ह्या शब्दाने त्या पुरुषापासून ( मनुष्यापासून ) उत्पन्न होणारी मलमूत्रादि पंचमहाभूतादि व त्याचे अंग प्रत्यंग म्हणजे शरीर आणि त्यांतील इतर अवयव , तसेच त्वचा , मांस , शिरा , स्नायु , इत्यादि शरिरांतील द्रव्ये इतके पदार्थ समजावे .

तसेच व्याधि ह्या शब्दाने वात , पित्त , कफ , रक्त , सन्निपात ( सर्व दोषांचा एकदम कोप होणे किंवा र्‍हास होणे ) व वैषम्य ( दोषांचा न्यूनाधिकपणा कमी होणे किंवा वाढणे ) ह्यांच्या योगाने होणारे सर्व तर्‍हेचे रोग समजावयाचे .

औषधि ह्या शब्दाने द्रव्य , गुण , रस , वीर्य , विपाक व प्रभाव ह्या सर्व गोष्टी घ्याव्ययाच्या .

काल शब्दाने स्नेहनादिकांचे व त्या त्या आहारविहारादिकांच्या वेळा औषधसेवनाचे काळ , दोषाच्या चय प्रकोपादिकांचे ऋतु , महिने वगैरे सर्व प्रकारचे कर्मासंबंधी जे जे काळ त्या सर्वांचा विचार करावयाचा .

सर्व चिकित्सेचे ( वैद्यकशास्त्राचे ) बीज - तत्व हे ह्या अध्यायांत संक्षेपाने सांगितले आहे . पुढील एकशेवीस अध्यायात हेच विस्ताराने सांगितले जाईल ॥३९॥

हे जे वर एकशेवीस अध्याय सांगावयाचे म्हणून सांगितले हे ह्या पहिल्या पाच स्थानामध्ये सांगितले आहेत . ती स्थाने - पहिले सूत्रस्थान , दुसरे निदानस्थान , तिसरे शारीरस्थान , चौथे चिकित्सास्थान , आणि पाचवे कल्पकस्थान . ह्याप्रमाणे विषयानुरोधाने त्याचे पाच भाग केले आहेत . आणि बाकी राहिलेला विषय उतरंतत्रामध्ये आम्ही सांगू ॥४०॥

हे सनातन ( त्रिकालबाधित ) असे आयुर्वेदशास्त्र ( वैद्य शास्त्र ) आरंभी ब्रह्मदेवाने सांगितले . ते काशीराज दिवोदास धन्वंतरीनी ह्या भूतलावर प्रगट केले . ह्याचे जो विधियुक्त अध्ययन करील तो महापुण्यवान मनुष्य या जगांत मोठमोठ्या राजेरजवाड्याकडूनही पूज्य मानला जाऊन शेवटी इंद्रलोकाप्रत जाईल ॥४१॥

अध्याय पहिला समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : August 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP